Sunday, May 24, 2026

Pro-Wrestling League: 'प्रो रेसलिंग लीग'मधून थेट आंतरराष्ट्रीय आखाड्यात!

Pro-Wrestling League: 'प्रो रेसलिंग लीग'मधून थेट आंतरराष्ट्रीय आखाड्यात!

नवी दिल्ली : भारतातील प्रतिभावान आणि युवा मल्लांसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी '१७ आणि २३ वर्षांखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप' २३ ते ३१ मे २०२६ दरम्यान व्हिएतनाममधील दा नांग येथे खेळवली जात आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी भारतीय संघात 'प्रो रेसलिंग लीग २०२६' मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अनेक युवा मल्लांची निवड झाली आहे.

प्रो रेसलिंग लीग २०२६ मधील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ४ प्रमुख युवा मल्लांनी भारतीय संघात आपले स्थान पक्के केले आहे. युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरासाठी तयार करण्यात ही व्यावसायिक लीग किती प्रभावी व्यासपीठ ठरत आहे, हे या निवडीवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. चंदरमोहन आणि सचिनवर पुरुषांची मदार पुरुषांच्या २३ वर्षांखालील फ्रीस्टाईल गटामध्ये 'पंजाब रॉयल्स' संघाचा स्टार खेळाडू चंदरमोहन ७९ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. चंदरमोहन हा विद्यमान आशियाई विजेता असल्याने त्याच्याकडून सुवर्णपदकाची मोठी अपेक्षा आहे, तर 'हरियाणा थंडर्स' संघाचा महत्त्वाचा सदस्य असलेला सचिन मोर ८६ किलो वजनी गटात आपले नशीब आजमावणार आहे.

तर महिलांच्या गटामध्येही 'हरियाणा थंडर्स'च्या दोन तगड्या खेळाडूंना संधी मिळाली आहे. ५९ किलो वजनी गटात नेहा भारताचे प्रतिनिधित्व करेल. नेहाने यापूर्वी २० वर्षांखालील जागतिक स्पर्धेत कांस्यपदक, तर १७ वर्षांखालील आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. दुसरीकडे, ७६ किलो वजनी गटात भारताचा उदयोन्मुख तारा काजल मैदानावर उतरेल. काजल ही विद्यमान २० वर्षांखालील जागतिक विजेती, १७ वर्षांखालील जागतिक विजेती आणि २० वर्षांखालील आशियाई विजेती आहे. तिच्या या सुवर्ण कामगिरीमुळे संपूर्ण आशियाचे लक्ष तिच्यावर असेल.

प्रो रेसलिंग लीगची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे यामुळे भारतीय मल्लांना जागतिक दर्जाच्या खेळाडूंसोबत सराव, आधुनिक प्रशिक्षण आणि तगड्या स्पर्धेचा अनुभव मिळतो. त्यामुळे भारतीय खेळाडूंमध्ये आत्मविश्वास, तांत्रिक कौशल्य आणि आंतरराष्ट्रीय दबावाखाली खेळण्याची क्षमता वेगाने विकसित होत आहे. लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी अखिल गुप्ता यांनी भारतीय कुस्तीला व्यावसायिक आणि शाश्वत व्यासपीठ देण्याचा जो संकल्प केला होता, तो आता प्रत्यक्षात येताना दिसत आहे. दा नांग येथे होणाऱ्या या स्पर्धेत आशियातील अनेक बलाढ्य युवा मल्ल सहभागी होणार असून भारताकडूनही दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा