श्रीनिवास बेलसरे
ज्यांना आई नाही अशांना हुरहूर लावणारा एक सिनेमा आला होता सुमारे ६३ वर्षांपूर्वी! तो पाहताना रडला नाही असा मराठी मुलगा त्याकाळी महाराष्ट्रात तरी सापडला नसता. दिग्दर्शक होते यशवंत पेठकर. सिनेमाचे नाव ‘मोलकरीण’ असले तरी तो एखाद्या मोलकरणीच्या जीवनावरचा चित्रपट नव्हता. सिनेमा होता एका प्रेमळ आईच्या शोकांतिकेवर आधारलेला. यात एकापेक्षा एक दिग्गज कलाकार होते - सुलोचना लाटकर, रमेश देव, सीमा देव, इंदिरा चिटणीस, दामूअण्णा मालवणकर आणि रवी पटवर्धन. सिनेमाला भावमधुर संगीत दिले वसंत देसाई यांनी, तर त्याची अर्थपूर्ण गाणी लिहिली होती मराठीच्या दोन दिग्गज गीतकारांनी. तत्कालीन मराठी समाजाच्या नाडीवर कायम हात ठेवून असलेले कविवर्य पी. सावळाराम आणि साध्या सध्या प्रसंगातूनही श्रोत्यांच्या मनावर अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि उच्च जीवनमूल्यांचे संस्कार करणारे महाराष्ट्राचे वाल्मिकी गदीमा! गायकांत आशाताई आणि लतादीदींबरोबर चक्क तलत मेहमूद होते.
खेड्यातला एक मुलगा शिक्षण घेण्यासाठी पुण्यात येतो आणि शहरी संस्कृतीच्या प्रचंड प्रभावामुळे बहकून जाऊन घरापासून, गावापासून, अगदी त्याच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आई-वडिलांपासून तुटतो. त्याला आपल्या साध्याभोळ्या, ग्रामीण आई-बापाची लाज वाटू लागते. त्यांना भेटायला तो गावाकडे एकदाही फिरकत नाही. त्याच्यावरील प्रेमाने खंतावलेली आई शहरात येते आणि त्याच्या पत्नीशी बोलून त्याच्याकडे मोलकरीण म्हणून कामाला लागते. मात्र पत्नी (सीमा) तिला एक अट घालते - तिने कधीही रमेश देवच्या खोलीत जायचे नाही किंवा त्याला दिसायचेसुद्धा नाही.
एकदा त्यांचा लहान मुलगा भयंकर आजारी पडतो आणि योगायोगाने रमेश देव आणि सुलोचनाची समोरासमोर भेट होते. आईलाच आपल्या घरात मोलकरणीच्या रूपात पाहून त्याला चक्कर येते, खूप पश्चाताप होतो! तो पत्नीला सत्य सांगेपर्यंत सुलोचना घर सोडून तडक गावाकडे निघून जाते. मुलाच्या आजारपणात आईने अतिशय प्रेमाने, केलेल्या सेवेमुळे मुलगा बरा झालेला असतो. त्या सर्वांमुळे बदललेले रमेश देव आणि सीमा आईला शोधत गावाकडे येतात आणि सर्वांची भेट होऊन शेवट सुखांत होतो. मोलकरणीचे काम करत असताना सुलोचना रमेश देवच्या मुलाला झोपवत असते. तेव्हा ती अंगाईसारखे एक गाणे म्हणते. आशाताईनी अतिशय भावुक आवाजात गायलेले ते गाणे ऐकताना त्याकाळी अवघे प्रेक्षागार अस्वस्थ होई. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू येत. पी. सावळाराम हे मुळातच अतिशय हृदयस्पर्शी, भावुक गाणी लिहिणारे कवी. त्यांनी सुमारे ६३ वर्षांपूर्वीच्या शांत, समाधानी, श्रद्धावान महाराष्ट्राची मानसिकता फक्त तीन कडव्यात चित्रित केली होती. गाण्याचे शब्द होते -
‘देव जरी मज कधी भेटला,
माग, हवे ते माग म्हणाला,
म्हणेन प्रभु रे माझे सारे जीवन देई,
मम बाळाला...’
हल्लीसारखे पैसा, संपत्ती, समाजातील प्रतिमा किंवा नोकरी- व्यवसायातून मिळालेल्या प्रतिष्ठेपुढे, रक्ताची नाती, प्रेम, जिव्हाळा, नैतिकमूल्ये, देवधर्म, श्रद्धा हे सर्व त्या काळी दुय्यम ठरत नसे. साधासरळ, देवभोळा मराठी समाज शांत समाधानी जीवनात खूश असायचा. त्यामुळे ओळख लपवलेली आजी नातवावरील निस्सीम प्रेमातून त्याच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना करते आहे, असा प्रसंग दिग्दर्शकाने गीतकाराला दिलेला होता. त्यावर अंगाईसारखे एखादे गाणे लिहायचे होते. पी. सावळाराम यांनी त्यांच्या लेखणीतील जन्मजात ओलाव्याने या प्रसंगाचे सोने करून टाकले! यासाठी त्यांना साथ मिळाली ती आपल्या वाट्याला आलेले प्रत्येक गाणे शांतपणे समजावून घेऊन, समरसून गाणाऱ्या आशाताईंची!
आजी तिच्या नातवासाठी काय मागते आहे, बघा. ती म्हणते त्याला कृष्णामाई आणि गोदावरी स्नान घालतील इतका त्याचा व्यवसाय मोठा होऊ दे म्हणजेच त्याचे यश पूर्ण मराठी मुलुखात पसरू दे. माझ्या बाळाची परमेश्वरावरची श्रद्धा दृढ राहावी, त्याच्या यशाला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून सगळ्या महाराष्ट्राची आई असलेली पंढरपूरची रखुमाईच त्याला तीट लावू दे. संत-महंतांवरची त्याची श्रद्धा अढळ राहावी म्हणून त्याच्या कानात रोज ज्ञानेश्वरांच्या ओव्या पडू दे. खुद्द मुक्ताबाईच त्याला त्या ओव्या
ऐकवत निजवू दे.
‘कृष्णा गोदा स्नान घालू दे,
रखुमामाई तीट लावू दे,
ज्ञानेशाची गाऊन ओवी,
मुक्ताई निजवू दे तुजला...’
त्याकाळी करिअर, पैसा, भौतिक सुखाची जास्तीत जास्त साधने मिळवणे त्यासाठी सर्व नातीगोती, परस्परप्रेम, जिव्हाळा, आंतरिक समाधान, इतकेच काय उभे आयुष्य, पणाला लावणे हल्लीसारखे लोकांच्या मानसिकतेत खोल रुजलेले नव्हते. सतत मनात एक वखवख बाळगून अशांत, अस्वथ्य आयुष्य घालवणे अगदी क्वचित कुणी स्वीकारत असे. तेव्हा खऱ्या सुखाचा अर्थ प्रामाणिकपणे मिळवलेला रोजगार, अत्यावश्यक तेवढ्या सुखसोयी आणि आंतरिक समाधान, इतकाच होता. त्यामुळे यथार्थ, यशस्वी जीवनाची कल्पना मोठमोठ्या आदर्शांशी निगडित होती. लोकांना महाभारत, रामायण, महाराष्ट्राचे आधुनिक दैवत ठरलेल्या शिवरायांचे चरित्र नुसते महत्त्वाचे न वाटता अनुकरणीय वाटायचे. लोक आपल्या मुलांनी या आदर्शांवर आधारित जीवन जगावे अशी आई-वडिलांची मनोमन इच्छा असायची. आजच्या पिढीला हे सगळे अनोळखी, अव्यवहारिक, कदाचित खुळेपणाचे वाटेल, पण ६३ वर्षांपूर्वीचा बहुतांश मराठी समाज असाच सात्त्विक, स्वच्छ आणि सुंदर होता. कविवर्य सावळाराम, तर या जीवनपद्धतीचे सिद्धहस्त भाष्यकारच होते. म्हणून त्यांनी उभी केलेली सुलोचनाबाईंच्या अतिशय सात्त्विक आजीची देवाकडे मागणी आहे की माझ्या नातवात शिवरायांचा शूरपणा येऊ दे, त्याला कर्णाचा उदारपणा शिकव. स्वाभिमानासाठी घर सोडून १२ वर्षे तपश्चर्या करणाऱ्या ध्रुवबाळाचा करारीपणा त्याला दे. मात्र सोबत चिलियाबाळाने जशी आई-वडिलांसाठी जीव देण्याची तयारी दाखवली होती तसे धैर्यही त्याच्या ठायी बसव.
‘शिवरायाच्या मागन शौर्या,
कर्णाच्या घेईन औदार्या,
ध्रुव-चिलीयाच्या अभंग प्रेमा,
लाभु दे चिमण्या राजाला...’
ज्यांच्या गाण्याची सुरुवातच काही वेळा आईवरील शिव्यांनी होते असे हल्लीचे गीतकार आणि त्यांची भिकार गाणी पाहिली की वाटते, अरेरे, कुठे आणून ठेवलीये त्यांनी आमच्या ज्ञानोबा माउलींची, ‘अमृताशी पैजा जिंकणारी’, मायबोली!