Thursday, May 7, 2026

Trees in Mumbai : बाधित झाडांच्या बदल्यात पर्यायी झाडे लावताना मुंबईतच लागवड करा

Trees in Mumbai : बाधित झाडांच्या बदल्यात पर्यायी झाडे लावताना मुंबईतच लागवड करा

स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई : मुंबईतील विविध प्रकल्प कामांमध्ये बाधित होणाऱ्या झाडांच्या बदल्यात लावली जाणारी झाडे आणि पुनर्रोपित झाडे ही मुंबईच्या बाहेर लावण्याऐवजी मुंबईतच लावण्याचा विचार केला जावा अशाप्रकारचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला दिले.

विद्याविहार रेल्वे स्थानकावर एल.व्ही.एस. मार्ग व आर.सी. मार्ग यांना जोडणाऱ्या उड्‌डाणपुलाच्या पोहोच रस्त्यांचे बांधकाम सुरु असून त्यात २१३ झाडे बाधित झाली आहेत. त्यातील ७७ झाडे कापली जाणार असून ७३ झाडे पुनर्रोपीत केली जाणार आहेत. उड्डाणपुलाच्या पोहच रस्त्यांच्या कामामुळे बाधित होणाऱ्या वृक्षांच्या बदल्यात मोठ्या प्रमाणावर नव्याने वृक्षलागवड आणि पुनर्लागवड करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. या बदल्यात मुंबई महापालिका २,२७८ झाडे लावणार आहे. यासाठी सुमारे २ कोटी रुपये खर्च केला जाणार असून यासाठी महाराष्ट्र वन विकास महामंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव आला असता झाडे कापण्यास मंजुरी देण्यासाठी वृक्षप्राधिकरण नसावे तर पुनर्रोपित केलेली झाडे आणि पर्यायी लावली जाणारी झाडे जगली की नाहीत हे तपासण्यासाठीही स्वतंत्र समिती असावी अशी सूचना केली.

तर भाजपच्या प्रिती सातम यांनी अशाप्रकारची झाडांची लागवड पनवेलमधील गावांमध्ये का केली जात नाही असा सवाल करत उपनगराचे पालकमंत्री  यांनी दोन दिवसांपूर्वी आरे कॉलनीतील विविध प्राधिकरणांच्या अखत्यारितील भूखंडावर झाडांची लागवड केली जावी असे निर्देश दिले आहेत, त्याप्रकारे या झाडांची लागवड आरे कॉलनीतील जागांमध्ये करण्याचा विचार केला जावा अशी सूचना केली. तर जमीर कुरेशी यांनी एक झाड पुनर्रोपण करण्यासाठी ५६ हजार रुपये मोजले जाणार असून जर झाड मृत झाल्यास त्यांना सुमारे ११ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे ही रक्कम वाढवली जावी अशी मागणी केली. तर शीतल गंभीर यांनी १ कोटी ५७ लाख रुपये खर्च करणार आहोत तर यांची माहिती देण्यात यावी अशी मागणी केली. यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी मुंबईत भरपूर जागा शिल्लक असून आपल्या विविध प्रकल्पांमधील बाधित झाडांच्या बदल्यात लावली जाणारी पर्यायी जागा आणि पुनर्रोपित झाडे ही मुंबईतच लावण्याचा प्रयत्न केला जावा. यासाठी पनवेलला झाडे लावण्याचा विचार करण्याऐवजी मुंबईतच जागा शोधून जास्तीत जास्त झाडे लावण्याचा प्रयत्न करावा असे निर्देश प्रशासनाला दिले.

Comments
Add Comment