Thursday, May 21, 2026

Sanjay Shirsat : नेतृत्त्वाबाबत संभ्रम असल्याने राष्ट्रवादीचे अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात

Sanjay Shirsat : नेतृत्त्वाबाबत संभ्रम असल्याने राष्ट्रवादीचे अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात

मंत्री संजय शिरसाट यांचा दावा; राष्ट्रवादीकडून वृत्ताचा इन्कार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या नेतृत्वाच्या मुद्द्यावरून मोठे संभ्रमाचे वातावरण असून, त्यांचे अनेक प्रमुख नेते सध्या आमच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केला आहे. मात्र, या वावड्यांमध्ये काडीचेही तथ्य नसल्याचा पलटवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला आहे.

शिरसाट म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे यावरून कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वांमध्येच गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पक्षाचे भविष्य अनिश्चित वाटत असल्याने अनेक वरिष्ठ नेते आणि आमदार पर्यायाच्या शोधात आहेत. यातील बरेच जण सातत्याने आमच्या संपर्कात असून योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी शिरसाट यांच्या दाव्याचा समाचार घेतला आमदार आणि नेते फुटण्याच्या बातम्या केवळ अफवा असून विरोधक आणि मित्रपक्षांतील काही नेत्यांकडून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमचा पक्ष आणि सर्व लोकप्रतिनिधी नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, महायुतीमध्ये अशा पद्धतीची विधाने करणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. संजय शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांसमोर अशी पतंगबाजी करण्याऐवजी महायुतीचा धर्म पाळावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >