Friday, May 29, 2026

IPL 2026 : नव्या युगाची चाहूल...!

IPL 2026 : नव्या युगाची चाहूल...!

वैभव सूर्यवंशीचे क्रिकेटविश्वाला वेड

आयपीएलमध्ये दरवर्षी नवे तारे चमकतात, काही खेळाडू मोठ्या रकमांमुळे चर्चेत राहतात, तर काही आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे. मात्र आयपीएल २०२६ मध्ये जे घडत आहे, ते केवळ ‘ब्रेकथ्रू’ नाही, तर एका नव्या युगाची सुरुवात असल्यासारखे वाटत आहे. राजस्थान रॉयल्सचा अवघा १५ वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यवंशी हा आता फक्त युवा प्रतिभा राहिलेला नाही, तर भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठा चर्चेचा विषय बनला आहे. या मोसमात सूर्यवंशीने ज्या पद्धतीने अनुभवी गोलंदाजांना अक्षरशः हतबल केले आहे, ते पाहता क्रिकेटविश्व थक्क झाले आहे. जसप्रीत बुमराह, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार यांसारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजांविरुद्ध तो ज्या सहजतेने फटकेबाजी करत आहे, ती एखाद्या अनुभवी फलंदाजालाही लाजवेल अशी आहे. विशेष म्हणजे, हा खेळाडू अजून किशोरवयीन आहे. सूर्यवंशीची या मोसमातील ६८० धावांची कमाई आणि तब्बल २४२.८५ चा स्ट्राइक रेट ही आकडेवारी केवळ प्रभावी नाही, तर आयपीएलच्या इतिहासात अभूतपूर्व मानली जात आहे. एका मोसमात ६०० पेक्षा अधिक धावा करताना २०० च्या वर स्ट्राइक रेट राखणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. एवढेच नव्हे, तर त्याने ६५ षटकार ठोकत ख्रिस गेलचा एका मोसमातील सर्वाधिक षटकारांचा विक्रमही मोडला. गेल आणि आंद्रे रसेल यांसारख्या ‘पॉवर हिटर्स’नाही त्यांच्या सर्वोत्तम मोसमात हा टप्पा गाठता आला नव्हता.

सूर्यवंशीच्या या कामगिरीमुळे आता त्याची तुलना थेट विराट कोहलीच्या २०१६ च्या ऐतिहासिक मोसमाशी होऊ लागली आहे. २०१६ मध्ये कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून खेळताना ९७३ धावांचा विक्रमी पाऊस पाडला होता. तो मोसम आजही आयपीएल फलंदाजीचा सर्वोच्च मानदंड मानला जातो. त्या वेळी कोहली आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रचंड अनुभव, जागतिक स्तरावरील दबाव आणि नेतृत्वाची जबाबदारी त्याच्याकडे होती. मात्र सूर्यवंशीच्या बाबतीत चित्र पूर्णपणे वेगळे आहे. क्रिकेटच्या प्राथमिक टप्प्यात असलेला हा मुलगा आयपीएलसारख्या स्पर्धेत इतक्या सहजतेने राज्य करत आहे, हेच त्याच्या कामगिरीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य मानले जात आहे. कोहलीने २०१६ मध्ये गुजरात लायन्स, रायझिंग पुणे सुपरजायंट आणि पंजाब किंग्जविरुद्ध शतके झळकावत संपूर्ण स्पर्धा गाजवली होती. दुखापत असूनही पंजाबविरुद्ध ५० चेंडूंत ११३ धावांची खेळी करत त्याने जिद्दीचे दर्शन घडवले होते. त्याचा १५२ चा स्ट्राइक रेट त्या काळात अविश्वसनीय मानला जात होता.

मात्र सूर्यवंशीने फलंदाजीची व्याख्याच बदलल्यासारखे वाटत आहे. त्याची १७ चेंडूंत ५२ धावांची सुरुवातीची खेळी, आरसीबीविरुद्ध ७८ धावांची विस्फोटक खेळी, ३७ चेंडूंत झळकावलेले शतक आणि लखनऊविरुद्ध ३८ चेंडूंत ९३ धावांची धडाकेबाज खेळी यामुळे राजस्थानला अनेक सामने एकहाती जिंकता आले. परंतु त्याच्या मोसमातील सर्वात मोठा क्षण ठरला तो सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा एलिमिनेटर सामना. दबावाच्या परिस्थितीत सूर्यवंशीने केवळ २९ चेंडूंत सामन्याचे चित्र काही षटकांत बदलून टाकले.

"> १२ षटकारांसह त्याने एसआरएचच्या गोलंदाजांचा आत्मविश्वासच खच्ची केला. ख्रिस गेलचा ३० चेंडूत शतकाचा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर तो पोहोचला होता. या मोसमात सूर्यवंशीने केवळ धावा केल्या नाहीत, तर टी-२० क्रिकेटच्या अपेक्षाच बदलून टाकल्या आहेत. पॉवरप्लेचा अर्थ, स्ट्राइक रेटचे महत्त्व आणि धावगतीची व्याख्या यांना त्याने नवी दिशा दिली आहे. विराट कोहलीचा २०१६ चा मोसम हा फलंदाजीतील परिपूर्णतेचा नमुना होता; तर वैभव सूर्यवंशीचा २०२६ चा मोसम हा निडरतेचा, विस्फोटकतेचा नव्या पिढीच्या आत्मविश्वासाचा चेहरा बनला आहे. कोणता मोसम अधिक महान, यावर मतभेद होऊ शकतात; पण एक गोष्ट निश्चित आहे, आयपीएलने याआधी वैभव सूर्यवंशीसारखा ‘बॅटिंग फ्रीकशो’ कधीच पाहिला नव्हता. पण आकडेवारीच्या पलीकडे जाऊन त्याने जे साध्य केले आहे, ते भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. कारण हा केवळ एका खेळाडूचा उदय नाही, तर नव्या युगाची चाहूल आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >