Friday, May 29, 2026

Women's T-20 World Cup 2026 : ३३ सामने, १८ महिला पंच !

Women's T-20 World Cup 2026 : ३३ सामने, १८ महिला पंच !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०२६ महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी सामनाधिकारी पथकाची घोषणा केली असून सलग तिसऱ्यांदा संपूर्ण महिला पंच आणि सामनाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिलांच्या क्रिकेटमधील वाढत्या सहभागाला आणि नेतृत्वाला प्रोत्साहन देणारा हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे.

इंग्लंड आणि वेल्स येथे १२ जूनपासून सुरू होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत एकूण ३३ सामने खेळविण्यात येणार असून त्यासाठी १४ पंच आणि चार सामनाधिकारी जबाबदारी सांभाळणार आहेत. या स्पर्धेत कॅन्डेस ला बोर्डे, गायत्री वेणुगोपालन, केरिन क्लास्टे आणि शाथिरा जाकीर जेसी या चार अधिकाऱ्यांचा प्रथमच विश्वचषकातील समावेश करण्यात आला आहे. तर २०२४ च्या स्पर्धेतील नऊ अधिकाऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी पंच क्लेअर पोलोसाक या सर्वाधिक अनुभवी अधिकारी ठरणार असून त्या सहाव्यांदा महिला टी-२० विश्वचषकात पंच म्हणून काम पाहणार आहेत. यापूर्वी त्यांनी या स्पर्धेत २२ सामन्यांमध्ये पंच म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्याचप्रमाणे जॅक्वलीन विल्यम्स आणि किम कॉटन या दोघी पाचव्यांदा विश्वचषकातील पंचपद भूषवणार असून प्रत्येकी १९ सामन्यांचा अनुभव त्यांच्या नावावर आहे. सामनाधिकारी पथकात शांद्रे फ्रिट्झ, जी. एस. लक्ष्मी आणि मिशेल परेरा यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत न्यूझीलंडच्या ट्रुडी अँडरसन यांचाही समावेश करण्यात आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >