प्रासंगिक : प्रशांत डिंगणकर
कोकणातील शिमग्याला सुरुवात झाली की, एक उत्कंठावर्धक आणि प्रचंड उत्साह वाढवणारा उत्सव म्हणजे समा उत्सव. आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील हा उत्सव मनोरंजन, समाजाचे एकत्रिकरण आणि शारीरिक व्यायाम तसेच एका सामूहिक शिस्तीचे पालन करणाऱ्या उत्सवाची परंपरा खूप जुनी आणि लोकप्रिय आहे.
समा उत्सव म्हणजे काय?
समा म्हणजे लोटणीचा खेळ. ग्रामदैवतेच्या पालख्या होळीला देवळातून बाहेर पडतात आणि घरोघरी फिरायला लागतात. जोपर्यंत गावातील सगळी घरे फिरून होत नाही तोपर्यंत पालखी सहानेवर वस्तीला विराजमान असते. पालखी फिरवण्याचे मान ठरलेले आहेत. ज्या पद्धतीने देवीचे मानकरी आहेत त्या पद्धतीने व त्याच क्रमाने पालखी वाड्यांवर घरोघरी फिरते. त्यावेळी पालखी नाचवणे, पालखीची वाजत गाजत काढली जाणारी मिरवणूक या प्रथा अत्यंत लोकप्रिय आहेत. याच काळात समा उत्सव होतो.
हा उत्सव भंडारी, खारवी, गुरव अशा समाजात प्रामुख्याने दिसून येतो. आता अन्य समाजातील पथकेही यामध्ये सहभागी होतात. पण विशेषतः पूर्वांपार हा उत्सव भंडारी समाजात अत्यंत लोकप्रिय आहे. वर्षानुवर्षे हा उत्सव हा समाज साजरा करतो. त्याची पद्धत आणि प्रथा ही सुनियोजित असते. ज्या गावात हा समा उत्सव भरवला जातो. त्या गावातून आजूबाजूच्या गावातील मंडळांना चिठ्ठी पाठवून आमंत्रित केले जाते. या एका चिठ्ठीवर ही मंडळे येतात. नुकताच आमच्या पालशेत गावात भंडारी समाजाचा समा उत्सव पार पडला.
१४ गावांतील मंडळे आली होती. ज्या गावाने आमंत्रण दिले त्या गावातील पथकासोबत आलेल्या अन्य गावातील पथकाची लोटणी होते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ती केली जाते. यामध्ये शिस्त व नियम पाळले नाहीत, तर मोठी इजा अथवा दुखापत होण्याशी शक्यता असते. त्यामुळे शिस्तीला फार महत्त्व आहे. या खेळात हार- जीत नाही. बक्षीस नाही. सहभागीता मूल्य नाही. पण तरीही शेवटपर्यंत उत्कंठा शिगेला लागलेली असते. आजही समा पाहायला आणि खेळायला हजारोंची गर्दी होते.
समा सुरू होण्यापूर्वी संध्याकाळी सहभागी सगळ्या मंडळांचे प्रतिनिधी लॉटरी पद्धतीने क्रम ठरवतात आणि मग रात्रीच्या सम्याची ओढ सगळ्यांना लागते.
नेमका कसा असतो हा खेळ?
ग्रामदेवतेच्या पालखीची पूजा करून या खेळाला सुरुवात होते. देवीला आसनस्थ करून समोरच्या मोकळ्या जागेत हा खेळ रंगतो. त्यासाठी पालखीचा लाकडी डोलारा घेतला जातो. या डोलाऱ्यात देवी विराजमान नसली तरी त्याची पूजा होते आणि मगच लोटणीला सुरुवात होते. ज्या यजमान गावाने हा समा भरवला आहे, त्या गावातील पथकासोबत आलेल्या पथकातील एकेक पथक लोटणी खेळते. या खेळात भोवनीचा लोट्या आणि शेवटी खेळणारा सर लोट्या या दोघांचा मान मोठा. खेळाची सुरुवात ज्याच्यापासून केली जाते, तो भोवनीचा लोट्या आणि शेवटला जो खेळतो तो सर लोट्या. शेवटच्या गड्यापैकी जो लोटेल त्याचा विजय मानला जातो.
पालखीचा डोलारा म्हणजे ही रिकामी पालखी एका विशिष्ट प्रकारे पकडून समोरच्याला मोठ्या ताकदीने लोटावे लागते. त्यासाठी मोठी शक्ती पणाला लावावी लागते. पालखी खांद्यावर घेतली की काही क्षणांत चतुराईने आणि चपळाईने समोरच्याला लोटले तर यश मिळते. हा खेळ खेळताना जर अंदाज चुकला आणि पालखी खाली पडली, तर पाय मोडण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे त्याची काळजी घ्यावी लागते. हा खेळ सुरू असताना ज्या दोन पथकात किंवा मंडळात हा खेळ सुरू आहे त्यांचे प्रत्येकी एक असे दोन खांदेकरी ही पालखी धरून असतात, तर तिसरा माणूस पंचा सारखा तिथे असतो त्याला समईवाला असे म्हटले जाते. दिवसभराचे काम संपवून रात्री साधारणतः ९ नंतर हा खेळ खेळला जातो. पथकांची संख्या पाहता पहाटेपर्यंत हा खेळ चालतो. संध्याकाळी ७ वाजल्यापासून ही पथके यजमान गावात जमतात आणि पहाटे समा संपतो तेव्हा तांदळाची खिर आणि पावट्याची भाजी असा प्रसाद घेऊन सम्याचा समारोप होतो. आज शरीरसौष्ठव स्पर्धा वगैरे सुरू झाल्या पण हा खेळ आमच्या गुहागर तालुक्याने विशेषतः भंडारी समाजाने विकसित केलेला आहे. भंडारी समाजाने आपल्या १४ गावांतील ज्ञातीची ओळख, रोटीबेटी व्यवहार आणि सामाजिक विकासाच्या हेतूने सुरू केलेला हा उत्सव अनेक सामाजिक गोष्टींना सामावून घेणारा आहे.
गणवेश आणि पारंपरिकता!
आज कितीही फॅशनेबल कपडे आले तरी या खेळात खेळणारा लोट्या साधारणतः अंगात पांढरी बनियन आणि कंबरेला करकचून आवळलेले टॉवेल अशा गणवेशातच पाहायला मिळतो. यामध्ये बहुतेक ज्या काळात म्हणजे होळीनंतर मे महिन्यापर्यंत हा समा होतो त्या काळात हवेत प्रचंड उकाडा असतो त्यामुळे घामाच्या धारा लागतात. त्यात शारीरिक श्रम करावे लागत असल्याने अंगावर बनियन घालणे हा गणवेश आला असावा, तर जेव्हा लोटणी खेळली जाते तेव्हा हात, पाय, कंबर या शरीराच्या अवयवांना प्रचंड ताण सहन करावा लागतो. अशावेळी कंबर जर घट्ट आवळलेली असेल, तर शरीराला जोर येतो. त्यामुळे कंबरेला करकचून आवळलेले टॉवेल बांधून हा खेळ खेळला जातो.
पूर्वी मनोरंजनाची साधने नव्हती तेव्हा लोककला आणि लोक परंपरांच्या माध्यमातून जनजागृती, मनोरंजन, प्रबोधन आणि समाजाचे एकत्रिकरण केले जात होते. हा खेळ त्यातील एक आहे. जेव्हा आपण प्रत्यक्ष या लोटण्या पाहतो तेव्हा आपल्या मुठी घट्ट आवळल्या जातात. रक्त गरम होते आणि बघणाऱ्याचे श्वास वाढतात व तोही खेळाचा भाग होतो. शारीरिक व्यायाम आणि सुदृढता असल्याशिवाय या खेळात उतरता येत नाही. जो लोटणी जिंकून देतो त्याच्या हातात क्रिकेट किंवा अन्य खेळांना मिळणारी पदकं, बक्षिसे आणि पैसा काहीही त्याला मिळत नाही. पण गावात त्याला मिळतो तो “मान”! हाच मान त्याला वर्षभर छाती पुढे काढून जगण्याचे बळ देतो. मार्चमध्ये होळीनंतर साधारणतः मेपर्यंत काही मर्यादित काळात भरणारा हा समा... आमचा खेळ आहे, परंपरा आहे, स्वाभिमान आहे तशीच ती आमच्या गुहागर तालुक्याची एक ओळख देखील आहे.