आएगा आनेवाला...…

स्मृतीपटल; अनिल तोरणे



आजकालच्या तांत्रिक युगात सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या आहेत; पण एक काळ असा होता की लहानातील लहान बाब पूर्ण करण्यासाठीही बराच आटापिटा करावा लागत असे आणि यातून चित्रपटसृष्टीही सुटली नव्हती. गतकाळात चित्रपटनिर्मितीबरोबरच चित्रपटातील गीतांचे ध्वनिमुद्रण करणेही सोपे नव्हते; परंतु हाताशी मर्यादित साधनसामग्री असूनही संगीतकार, गीतकार आणि पार्श्वगायकांनी अशी गीते निर्माण केली की ती विसरली जाणे शक्यच नाही. आजही ती मधुर गीते कानात गुंजतात. जुन्या काळातील असेच एक गीत होते. त्याचे ध्वनिमुद्रण करणे कोणाही पार्श्वगायक आणि संगीतकाराला सोपे नव्हते; परंतु संगीतकाराने अक्षरश: कमाल केली आणि ते विशिष्ट गीत अजरामर झाले. ते गीत गाणाऱ्या पार्श्वगायिकेला चित्रपटसृष्टीची दारे उघडली गेली ती कायमचीच! इतकेच नव्हे तर त्या गायिकेशिवाय भारतीय संगीताची कल्पना करणेही अवघड होऊन बसले!


‘बॉम्बे टॉकीज’च्या ‘महल’ या चित्रपटाचे संगीत तयार झाल्यावर त्याचे संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी लता मंगेशकर यांना एक गीत गाण्यासाठी येण्याचा निरोप दिला. लता मंगेशकर यांनी त्याआधी खेमचंद प्रकाश यांच्याबरोबर काम केलेले होते. त्यांच्याविषयी लता मंगेशकर यांनी सांगितले, आम्ही सगळे खेमचंद प्रकाश यांना ‘चाचाजी’ म्हणत असू. चाचाजी कोणाशीही बोलत असत तेव्हा असे वाटायचे की ते त्या व्यक्तीला दरडावतच आहेत. मी त्या ठिकाणी पोहोचताच ते त्यांच्या पद्धतीने मला म्हणाले, लता तुला “आएगा आनेवाला आएगा...” हे गीत गायचे आहे. या गीताचा प्रसंगच (सिच्युएशन) असा आहे की हे गीत तुला अत्यंत विचारपूर्वक आणि चांगल्या पद्धतीने गावे लागेल. अशोक कुमार या चित्रपटाचे नायक आहेत आणि नायिका एक नवी मुलगी आहे. तिचे नाव मधुबाला! ती दिसायला फार सुंदर आहे. खेमचंद प्रकाश यांनी जे काही सांगितले ते ऐकल्यावर लता मंगेशकर त्यांना म्हणाल्या, की चाचाजी आधी मला गीत तर शिकवा. चाचाजी म्हणाले, ठीक आहे; प्रथम गीत लिहून घे. त्यांनी गीत लिहून घेतल्यावर चाचाजी आपला सहायक भोला याला म्हणाले, मला जसे हवे आहे तसेच लताला गीत शिकव. लता मंगेशकर यांनी गीताची सगळी माहिती घेतल्यावर खेमचंद प्रकाश यांनी त्या चित्रपटाचे दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्याशी चर्चा करून दोन दिवसांनी गीताचे ध्वनिमुद्रण करण्याचा निर्णय घेतला. त्याकाळी हल्लीप्रमाणे ध्वनिमुद्रणाचे स्टुडिओ नव्हते. चित्रपटाचे चित्रीकरण ज्या ठिकाणी होत असे त्याच ठिकाणी गीत ध्वनिमुद्रित केले जात असे.


दोन दिवसांनी ध्वनिवर्धकाच्या (माईक) पुढे उभ्या राहिलेल्या लता मंगेशकर यांना चाचाजी म्हणाले, प्रसंगाचा प्रारंभ असा आहे की, गीत सुरू होण्याच्या आधी सात-आठ ओळींचा जो लांबलचक शेर आहे तो चित्रपटाचा नायक ऐकत आहे आणि आवाज दुरून येत आहे आणि तू तर ध्वनिवर्धकाच्या अगदी जवळ उभी आहेस. या ठिकाणी उभी राहून तू शेरच्या ओळी गायल्यास तर आवाज लांबून येत आहे असे वाटणार नाही. तू असे कर, ध्वनिवर्धकापासून दूर म्हणजे त्या दाराजवळ जाऊन उभी राहा आणि एक एक ओळ गात हळूहळू चालत पुढे येत त्या वादकांच्या जवळ लावलेल्या ध्वनिवर्धकापर्यंत जा. तू त्या ध्वनिवर्धकाकडे पोहोचल्यावरच गीत सुरू होईल.


चाचाजींनी सांगितल्याप्रमाणे लता मंगेशकर स्टुडिओतील दाराजवळ जाऊन उभ्या राहिल्या आणि दारापासून ध्वनिवर्धकाकडे चालायला प्रारंभ करून त्या शेरच्या ओळी गाऊ लागल्या. पण तो शेर म्हणजे शेर होता! अखेर चौदा-पंधरा वेळा शेर गायल्यानंतर एकदाचे गीत ध्वनिमुद्रित झाले. त्याकाळी गीत फिल्मवर ध्वनिमुद्रित होत असे त्यामुळे ध्वनिमुद्रणानंतर ताबडतोब नाही पण फिल्म धुतल्यानंतर दोन-तीन दिवसांनी गीत ऐकावयास मिळत असे. तसे ते गीत दोन-तीन दिवसांनी ऐकले गेले आणि त्याला हिरवा कंदील दाखविण्यात आला. चित्रपटाचे नायक अशोक कुमार, निर्माते सावाक वाछा यांच्यासह त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्यांनीच गीताची तोंड भरून प्रशंसा केली. जेव्हा ते गीत ‘ऑल इंडिया रेडिओ’वर सर्वप्रथम लागले तेव्हा लोकांना ते कोणी गायले आहे हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा झाली. कारण त्या चित्रपटाच्या ध्वनिमुद्रिकेवर लता मंगेशकर यांच्याऐवजी त्या चित्रपटाची नायिका मधुबालाने ज्या ‘कामिनी’ची व्यक्तिरेखा साकारली होती तिलाच त्याचे श्रेय देण्यात आले होते. म्हणून ‘ऑल इंडिया रेडिओ’ने ध्वनिमुद्रिका बनविणाऱ्या कंपनीला गायिका म्हणून लता मंगेशकर यांचे नाव जाहीर करण्यास सांगितले. तसे ते जाहीर होताच लता मंगेशकर यांचे नाव सर्वत्र गाजू लागले आणि त्यांच्या गायनकलेची चर्चा सुरू झाली.


एक विचित्र विरोधाभास म्हणा किंवा अन्य काही पण ‘महल’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी हे गीत सगळीकडे गाजत असताना दुसरीकडे त्याचे जनक संगीत दिग्दर्शक खेमचंद प्रकाश मात्र रुग्णालयात आपल्या जीवनाच्या अखेरच्या घटका मोजीत होते. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच १० ऑगस्ट, १९४९ या दिवशी दुर्दैवाने वयाच्या अवघ्या ४१व्या वर्षी त्यांचे निधन झाले. १९ ऑक्टोबर, १९४९ या दिवशी ‘महल’ प्रदर्शित झाला. त्याचे यश याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी खेमचंद प्रकाश हयात नव्हते तरी त्यांच्या संगीताने सजलेल्या त्या गीताने लता मंगेशकर यांना हिंदी चित्रपटसृष्टीत केवळ प्रस्थापितच केले नाही, तर अशा उंचीवर नेऊन ठेवले की त्या अढळपदावर पोहोचण्याची मनोकामना बाळगणाऱ्या आजवरच्या अनेक गायिका त्या उंचीवर पोहोचणे तर दूरच; त्या अढळपदाच्या आसपासही जाऊ शकलेल्या नाहीत.

Comments
Add Comment

दाट धुक्यामुळे काही दिसेनासे झाले तेव्हा...

- अनिल तोरणे, स्मृतीपटल आपल्या ‘काला बाजार’ या चित्रपटाच्या बाह्यचित्रीकरणासाठी देव आनंद निघाले पण दाट

बाई इतिहास नव्हेत; भविष्याची दिशा...

- प्रा. मधुकर कुलकर्णी; श्रद्धांजली विजया मेहता यांच्या प्रयोगशीलतेचा अर्थ केवळ रंगमंचावरील नव्या

आला आला वारा, संगे पावसाच्या धारा...

हा खेळ सावल्यांचा’ हा चित्रपट १९७६ साली म्हणजे बरोबर ५० वर्षांपूर्वी आला होता! दिग्दर्शक होते वसंतराव तथा

नर्मदावतरण

भालचंद्र ठोंबरे, महाभारतातील मोतीकण  भारतात गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी या नद्यांना जेवढे महत्त्व आहे तेवढेच

जीव घेण्याइतका राग येतो कुठून?

डाॅ. स्वाती गानू,आनंदी पालकत्व एखाद्या तरुणाच्या मनात असा कोणता विचार जन्म घेतो, की तो शांतपणे दुसऱ्या माणसाचा

एक स्वच्छ सुंदर नात विणूया...

अश्विनी शिंदे - भोईर,स्पंदन दुपारचं उन्हाळ्यातलं कडक ऊन. खरं तर जून महिन्यातला हा दिवस. पण पावसाळा लांबल्यामुळे