Saturday, May 2, 2026

कला

कला

- जीवनगंध; पूनम राणे

शशांक अतिशय बेजबाबदार मुलगा होता. रंगाने गोरापान, सडपातळ बांध्याचा, स्वभावाने चंचल. कोणत्याही गोष्टीत त्याचे मन रमत नसे. वार्षिक परीक्षा जवळ आली होती. परीक्षेचे वेळापत्रक सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासाचे वेळापत्रक आखून दिले होते.

शशांक मात्र मनाला वाटेल तेव्हाच अभ्यासाला बसायचा. वेळापत्रकाप्रमाणे त्याने केव्हाच अभ्यास केला नाही. मुळात त्याला विज्ञान आणि गणित हे विषय अतिशय कठीण जात होते. त्यामुळे त्याला अभ्यासाचा कंटाळा येत असे. तो तसे आईला बोलून दाखवत असे. आई त्याला प्रेमाने समजवत असे की, “बाळा सगळ्या विषयांमध्ये आपल्याला पास होता आलं पाहिजे.”

पण तो म्हणायचा, “माझ्या डोक्यात गणित आणि विज्ञान शिरतच नाही. काय करू?” आई म्हणाली, “बाळा प्रयत्न करायला पाहिजे. पुन्हा पुन्हा प्रयत्न कर. यश निश्चितच मिळेल.” परीक्षा सुरू व्हायला चार दिवस बाकी होते. शशांकच्या बाजूला असणारे काका विज्ञान आणि गणित हे दोन्ही विषय सोप्या पद्धतीने शिकवत होते. आईने शशांकला त्यांच्या घरी पाठवले. तरीही शशांकच्या डोक्यात काही गणित शिरत नव्हते. तो गणित पाठांतर करत असे. काकांच्या सांगण्यानुसार त्याने वेळापत्रकानुसार अभ्यास करायला सुरुवातही केली होती.

परीक्षेचा दिवस उजाडला. शशांक परीक्षेसाठी घरातून निघाला. पहिलाच पेपर मराठीचा होता. मराठीच्या पेपरमध्ये त्याला जेवढे येत होते तेवढे लिहून तो शांत बसून होता. अशाच प्रकारे सर्व विषयांची परीक्षा त्यांनी दिली होती. पेपरच्या शेवटच्या दिवशी वर्गात शिपाई सूचना वही घेऊन आला. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थी कौशल्य विकास शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. पेपर सुटल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना सहभागी व्हायचं असेल त्यांनी आपले नाव वर्ग शिक्षकांकडे द्यावे.

शिबिरामध्ये विविध उपक्रम घेतले जाणार आहेत. नामवंत प्रशिक्षक शिबिरासाठी नेमण्यात येणार आहेत. शशांकने धावतच जाऊन आपले नाव वर्ग शिक्षकांकडे दिले. आपल्याला या शिबिरात भाग घ्यायचा आहे असे त्याने सांगितले. आनंदाने तो उड्या मारत घरी आला. त्याने सारी हकीगत आईला सांगितली. आईने त्याला शिबिरासाठी जाण्यासाठी अनुमती दिली.

शिबिराचा दिवस उजाडला. शाळेपेक्षा वेगळा आनंद आज विद्यार्थी अनुभवत होते. एकपात्री अभिनय, हस्तकलेच्या विविध वस्तू बनवणे. कथाकथन, काव्य लेखन, व्याख्यान या सर्व उपक्रमात दोन दिवस कसे गेले हे विद्यार्थ्यांना समजले नाही.

विद्यार्थी कौशल्य विकास शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. विद्यार्थी मन लावून या उपक्रमात सहभागी झाले होते. जो विद्यार्थी अतिशय सुंदर पुष्पगुच्छ बनवेल त्याला बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.

शशांक मन लावून पुष्पगुच्छ बनवण्यात रंगून गेला होता. आपली कल्पकता वापरून त्याने अतिशय सुंदर पुष्पगुच्छ बनवला होता. दोन तास केव्हा गेले हे त्याला समजलेही नाही. विद्यार्थ्यांनी तयार केलेले सर्व पुष्पगुच्छ यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनामध्ये शशांकने बनवलेला पुष्पगुच्छ उठून दिसत होता. सारे जण शशांकचे कौतुक करत होते.

मुळातच त्याला टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचे प्रचंड वेड होते. तासनतास तो आपली कल्पकता वापरून सुंदर वस्तू बनवत असे. शिबिराच्या सांगता समारंभास प्रमुख पाहुण्यांना शशांकने बनवलेला पुष्पगुच्छ देण्यात आला. पाहुण्यांनी शशांकचे मन भरून कौतुक केले. शशांकला मात्र आभाळ ठेवणे झाले होते. पाहुण्यांनी त्याला स्पेशल बक्षीस दिले होते.

शालेय शिक्षण पूर्ण करून त्याने कला शाखेमध्ये प्रवेश घेतला होता. गणेशोत्सव, नवरात्रीमध्ये लागणारे मखर बनवण्याचा त्याला छंद होता. अतिशय उत्कृष्ट कलाकुसर करून तो मकर बनवीत असे. या त्याच्या छंदामुळे तो उत्कृष्ट कलाकार म्हणून पुढे नावारूपाला आला. तात्पर्य : योग्य वेळी, योग्य व्यक्तीकडून मिळालेली कौतुकाची थाप व्यक्तीला एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवते.

Comments
Add Comment