अस्तित्व

प्रतिभारंग; प्रा. प्रतिभा सराफ


अंदमानची राजधानी श्री विजयपुरम (जुने नाव-पोर्ट ब्लेअर) इथे विमान वा बोटीने उतरल्यावर साधारण शंभर किलोमीटरवर ‘मड होल्क्यानो’ हे ठिकाण आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणच्या मूळ आदिवासींच्या जंगलातून पुढे वाटचाल करावी लागते. त्या आदिवासींना ‘जरावा’ वा जारवा (Jarawa) म्हटले जाते.


‘जरावाज ट्रायबल रिझर्व्ह’मधून प्रवास करण्यासाठी काही नियम घालून दिलेले आहेत. भारतीयांना आपले आधार कार्ड आणि परदेशस्थ नागरिकांना आपले पासपोर्ट दाखवून चेक पोस्टवर रितसर नोंदणी करून पुढे जावे लागते. इथे जाण्यासाठी दिवसातून दोनच वेळा नियुक्त केलेले आहे त्यावेळेस एकत्रितपणे अनेक गाड्या जातात. येतानाही दिलेल्या वेळेनुसारच एकत्रितपणे सर्व गाड्या परततात. या प्रवासात अंदमानला जायच्या आधीपासून ज्यांच्याकडून आपण ही सहल आयोजित करून घेतलेली असते त्या व्यक्तीकडून त्यानंतर आदल्या दिवशी आपल्या गाईडकडून त्याचप्रमाणे त्या प्रवासादरम्यान त्या गाडीच्या ड्रायव्हरकडून प्रवाशांना अनेक सूचना केल्या जातात. या आदिवासींचे फोटो किंवा व्हिडीओ काढण्यास पूर्णपणे मनाई आहे. इतकेच नव्हे तर या प्रवासादरम्यान आपल्या बॅगेतून शक्यतो मोबाईल काढून हातातही धरायचा नाही असे सांगितले जाते. ते रस्त्यालगत बसले असले तरी त्यांना पाहण्यासाठी गाड्या थांबवायच्या नाहीत, त्यांच्याकडे वेडेवाकडे इशारे करायचे नाहीत, त्यांना कोणताही पदार्थ खायला द्यायचा नाही इत्यादी. ‘अंदमान आणि जरावाज’, हे जणू घट्ट समीकरण असल्यामुळे त्यांना पाहण्याची उत्सुकता निश्चितपणे प्रत्येकाच्या मनात असते. या प्रवासात ते दिसतातही! अत्यंत काळाकुट्ट रंग, साधारण माणसापेक्षा अधिकची उंची, अत्यल्प झाकलेले अंग याशिवाय चेहऱ्यावर आणि अंगावर पांढऱ्या रंगाचे पट्टे असे काही जरावाज आम्हाला दिसले. साधारण पंचावन्न हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतून यांचे पूर्वज इथे आले, असे म्हटले जाते. कोणत्याही सहलीला जाण्याआधी थोडासा इतिहास वाचून जाण्याची माझी सवय आहे आणि तेव्हा मी असे वाचले की १९९८ या साली जारवा आदिवासींना ‘गोवर’ या आजाराने ग्रासले. तो जीवघेणा त्वचारोग होता. त्यावेळेस या आदिवासींची संख्या साधारण दोनशे साठच्या आसपास होती. कोणत्या तरी पर्यटकांच्या संसर्गाने त्यांना ही लागण झाली. त्यावेळेच्या सरकारने प्रख्यात वैद्य, डॉ. रतन चंद्र कर या आदिवासींची यांची देखभाल करण्यासाठी नियुक्ती केली. अंदमान बेटावरील जारवा यांना त्यांनी आरोग्यसेवा पुरवली.


प्रसंगी डॉक्टर वस्तीमध्ये जायचे आणि आवश्यकतेनुसार या आजारी व्यक्तींना जंगलातून रुग्णालयापर्यंत पोहोचवत होते.
डॉ. कर यांनी कदमताला रुग्णालयात ‘जारवा वॉर्ड’ बांधला होता जो काँक्रीटच्या फरशीची असला तरीही एक पर्यावरणपूरक होता. जारवांना हे रुग्णालय अगदी त्यांच्या घरासारखे वाटावे यासाठी त्यांनी खास बांबू, गवत आणि वाळलेल्या झाडांच्या खोडांचा वापर करून हा वॉर्ड बांधला होता. त्यांनी वॉर्डच्या मध्यभागी एक सामुदायिक स्नानगृह बांधले. त्यांना त्यांच्या वस्तीचा भाग वाटावा यासाठी एक शेकोटी बांधली. डॉ. कर यांच्या कर्मचाऱ्यांनाच या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्याची परवानगी होती, जिथे चोवीस तास पोलीस तैनात असायचे. सुरुवातीला आदिवासींना ही जागा म्हणजे तुरुंग वाटला पण त्यानंतर जसजसे रुग्ण बरे होऊ लागले तसतसे त्यांना या जागेचे महत्त्व लक्षात येऊ लागले आणि त्यांना तिथे सुरक्षितही वाटू लागले.


१९९८ मध्ये जारवा जमातीचे अस्तित्व मिटवून टाकू शकणाऱ्या गोवरच्या विनाशकारी साथीचा पूर्णपणे नायनाट झाला. सुरुवातीच्या हे आदिवासी सर्वसामान्य माणसांवर प्रत्येक गोष्टीसाठी अविश्वास दाखवायचे, तर या अविश्वासावर मात करून, डॉ. कर यांनी प्रथम त्यांचा विश्वास कमवला. त्यानंतर वैद्यकीय कौशल्याच्या जोरावर ‘गोवर’सारख्या भयानक साथीच्या रोगाच्या ऐन काळात शंभरहून अधिक रुग्णांवर उपचार केले. त्यांनी कदमताला रुग्णालयात एक विशेष ‘जारवा वॉर्ड’ स्थापन केला होता, जिथे आदिवासींच्या पारंपरिक पद्धती आणि आधुनिक वैद्यकशास्त्र यांचा मेळ घालून वैद्यकीय व्यवसाय केला.
डॉक्टरांच्या अथक प्रयत्नामुळे १९९८ मध्ये जारवांची संख्या २६० वरून आज ५६० हून अधिक इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली.
भारतातील पश्चिम बंगालमध्ये १९५४ साली जन्मलेले एक प्रख्यात वैद्य डॉ. रतन चंद्र कर यांनी आदिवासींच्या या वाढीसाठी आरोग्य क्षेत्रातून महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल २०२३ साली भारताच्या माननीय राष्ट्रपती, श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आता आणखी महत्त्वाची माहिती मला वाचनातून मिळाली ती अशी, की या जारवाना गोवर झालाच कसा?


एप्रिल १९९६ मध्ये एक घटना घडली. एकदा रात्रीच्या सुमारास जारवा वस्तीच्या जवळच्या वस्तीत तेथील माणसांना ‘एनमाई’ नावाचा एक जारवा तरुण सापडला, जो घसरून पडल्यामुळे त्याचा पाय मोडला होता, तर या वस्तीतील माणसांनी त्याला ‘पोर्ट ब्लेअर’ रुग्णालयात आणले. त्या रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर दोन महिने उपचार केले. तो बरा झाल्यावर, त्याला जारवा वस्तीत त्याला व्यवस्थित पोहोचवले. दोन महिन्यांत जारवांना वाटले, की एनमाई मरण पावला असावा. वस्तीत गेल्यावर त्याने रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची कशी काळजी घेतली हे सर्वांना सांगितले. त्याचे कथन ऐकल्यानंतर एक अत्यंत चांगली गोष्ट घडली, की त्यानंतर या जारवांनी अनोळखी माणसांवर धनुष्यबाणाद्वारे हल्ल्या न करण्याचा निश्चय केला. या धनुष्यबाणाच्या टोकाशी लावलेल्या विषामुळे त्यांच्या वस्तीजवळ फिरकणारी माणसे किंवा पर्यटक ताबडतोब मरून जायचे!


१९९७ च्या अखेरीस आणि १९९८ च्या सुरुवातीला ते इतरांसोबत मिसळू लागले. याचा परिणाम असा झाला, की त्यांना गोवरसारखा संसर्गजन्य आजाराची लागण झाली.


या माहितीतून मला एक महत्त्वाची गोष्ट नमूद करायची आहे की आपण कुठेही पर्यटनासाठी गेलात तर जाण्याआधी त्या ठिकाणची काही माहिती वाचून गेलात, तर ते पर्यटन स्थळ पाहण्याचा एक वेगळा आनंद आपल्याला मिळतो. या ज्ञानाद्वारे एखाद्या ठिकाणाच्या माणसांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन वेगळा आणि मानवतावादी होतो. आपलेही अस्तित्व टिकवण्यासाठी अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचे योगदान दिलेले असते त्यात आपल्याला जन्माला घालणारे आई-वडील, त्यांच्या सोबतीने अधूनमधून आपल्याला सांभाळणारे नातेवाईक, शेजारीपाजारी, अनेक वैद्य आणि डॉक्टर, शिक्षक, मित्रमैत्रिणी, सहकारी यांचेही यानिमित्ताने कुठेतरी ऋण व्यक्त करू या!
pratibha.saraph@ gmail.com

Comments
Add Comment

बघ्यांची गर्दी नि रेंगाळणारा न्याय...

स्पंदन; अश्विनी शिंदे-भोईर उन्हाळ्यात लालभडक फुललेला गुलमोहोर. ज्याच्या सावलीत कदाचित अनेकांचं बालपण रुजलेलं

“माझं बाळ हट्टी नाही, ते मला काही तरी सांगतंय!”

आनंदी पालकत्व; डाॅ. स्वाती गानू अभिषेक आणि समिधा दोघेही तीन वर्षांच्या निहारला घेऊन एका मोठ्या हॉटेलमध्ये

दरड काय असते?

विज्ञानकथा; प्रा. देवबा पाटील शिवम या मुलाची त्याच्या मित्रांना माहिती देणे सुरू होते.“सेंद्रिय खडक कसे असतात?”

प्रेम आईचे

कथा; रमेश तांबे एका गोठ्यात गाय आणि तिचं वासरू राहायचं. सकाळचे ९ वाजले की, त्यांचा शेतकरी त्या दोघांना रानात

मधुर, चांगली वाणी नेहमीच प्रशंसनीय

गोष्ट लहान, मोठा अर्थ; शिल्पा अष्टमकर मानवाच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्वात प्रभावी साधन म्हणजे त्याची वाणी. आपण

पश्चाताप बदल घडवितो

- गोष्ट लहान, मोठा अर्थ; शिल्पा अष्टमकर मानवी जीवनात चुका होणे स्वाभाविक आहे. कोणीही परिपूर्ण नसतो; परंतु त्या