Wednesday, May 13, 2026

Tamil Nadu : विजय यांचा पहिला ‘यू-टर्न’, विरोधकांच्या टीकेनंतर 'त्या' व्यक्तीची नियुक्ती रद्द

Tamil Nadu : विजय यांचा पहिला ‘यू-टर्न’, विरोधकांच्या टीकेनंतर 'त्या' व्यक्तीची नियुक्ती रद्द

Tamil Nadu : तमिळनाडूच्या राजकारणात मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी घेतलेला एक मोठा निर्णय कालपासून चर्चेत राहिला. त्या निर्णयाने विजय यांच्यावर जोरदार टीका झाली , ज्या कारणामुळे अखेर त्यांनी यु टर्न घेत ज्योतिषी राधान पंडित वेट्रिवेल यांची ‘विशेष कार्य अधिकारी’ (OSD) पदावरील नियुक्ती अवघ्या काही तासांत रद्द केली आहे.

तमिळनाडूच्या राजकारणात मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके (TVK) सरकारने सत्तेत येताच पहिला मोठा प्रशासकीय फेरबदल केला आहे. तीव्र विरोध आणि मित्रपक्षांच्या दबावानंतर, मुख्यमंत्री विजय यांनी आपले निकटवर्तीय आणि ज्योतिषी थिरु रिक्की राधान पंडित वेट्ट्रीवेल यांची ‘विशेष कार्य अधिकारी’ (OSD) पदावरील नियुक्ती अवघ्या काही तासांत रद्द केली आहे.

विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर, मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी मंगळवारी थिरु रिक्की राधान पंडित वेट्ट्रीवेल यांची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयात केली होती. निवडणुकीपूर्वी थिरु रिक्की राधान पंडित वेट्ट्रीवेल यांनी विजय यांच्या पक्षाचा विजय होईल, असं भाकीत केलं होतं आणि निकालानंतर ते भाकीत खरंही ठरलं. विजय मुख्यमंत्री झाल्यानंतर थिरु रिक्की राधान पंडित वेट्ट्रीवेल थेट त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि अभिनंदन केलं आणि त्यांनंतर सरकारमध्ये मोठं पद मिळाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

 राजकीय वर्तुळातून टीकेची झोड

थिरु रिक्की राधान पंडित वेट्ट्रीवेल यांच्या नियुक्तीची बातमी समोर येताच राजकीय वर्तुळातून टीकेची झोड उठली. विशेषतः विजय यांच्यासोबत सत्तेत असलेल्या मित्रपक्षांनीच यावर जाहीर नाराजी व्यक्त केली. काँग्रेस खासदार शशिकांत सेंथिल यांनी सोशल मीडियावर सवाल केला की, “एका ज्योतिषाला ओएसडी पदाची गरजच काय? हे अनाकलनीय आहे. तर VCK (विदुथलाई चिरुथाईगल कात्ची) पक्षाचे सरचिटणीस डी. रविकुमार यांनी ही नियुक्ती ‘असंवैधानिक’ असल्याचे म्हटले.

“धर्मनिरपेक्ष सरकारमध्ये अशा नियुक्त्या स्वीकारू शकत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याऐजी सरकार ज्योतिषशास्त्राला प्रोत्साहन देत आहे,” अशी टीका त्यांनी केली. तर सरकारी खर्चाने अशा व्यक्तीची नियुक्ती करणे म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखे आहे, असे मत सीपीएम नेते षण्मुगम यांनी व्यक्त केले.

विधानसभेतील गदारोळ आणि मित्रपक्षांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहून मुख्यमंत्री विजय यांनी नमती भूमिका घेतली. सभागृहात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, प्रेमलता विजयकांत आणि इतर नेत्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा ते गांभीर्याने विचार करतील. या भाषणानंतर अवघ्या एका तासात सरकारने अधिकृत आदेश काढून राधन पंडित यांची नियुक्ती रद्द केली.

Comments
Add Comment