संवाद : गुरुनाथ तेंडुलकर
कौरव पांडवांमध्ये घडलेलं महाभारत युद्ध तब्बल अठरा दिवस चाललं. पहिल्या दिवशी दोन्ही बाजूंच्या सैन्यातून शंख फुंकून सुरुवात झालेल्या युद्धाचा शेवट अठराव्या दिवशी दुर्योधनाच्या मृत्यूनं झाला. नाव धर्मयुद्धाचं असलं तरी दोन्हीही बाजूच्या सैन्याने अनेकवेळा धर्मयुद्धाचे नियम पायदळी तुडवले होते. अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये एकाकी गाठून मारण्यापासून ते निःशस्त्र कर्णावर बाण चालवण्यापर्यंत. ‘नरो वा कुंजरो वा.’ असं धर्मराजाच्या तोंडून वदवून घेण्यापासून ते शिखंडीच्या आड उभा राहून भीष्माचार्यांवर शरसंधान करण्यापर्यंत...
दुर्योधनाला मारताना तर भीमानं गदायुद्धाचे सगळे नियम मोडून दुर्योधनाच्या कंबरेखाली गदा प्रहार केले. त्याच्या दोन्ही मांड्या चिणून छिन्नविच्छिन्न केल्या. दोन्ही पायांचा अक्षरशः चेंदामेंदा केला. दुर्योधनाच्या कंबरेच्या वरचं शरीर जिवंत आणि कंबरेखालचं शरीर मात्र मृतावस्थेत अशा विदीर्ण अवस्थेत त्याला रानात एकट्याला सोडून पांडव निघून गेले त्यावेळी सूर्य अस्ताला टेकला होता. वेदनेनं विव्हळणाऱ्या दुर्योधनाच्या मांसाचे तुकडे खायला रानातले कोल्हे, कुत्रे आणि इतर श्वापदं गोळा झाली होती. अधुंकशा संधी प्रकाशात आपल्या डोळ्यांसमोर अशाप्रकारचा मृत्यू पाहून देखील दुर्योधनाच्या मनात कोणत्याही प्रकारच्या पश्चात्तापाची किंवा अपराधीपणाची भावना मात्र निर्माण झाली नव्हती. अश्वत्थामा हातात पेटलेली मशाल घेत रात्री त्याचा शोध घेत घेत तिथं पोहोचला त्यावेळी दुर्योधनाने त्याला क्षीण स्वरात पण त्वेशाच्या शब्दात स्पष्ट आदेश दिले. ‘मित्रा, माझ्या मृत्यूचा सूड घे.’
त्याच रात्री अश्वत्थाम्यानं द्रौपदीच्या सर्व मुलांना गाढ झोपेतच गळा चिरून ठार मारलं.
पुढे त्याचा सूड म्हणून द्रौपदीनं अश्वत्थाम्याच्या कपाळावरचा मणी कापून काढला आणि त्याला त्या जखमेतून कधीही न भरून निघणारी भळभळती चिरंजीव वेदना दिली.
महाभारताचा डोळस अभ्यास केला तर धर्म विरुद्ध अधर्माच्या या युद्धात नेमकं कोण चूक आणि कोण बरोबर हे ठरवणं कठीण जातं.
कुणी म्हणतात की द्रौपदीनं केलेल्या अपमानामुळे दुर्योधनानं द्यूतात पांडवांना हरवून द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयास केला. कुणी म्हणतात की भीष्माचार्यांनी अंबा, अंबिका, अंबालिका या तीन बहिणींना स्वयंवर मंडपातून बळजबरीनं उचलून नेल्यामुळे संतप्त झालेल्या अंबेने पुढे शिखंडीच्या रूपानं भीष्माचार्यांवर सूड उगवला.
कुणी म्हणतात की द्रोणाचार्य आणि राजा द्रुपद यांच्यातील वैरामुळं हे युद्ध घडलं तर...
कुणी म्हणतात की शकुनीनं आपल्या बहिणीचा म्हणजेच गांधारीचे विवाहाचे वेळी तिचा पती धृतराष्ट्र हा अंध आहे हे न सांगता फसवून लग्न लावल्याबद्दल संतप्त होऊन कुरुवंशावर सूड उगवला...
असो....... काय खरं आणि काय खोटं....? कोण चूक आणि कोण बरोबर.....? अनेक वर्षं महाभारताचा अभ्यास करणाऱ्या विद्वानांना देखील हे ठरवता येत नाही. पण एक मात्र खरं की त्या युद्धात बळी गेला तो सामान्य योद्ध्यांचा. भगवान श्रीकृष्णाने आपलं सैन्य कौरवांच्या बाजूनं लढवलं. ती त्या युगंधराची रणनीती-राजनीती होती. पण अखेर त्याच्या सैन्याचा मात्र बळी गेलाच ना? युद्धात मरण पावलेल्या यादव सैनिकांच्या बायका विधवा झाल्या. मुलं पोरकी झाली. म्हाताऱ्या आई-वडिलांना उतारवयात आपल्या मुलाच्या मृत्यूचं असह्य दुःख सहन करावं लागलं. महाभारत युद्धामध्ये सहभागी झालेल्या प्रमुख योद्ध्यांपैकी केवळ अकरा जण जिवंत राहिले होते. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे पाच पांडव. त्यानंतर जिवंत होते कृपाचार्य, सात्यकी, युयुत्सु, कृतवर्मा आणि अश्वत्थामा असे आणखी पाच जण आणि या भीषण युद्धाचा कर्ता करविता आणि महानायक भगवान श्रीकृष्ण, भीष्माचार्य जिवंत होते पण ते उत्तरायणाची वाट पाहत शरपंजरी पडले होते. म्हणजे केवळ अकरा प्रमुख वीर जिवंत राहिले.
पांडव युद्ध जिंकले पण त्यांची सर्व मुलं मात्र मारली गेली होती. अर्जुनाच्या अभिमन्यूपासून भीमाच्या घटोत्कचापर्यंत अनेक मुलं आधीच मारली गेली होती. द्रौपदीला पाच पांडवांपासून पाच मुलं झाली होती. प्रतिविंध्य, सूतसोम, श्रुतिकर्म, शतानिक आणि शत्रूसेन. ही पाचही मुलं अवत्थाम्यानं युद्ध संपल्यानंतर रात्री झोपेत असताना ठार मारली.
पांडवांच्या वाट्याला आलं ते असलं भीषण रक्तरंजित आणि अतीव वेदनेनं भरलेलं हस्तिनापुरचं राज्य. कोण जिंकलं? कोण हरलं? नेमकं काहीच सांगता येत नाही. म्हणूनच पुढे हजारो वर्षांनंतर महाभारतातील भीष्मपर्वातील तेवीस ते चाळीस हे अठरा अध्याय जे भगवद्गीता या नावानं प्रसिद्ध आहेत त्या भगवद्गीतेवर भाष्य करताना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची सांगता पसायदान मागून केली. माऊलींनी मागितलं...
खळांची व्यंकटी सांडो
तयां सत्कर्मी रति वाढो
भूतां परस्परे जडो
मैत्र जीवांचे
हे परमेश्वरा, यापुढे कोणत्याही प्रकारचे युद्ध नको. सर्वं जग केवळ प्रेमाने भरून जाऊ दे. साऱ्या भूतमात्रांमध्ये मैत्रभावना निर्माण होऊ दे. कामक्रोधादी षड्रिपू माणसाच्या मनातून नाहिसे होऊन समाजातील खलपुरुषांची कुबुद्धीच नष्ट होऊ दे...
जगातल्या कोणत्याही युद्धाला किंवा अगदी कौटुंबिक कलहालादेखील कारणीभूत असतात ते माणसाच्या मनातील सहा वैरी. आध्यात्मात त्यांना षड्रिपू असं म्हटलं जातं.
ते सहा शत्रू म्हणजे बेलगाम कामवासना, आपल्या मनाप्रमाणे झालं नाही की उत्पन्न होणारा क्रोध, अर्निबंध संपत्तीचा लोभ, सत्तेचा मोह, आपल्या प्रतिस्पर्ध्याला वैरी मानून त्याच्यावर कुरघोडी केल्याचा आसुरी आनंदातून निर्माण होणारा मद आणि कुणी आपल्याहून श्रेष्ठ होऊ लागला की त्या व्यक्तीबद्दल मनात निर्माण होणारा मत्सर. या सहा रिपूंमुळे जगातील शांतता नाहिशी झाली आहे. आज पृथ्वीवरच्या सगळ्या देशांचा राजकीय अभ्यास केला तर आढळेल की गेल्या पाच शतकांपासून म्हणजेच पाचशे वर्षांपासून दररोज कुठे ना कुठे तरी युद्ध सुरूच आहे.
अनेकदा ही दोन देशात सुरू असलेली युद्धं स्वार्थासाठी काही बलाढ्य देश घडवून आणतात. दोन्ही बाजूंना शस्त्रास्त्र पुरवतात आणि बळी जाणाऱ्या जनसामान्यांच्या चितेवर स्वतःची पोळी भाजून घेतात. अनेकदा ही युद्धं धर्माच्या नावाखाली खेळली आणि खेळवली जातात. धर्मप्रसार हा गोंडस शब्द वापरला तरी त्यामागचा खरा हेतू हा ‘दुसऱ्याची भूमी जबरदस्तीनं बळकावणं’ हाच असतो. सबळांनी आक्रमण करून दुर्बलांची लूट करायची आणि त्यांच्या स्त्रीयांसह सगळ्या संपत्तीवर स्वतःचा हक्क प्रस्थापित करायचा हाच हेतू प्रमुख असतो. स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याची म्हणजेच ‘बळी तो कान पिळी.’ मानसिकता काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सहा रिपूंमुळेच निर्माण होते. आज जगात अनेक ठिकाणी युद्ध सुरुच आहेत. राज्यकर्त्यांना आणि शस्त्रास्त्रांच्या व्यापाऱ्यांना हवी असलेली ही युद्ध सर्वसामान्य माणसांना मात्र नकोशीच वाटतात.
अशाच एका सर्वसामान्य सुजाण व्यक्तीचं मनोगत मांडणारी कवियत्री निशा वर्तक यांची कविता ‘युद्ध नको.’
युद्ध लढाई भांडण तंटे नाव नको ते रक्त पाहुनी आप्तजनांचे काळिज तुटते, ढग युद्धाचे कधी न यावे माझ्या देशात शांती नांदो सदैव येथे, हे जगदीशा
देश धर्म अन् सत्तेसाठी युद्धे घडती द्वेश मत्सरी स्वार्थी बुद्धी मनुजा नडती, दोन घडीचे जीवन अपुले शांत जगूया बुद्ध स्मरू या शांतीचा हा मंत्र जपूया, निष्पापांचे हाल अघोरी बघवत नाही काळ लोटला भय युद्धाचे संपत नाही कुणी जिंकतो कुणी हारतो माणूस मरतो युद्धानंतर परिणामाचे भोग भोगतो...
अतिशय सोप्या आणि सुलभ शब्दांत लिहिलेल्या या कवितेचं वेगळं रसग्रहण करण्याची आवश्यकताच नाही. निशाताईंची ही लहानशी कविता युद्धाच्या दुष्परिणामांबद्दल बरंच काही सांगून जाते.