Tips For Save Water : मुंबईकरांनो, पाण्याचा जपून वापर करा; शुक्रवार १५ मेपासून दहा टक्के पाणीकपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने, हा पाणीसाठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय तसेच भारतीय हवामान खात्याने पुढील वर्षी येणाऱ्या अल निनो व आयओडी बाबत वर्तवलेला अंदाजानुसार कमी मान्सून प्रमाण लक्षात घेता जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार मुंबईत शुक्रवार १५ मे २०२६ पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. समाधानकारक पाऊस होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणी कपात लागू राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता हातचे राखून पाण्याचा वापर करावा लागणार आहे.



सोमवारी ११ मे २०२६ रोजीची आकडेवारी लक्षात घेता, मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये मिळून एकूण ३ लाख ४० हजार ३९९ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वार्षिक १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटरच्या तुलनेत सध्या २३.५२ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. पाणीसाठ्यावर महानगरपालिका प्रशासनाचे अत्यंत बारकाईने लक्ष असून दररोज नियोजनपूर्वक पाणीपुरवठा केला जात आहे.



एवढेच नव्हे तर, भातसा धरणातील निभावणी अर्थात राखीव साठ्यातून १,४७,०९२ दशलक्ष लीटर तर अप्पर वैतरणा धरणातील निभावणी साठ्यातून ९०,००० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला मिळणार आहे. याचाच अर्थ मुंबईसाठी पाणीसाठा उपलब्ध असून मुंबईकर नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. असे असले तरी, अलीकडे वाढलेले तापमान, पर्यायाने वाढणारे बाष्पीभवन आणि पाणीसाठा १० टक्केपेक्षा कमी झाल्यानंतर यापुढेही पाणीपुरवठा नियोजनपूर्वक करता यावा, या सर्व पैलूंचा विचार करून, खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने १० टक्‍के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.



मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्यातही शुक्रवार १५ मे २०२६ पासून १० टक्के पाणीकपात लागू राहणार आहे. समाधानकारक पाऊस होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणी कपात लागू राहणार आहे. मुंबईकर नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. दरम्यान, सर्व नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे विनम्र आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.


पाण्याची काटकसर कशी कराल ?




  1. दैनंदिन जीवनात पाण्याचा काटकसरीने वापर करणे, त्याचा अपव्यय टाळणे शक्य आहे. यासाठी पाणी बचतीच्या सवयी अंगीकाराव्यात.

  2. आवश्यक तितकेच पाणी पेल्यामध्ये घेवून प्यावे. आंघोळीसाठी शॉवरचा उपयोग न करता बादलीमध्ये पाणी घेवून आंघोळ केल्याने पाण्याची मोठी बचत होते. नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळावे.

  3. घरकामे करताना पाण्याचे नळ वाहते ठेवू नका. त्याऐवजी भांड्यांमध्ये पाणी घेवून कामे उरकावीत.

  4. वाहने धुण्यासाठी नळी न लावता भांड्यामध्ये पाणी घेवून ओल्या कापडाने वाहने पुसणे सहज शक्य असते. घरातील लादी, गॅलरी, व्हरांडा, जिने आदी धुवून काढण्याऐवजी ओल्या फडक्याने पुसून घ्या. आदल्या दिवसाचे पाणी शिळे समजून फेकू नका.

  5. वॉशिंग मशीनमध्ये एकाचवेळी शक्य तेवढे कपडे धुतल्यास, मशीनचा पर्यायाने पाण्याचा वापर कमी होवू शकतो.

  6. नळ तसेच वॉश बेसिनचे नळ यांचा प्रवाह मर्यादीत करणाऱ्या किंवा तुषार स्वरुपात पाणी प्रवाहित करणाऱया तोटी (नोझल) बाजारात सहज उपलब्ध असतात. नळांना अशा प्रकारची तोटी लावून पाण्याची तब्बल दोन तृतीयांश बचत करणे शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी त्याचप्रमाणे सर्व हॉटेल्स, उपाहारगृहे यांनी त्याचा वापर करावा.

  7. उपाहारगृहे, हॉटेल्समध्ये ग्राहकांना आवश्यक असेल तेव्हाच पेल्यांमध्ये पाणी द्यावे. अथवा पाण्याची बाटली पुरवावी. जेणेकरुन अकारण पाण्याने भरुन ठेवलेल्या पेल्यांचे पाणी वाया जाणार नाही.

  8. सर्व घरांमध्ये, गृहनिर्माण संस्थांमध्ये पाण्याची यंत्रणा, वाहिन्या तपासाव्यात. कोठेही गळती आढल्यास तात्काळ दुरुस्ती करुन घ्यावी, यातून पाण्याची बचत देखील होते व पाणी दूषित होत नाही.

  9. छतावरील पाण्याच्या टाक्या भरताना त्या ओसंडून वाहणार (ओव्हरफ्लो) नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

  10. ज्या-ज्या ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, त्या सर्व व्यावसायिक व वाणिज्यिक आस्थापनांनी देखील पाण्याचा अपव्यय टाळून बचत करता येईल, अशा कार्यपद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

SSC : दहावी परीक्षेतील गुणवंतांच्या शिक्षण समिती अध्यक्षा, महापालिका आयुक्तांच्या हस्ते सत्कार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या शालांत

BMC च्या सर्व वॉर्ड ऑफिसमध्ये शेवया, पापड, कुरडई, लोणची, सांडगे, मसाले, सुक्की मच्छी खरेदीची सुवर्णसंधी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वाळवण महोत्सवाचे

Modi's Appeal : सोने खरेदी टाळण्याच्या मोदींच्या आवाहनाला थिंक टँकचा पाठिंबा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रहितासाठी भारतीयांना एक वर्ष सोने खरेदी बंद करण्याचे आवाहन

Water Cut : मुंबईत शुक्रवारपासून दहा टक्के पाणीकपात होणार

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात झालेली घट आणि आगामी पावसाळ्याबाबतचा हवामान

PPP तत्वावर MSRTC उभारणार २०० चार्जिंग स्टेशन

मुंबई : सन २०३५ पर्यंत एसटी महामंडळातील सर्व बसेस ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याच्या दृष्टीने राज्य शासन आणि एसटी

Meghna Sakore Bordikar : 'राज्य कामगार विमा योजनेच्या सेवा अधिक सक्षम करा'

मुंबई : राज्यातील कामगारांना अधिक दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य कामगार विमा