Madhya Pradesh : ४२ नवरदेव लग्नमंडपात वाट पाहत राहिले, पण एकही नवरी आली नाही; सामूहिक विवाहाच्या नावाखाली मध्य प्रदेशात लाखोंचा गंडा!

अंगावर भरजरी शेरवानी, गळ्यात सुवासिक झेंडूच्या फुलांचे हार, हातात आनंदाने आणलेले मिठाईचे डब्बे आणि डोळ्यांत सुखी संसाराची स्वप्ने... अशा मोठ्या उत्साहात तब्बल ४२ नवरदेव आपल्या कुटुंबियांसह विवाहस्थळी दाखल झाले होते. मात्र, ज्या क्षणाची ते आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आलाच नाही. काही वेळातच त्यांच्यासमोर एक अशी धक्कादायक हकीकत आली, ज्याने उपस्थित सर्वांनाच सुन्न केले. लग्नमंडपात एकही नवरी आलीच नव्हती! अनाथाश्रमातील मुलींशी लग्न लावून देण्याच्या बहाण्याने एका टोळीने या सर्व तरुणांची सामूहिक विवाहाच्या नावाखाली फसवणूक केल्याचा संतापजनक प्रकार मध्य प्रदेशातील देवासमध्ये (Madhya Pradesh) उघडकीस आला आहे.



ग्रामीण तरुणांच्या भावनांशी खेळ


पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे प्रकरण केवळ आर्थिक लुटीपुरते मर्यादित नसून, ग्रामीण भागातील साध्या-भोळ्या तरुणांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भावनांशी खेळणारा एक मोठा मानसिक छळ आहे. आरोपींनी विश्वास संपादन करण्यासाठी इंदूरमधील एका नामांकित ‘मातृ छाया आश्रमा’च्या नावाचा गैरवापर केला होता. रविवारी दुपारपर्यंत ज्या विवाहस्थळी सनई-चौघड्यांचे सूर आणि आनंदाचे वातावरण असायला हवे होते, तिथे संध्याकाळपर्यंत फसवणूक झाल्याचे समजताच तीव्र संताप, अश्रू आणि निराशेचे सावट पसरले होते.



सोशल मीडियावरील मॉडेल्सचे फोटो दाखवून जाळ्यात ओढले


या रॅकेटने तरुणांना जाळ्यात ओढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि खोट्या कथांचा आधार घेतला होता. लग्न ठरवण्यापूर्वी मध्यस्थांनी प्रत्येक नवरदेवाच्या मोबाईलवर मुलींचे फोटो पाठवले होते. "या मुली अतिशय गरीब असून अनाथाश्रमात वाढल्या आहेत, त्यामुळे त्या कोणत्याही अटीशिवाय लगेच लग्नास तयार आहेत," असे सांगून तरुणांचा विश्वास जिंकला. यासाठी प्रत्येकाकडून ‘नोंदणी शुल्क’ म्हणून १५,००ै ते २५,००० रुपये उकळण्यात आले.


पीडित नवरदेव राहुल याने आपली व्यथा मांडताना सांगितले, "आम्हाला इंदूरच्या आश्रमातील मुलींचे फोटो दाखवण्यात आले होते, जे प्रत्यक्षात सोशल मीडियावरून डाऊनलोड केलेले मॉडेल्सचे फोटो निघाले. आम्हाला संसारोपयोगी साहित्य हुंडा म्हणून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते आणि आदल्या दिवशीच देवासला बोलावले होते. पण आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा संपूर्ण मंडप रिकामा होता आणि सर्व आयोजकांचे फोन बंद झाले होते."



‘घरून हळद-मेहंदी लावून येऊ नका!’


फसवणूक करणाऱ्या या टोळीने कोणालाही संशय येऊ नये म्हणून अत्यंत चलाखीने नियोजन केले होते. पीडित नवरदेव अशोकने दिलेल्या माहितीनुसार, आयोजकांनी सर्वच वऱ्हाडींना एक अजब अट घातली होती. त्यांनी सांगितले होते की, "कोणीही घरून हळद किंवा मेहंदीचे विधी करून यायचे नाही. लग्न कपडे आणि विवाहाचे सर्व विधी थेट विवाहस्थळीच केले जातील." यामुळे तरुणांनी घरगुती पातळीवर कोणतेही मोठे आयोजन केले नाही आणि टोळीचे बिंग फुटायला उशीर झाला.



मध्यरात्रीपर्यंत नवरीची वाट पाहिली


भोपाळहून आलेल्या ओमप्रकाश यांच्या कुटुंबानेही अशाच प्रकारे मोबाईलवर फोटो पाहून आपल्या भावाचे लग्न ठरवले होते. कागदपत्रांची ऑनलाइन पूर्तता केल्यानंतर ते मोठ्या आशेने देवासला पोहोचले. एका पीडित नवरदेवाच्या बहिणीने रडवेला होऊन सांगितले की, "आम्ही लग्नासाठी गाड्या भाड्याने केल्या होत्या, अनेक नातेवाईक सोबत होते. तिथे पोहोचल्यावर आयोजक फोनवर सांगत राहिले की, ‘मॅडम नवरी मुलींना घेऊन रस्त्यातच आहेत, गाडी ट्रॅफिकमध्ये अडकली आहे.’ पण मध्यरात्रीपर्यंत तिथे कोणीच फिरकले नाही. सर्वांसमोर आमची मोठी नाचक्की झाली आणि आम्हाला रिकाम्या हाताने परतावे लागले."



मुख्य सूत्रधार पती-पत्नी गजाआड


२४ मे रोजी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर देवासच्या बँक नोट प्रेस पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली. अनेक पीडित तरुणांनी एकत्र येत पोलिसांत धाव घेतली. पोलीस ठाण्याच्या प्रभारी प्रीती कटारे यांनी सांगितले की, "गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि अवघ्या काही तासांत या रॅकेटचा मुख्य सूत्रधार मुकेश आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे." हे आरोपी मूळचे विदिशा जिल्ह्यातील रहिवासी असून, पोलिसांनी त्यांची गुन्ह्याची पद्धत (Modus Operandi) समजून घेण्यासाठी आणि या टोळीने आतापर्यंत इतर किती राज्यांत किंवा जिल्ह्यांत अशा प्रकारे तरुणांना लुबाडले आहे, याचा तपास करण्यासाठी एक विशेष पथक विदिशाला रवाना केले आहे. तसेच ज्या आश्रमाच्या नावाचा गैरवापर केला, त्याचीही चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला

Independence Day 2026 : तिरंगा, २१ तोफांची सलामी आणि ‘वंदे मातरम्’चा निनाद; लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा दिमाखदार सोहळा

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील ऐतिहासिक लाल

Independence Day 2026 : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google Doodleची खास कलाकृती; भारतीय वस्त्रकलेतून दिसली सांस्कृतिक विविधता

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google ने आपल्या होमपेजवर खास आणि रंगीबेरंगी Doodle सादर करून