Wednesday, May 13, 2026

Buldhana Shocking News : क्रूर बापाने पोटच्या लेकीचं शरीर कापलं अन् शिर धडावेगळे करत...बुलढाण्यात धक्कादायक प्रकार

Buldhana Shocking News : क्रूर बापाने पोटच्या लेकीचं शरीर कापलं अन् शिर धडावेगळे करत...बुलढाण्यात धक्कादायक प्रकार

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात (Buldhana News) उघडकीस आलेल्या एका हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाला (Madhya Pradesh) हादरवून सोडले आहे. कुटुंबाच्या प्रतिष्ठेला कलंक लावल्याच्या रागातून एका जन्मदात्या बापानेच आपल्या पोटच्या मुलीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नानंतर अवघ्या सहाव्या दिवशी सासरी जाण्यास नकार देत चुलत भावासोबतच अनैतिक संबंध ठेवणारी मुलगी बापाच्या डोळ्यात खुपली आणि त्यातूनच 'ऑनर किलिंग'चा हा थरार घडला. स्वतःच्या मुलीचे शीर धडावेगळे करून, तिचा मृतदेह दुचाकीवरून थेट मध्य प्रदेशातून बुलढाण्याच्या राजुरा शिवारात आणून टाकण्यापर्यंतची क्रूरता या बापाने दाखवली. स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठ्या शिताफीने या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.

नेमकं काय घडलं ?

या भीषण घटनेची सुरुवात २६ एप्रिल रोजी झाली. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात असलेल्या राजुरा शिवारात पोलिसांना एका तरुण महिलेचा मृतदेह अतिशय भयानक अवस्थेत सापडला. मृतदेहाचे शीर धडावेगळे केलेले होते आणि चेहरा पूर्णपणे जाळून विद्रुप करण्यात आला होता. आरोपीने एवढी खबरदारी घेतली होती की, अंगावरील कोणतीही खूण किंवा ओळख पटवणारा पुरावा शिल्लक राहू नये म्हणून मृतदेह अर्धवट जाळला होता. हा मृतदेह कोणाचा आहे? ही हत्या कुणी आणि का केली? असे अनेक अनुत्तरित प्रश्न पोलिसांसमोर उभे होते आणि या अंधाऱ्या गुन्ह्याचा तपास लावणे हे खाकी वर्दीपुढील एक मोठे आव्हान बनले होते.

सीमेपलीकडून आलेला धागा आणि तपासाला मिळालेली दिशा

बुलढाणा पोलिसांच्या हाती सुरुवातीला कोणताही ठोस धागा लागत नव्हता. मात्र, घटनेच्या सहा दिवसांनंतर, म्हणजेच १ मे रोजी एक महत्त्वपूर्ण वळण आले. शेजारील मध्य प्रदेश राज्यामध्ये असलेल्या खकनार पोलीस ठाण्यात २७ वर्षीय शिवानी नामक तरुणी हरवल्याची तक्रार नोंदवली गेली. विशेष म्हणजे, ही तक्रार तिचे ५५ वर्षीय वडील बापूराव नत्थू कळमेकर यांनीच दिली होती. बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे यांच्या रडारवर ही माहिती आली. वेळेचा अपव्यय न करता सपकाळे यांनी आपल्या पथकासह थेट मध्य प्रदेश गाठले आणि तिथून या प्रकरणाच्या तपासाचे चक्र वेगाने फिरू लागले.

अनैतिक संबंध, सक्तीचे लग्न आणि बापाची धक्कादायक कबुली

मध्य प्रदेशात पोहोचल्यानंतर पोलिसांनी संशयाच्या आधारे वडील बापूराव कळमेकर आणि त्यांचा मुलगा अजय यांच्यावर दोन दिवस पाळत ठेवली. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला, तेव्हा बापूराव यांनी आपला गुन्हा कबूल केला. चौकशीत जे सत्य बाहेर आले ते अत्यंत धक्कादायक होते. शिवानीचे सुरुवातीला तिच्या मोठ्या जावयासोबत (बहिणीचा नवरा) सूत जुळले होते. हे प्रकरण कसेबसे निस्तरले जात असतानाच, तिने स्वतःच्या चुलत भावासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले. समाजात होणारी बदनामी आणि कुजबूज थांबवण्यासाठी कुटुंबाने तिचे लग्न विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे उरकून दिले होते, जेणेकरून हे प्रकरण कायमचे मिटेल अशी त्यांची धारणा होती.

माहेरी आली अन् नको त्या अवस्थेत...

लग्नानंतर शिवानी परंपरेनुसार माहेरी आली होती. काही दिवसांनी तिचा पती तिला सासरी नेण्यासाठी आला असता, रात्रीचे वेळी घरातील सर्व पाहुणे मंडळी अंगणात झोपली होती. याच संधीचा फायदा घेत शिवानीने तिचा चुलत भाऊ आणि प्रियकर अरुण याला घरात बोलावून घेतले. दुर्दैवाने, त्याच वेळी वडील बापूराव यांनी दोघांना अत्यंत नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडले. आधीच मुलीच्या वागण्याने त्रस्त असलेल्या बापाच्या डोक्यात यावेळी संतापाची तिडीक गेली. रागाच्या भरात त्याने घरातील लोखंडी रॉड उचलला आणि स्वतःच्या मुलीवर सपासप वार करून तिला जागीच संपवले. बापानेच हा सगळा घटनाक्रम पोलिसांसमोर कथन केला.

मृतदेहाची अशी लावली विल्हेवाट

हत्येनंतर बापाचा राग शांत झाला नाही, तर त्याने पुरावे नष्ट करण्यासाठी अत्यंत थंड डोक्याने कट रचला. दुसऱ्या दिवशी शिवानीचा मृतदेह एका पोत्यात भरून तो बुलढाणा जिल्ह्यातील जळगावच्या राजूर येथील निर्मनुष्य जंगलात आणण्यात आला. पोलिसांना ओळख पटू नये म्हणून त्यांनी शिवानीचे शीर धडावेगळे केले, डोक्यावरील केस कापले, इतकेच नाही तर नाक आणि कानही कापून टाकले. शिवानीच्या हातावर तिच्या प्रियकराचे 'अरुण' नावाचे गोंदलेले टॅटू होते, ते कोयत्याने अक्षरशः सोलून काढले. शेवटी पेट्रोल ओतून मृतदेह पेटवून दिला. या सर्व भयानक कृत्यात बापाला त्याचा मुलगा अजयने साथ दिली. बुलढाणा पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत या बाप-लेकाला मध्य प्रदेशातून बेड्या ठोकल्या.

दुसऱ्या हत्येचा संशय आणि बेपत्ता प्रियकराचे गूढ

हा तपास इथेच थांबत नाही. ज्या रात्री शिवानीची हत्या झाली, तेव्हा तिचा प्रियकर अरुण तिथेच उपस्थित होता. मात्र, घटनेच्या दिवसापासून अरुण रहस्यमयरित्या बेपत्ता आहे. पोलिसांना त्याचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे 'बापाने आणि भावाने रागाच्या भरात केवळ शिवानीचीच हत्या केली की अरुणचाही काटा काढला?' असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणाला आता एका 'डबल मर्डर मिस्ट्री'चे वळण लागण्याची दाट शक्यता आहे. अरुण जिवंत आहे की शिवानीप्रमाणेच त्याचीही निर्घृण हत्या करून विल्हेवाट लावली गेली आहे, याचे खरे उत्तर अरुण सापडल्यानंतर किंवा पोलिसांच्या पुढील तपासातच उघड होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >