जीवनगंध - पूनम राणे
आपल्या मुलाचं जगणं अर्थपूर्ण आणि आनंदी होऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि आत्मविश्वास वाढावा असं अनेक पालकांना वाटत असतं. आपल्या पाल्याला कोणता तरी छंद असावा असे मनोमन वाटत असते. कारण छंदातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण होऊ शकते. आपले जीवन क्षेत्र निवडण्यास मदतही होते. परंतु आपल्या मुलाला तू हेच व्हायला हवे. असे न सांगता तुला हवं ते क्षेत्र निवड, असे सांगणारे पालक हाताच्या बोटावर मोजण्या इतपत असतात. अशाच एका मुलाची कहाणी आजची. टीव्हीवर चालणाऱ्या मुलाखतीत प्रश्न विचारला गेला होता, आपल्या यशाचं गमक कोणतं?
आयुष्यात मी थ्री‘डी’चा अंगीकार केला. ते तीन डी म्हणजे डिझायर, डेडिकेशन, डिसिप्लिन. मी माझं ध्येय ठरवलं, ते ध्येय पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आणि त्यासाठी आवश्यक असणारी शिस्तही पाळली. ही मुलाखत होती, ज्यांना क्रिकेटमधील देव संबोधले जाते, अशी क्रिकेटची आवड असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची अर्थात सचिन तेंडुलकर यांची.
ते सांगतात, ‘वडिलांनी सल्ला देऊन समजावण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. ते गोष्ट सांगायचे, त्या गोष्टीमध्ये एक संदेश मात्र नक्की असायचा, ते म्हणायचे तुला यश मिळत जाईल तेव्हा कशामुळे हे यश मिळतंय, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. यश मिळाल्यानंतर पुढे काय करायचे या गोष्टी आयुष्यात चालतच राहतील, पण तुला क्रिकेटमुळे एवढे नाव जगात मिळत आहे. क्रिकेटमुळे एवढा आदर मिळतो आहे. तेव्हा क्रिकेटमुळे हे सगळं मिळतंय हे लक्षात ठेवलं तर पुढे तुझी नेहमी प्रगती होत राहील. पण ज्या दिवशी तू हे विसरशील किंवा लोक गृहीत धरायला लागतील की हे असंच होणार आहे, त्यावेळी तुझी घसरण सुरू होईल. पैसा काय कधी असेल, कधी नसेल, पण तुझा खेळ तुझ्याकडे नेहमी असेल. तू खेळाचा आदर्श कर. आणि खेळाची पूजा कर. ते सांगतात, आयुष्यभर वडिलांचे हे वाक्य मी लक्षात ठेवले आहे. माझ्या हृदयात क्रिकेट आहे मैदानावर १०० टक्के परफॉर्मन्स देण्यासाठी मला वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. ते आपोआपच होतात.
मॅच सुरू होण्याआधी मी प्लॅनिंग करत असतो. त्यावेळी मला शांतता हवी असते. माझ्या डोक्यावरचे प्रेशर कसं कमी करता येईल, माझ्या क्रिकेटमध्ये काहीच येता कामा नये यासाठी घरचे सर्वजण मदत करीत असतात. एकांतात मी प्लॅनिंग करत असतो. त्यावेळी कुटुंबातील कोणीही सदस्य माझ्यामध्ये येत नाही. त्यामुळे खेळताना कोणतेही प्रकारचे प्रेशर माझ्या डोक्यावर नसतात. खेळताना फक्त नजरेसमोर खेळ असतो आणि घरातील प्रेशर सगळे सांभाळतात. कारण देशासाठी खेळणं यापेक्षा दुसरी मोठी गोष्ट माझ्यासाठी नाही आणि माझ्या कुटुंबाचेही ते स्वप्न आहे. प्रामाणिकपणा आणि मेहनत हा माझ्या करिअरचा पाया आहे; परंतु याचे सगळे श्रेय माझ्या वडिलांना जाते. माणसाने आयुष्यात कसं जगायला पाहिजे याबद्दलची त्यांची जी नीतीमूल्यं होती ती फक्त मी सांभाळली.
माझ्या यशात समाजाचाही हातभार आहे. माझ्यासाठी लोकांच्या सदिच्छा ही सर्वात मोठी ताकद आहे. भारतीय संस्कृतीत वाढताना मोठ्यांचा आदर करणे, त्यांचे आशीर्वाद सोबत असणं ही विशेष गोष्ट आहे. आयुष्यात जेव्हा अडथळे येतात तेव्हा सर्वांच्या सदिच्छा अडथळ्याच्या पलीकडे घेऊन जातात. माझ्या बाबतीत भरपूर वेळा अडथळे आले. मला दुखापत झाली. तेव्हा कुठून कुठून मेसेजेस, औषधे आली. या सगळ्या शुभेच्छा माझ्यासाठी अतिशय महत्त्वाच्या होत्या. हा एक माझा आयुष्यातला प्रत्यक्ष सपोर्ट होता. नितीन वागळे सर यांनी घेतलेल्या मुलाखतीला क्रिकेटचे मास्टर सचिन तेंडुलकर यांनी दिलेले हे उत्तर.
विद्यार्थी मित्रांनो, कर्तृत्वाची उंची पहाडासारखी असूनही अत्यंत नम्रपणे समाजाचे ऋण व्यक्त करणारे, अनेक चॅरिटेबल ट्रस्ट, तसेच अनाथ, अपंग मुलांना आपले नाव पुढे करू नका असे सांगत केवळ वैयक्तिक समाधानासाठी देणगी रूपात मदत करणारे, आपले सर्वांचे आयडॉल म्हणजे सचिन तेंडुलकर. त्यांचा हा आदर्श आपण घ्यायला हवा. तरच आपल्या जीवनाला गंध प्राप्त होईल.