स्पंदन : अश्विनी शिंदे - भोईर
पुस्तकांची आणि माझी पहिली ओळख झाली ती शाळेची पायरी चढल्यावर. हातात आलेलं पहिलं पुस्तक म्हणजे पाठ्यपुस्तक. नवीन वर्षाची नवी कोरी पुस्तकं हातात यायची... त्या पुस्तकांची कोरी करकरीत पानं... पुस्तकांचा गंध... मला खूपच आवडायचा. पुस्तक उघडून वाचण्यापेक्षा त्या पुस्तकाचा गंध घेण्यातच बरेच दिवस जायचे. तेव्हा १५ जूनला शाळा उघडायची आणि त्या दरम्यान धो-धो पाऊस देखील पडायचा. मग पावसातून जाताना पुस्तकं भिजणार तर नाहीत ना याची जास्त काळजी असायची. शाळेत गेल्यावर बॅग उघडून मी पहिल्यांदा पुस्तकं ठीकठाक आहेत की नाही ते तपासायचे आणि शाळेतून घरी आल्यावर देखील पुन्हा तिचं तपासणी. आता शाळेतून घरी आल्यावर मुलं बॅग भिरकावून देतात तेव्हा पहिली काळजी हीच वाटते ,“अरे बॅग उघडून पाहा, पुस्तकं ठेवताना पानं तर मोडपली नसतील ना?” मग मुलांनी पाहो न पाहो मी मात्र घरी असल्यावर मुलाची बॅग उघडून सगळी पुस्तकं नीट आहेत का हे न चुकता पाहते. दुमडली गेलेली कव्हर्स, पानं नीटनेटकी करते. पुस्तकांना असा मायेने स्पर्श करण्यात शब्दांत वा नेमक्या उपमेत न पकडता येण्यासारखा आनंद असतो. आज मुलांच्या बॅगेतील पुस्तकांचा बोजा इतका वाढलाय की कोंबून कोंबून पुस्तक बॅगेत भरताना माझाच जीव कोंडल्यासारखा होतो.
असो. पुस्तकांशी झालेली ही पहिली ओळख. पण खऱ्या अर्थाने पुस्तकाचं भांडार काय असतं, पुस्तकांची श्रीमंती काय असते ती मला कळली, माझे सर साहित्यिक बाळ राणे यांच्या घरी. कुर्ला पश्चिमेला वाडिया इस्टेट या परिसरात माझं बालपण गेलं. तो परिसर तेव्हा तसा सांस्कृतिक दृष्ट्या मागासलेला. पण या परिसरात पुस्तकाचं, वाचनाचं बीज रोवण्यात तिथल्या शाळांच्या बरोबरीने खूप मोठं योगदान होतं ते राणे सरांचं. शुभदा एज्युकेशन इन्स्टीट्यूट ही सरांची संस्था होती. पुस्तकी विद्यार्थी घडवणारे ते क्लासेस नव्हते. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावरही तितकाच भर असायचा. संस्थेच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना मधु मंगेश कर्णिक, रवींद्र पिंगे यांच्यासारखे अनेक साहित्यिक, राधाकृष्ण नार्वेकर यांच्यासारखी संपादक, पत्रकार मंडळी आल्याचे मला आठवतं. सर अपंग होते; परंतु सरांच्याच शब्दात सांगायचं तर ‘अपंग नाही अभंग मी’ अशी त्यांची इच्छाशक्ती अतिशय दांडगी होती. ‘दुःख माझ्या वाट्याला आलं पण माझ्या वाट्याला आलेल्या दुःखाला मी पोरस राजाने दुःखाला जसं ठणकावून सांगितलं तसं मी दुःखाला ठणकावून सांगितलं सीमेवरून परत जा.’ सरांच्या तोंडचं हे वाक्य आजही माझ्या मनावर कोरलेलं आहे. सरांच्या या जिद्दीला साथ मिळाली ती त्यांच्या सुविद्य पत्नी शुभदा मॅडमची. या दाम्पत्याच्या घरात साक्षात सरस्वतीचा वास होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मी सरांच्या क्लासमध्ये आठवीत असताना प्रवेश घेतला आणि मी त्यांच्या घरातलीच एक सदस्य झाले. सरांच्या घरात मी पहिल्यांदा गेले तेव्हा हॉलमधील भिंतच नव्हती तर ते पुस्तकाचं घर होत. बऱ्याच विस्तीर्ण भिंतीवर एकामागून एक रचलेली पुस्तकांची ओळ प्रथमदर्शनी नजरेत भरायची.
पहिल्या दर्शनी घडलेलं पुस्तकाचं हे दर्शन माझ्यासाठी कुतूहलाने ताजमहाल पाहावं इतकं विलोभनीय आणि आश्चर्यकारक होतं. कारण तोपर्यंत एवढी पुस्तकं मी कधीच पाहिली नव्हती. आमच्या घरी तर नाहीच पण कोणा नातेवाइकांकडे देखील इतकी पुस्तकं नव्हती. मग हळूहळू कळू लागलं की सर केवळ शिक्षक नाही आहेत तर ते पुस्तक देखील लिहितात. माझं अक्षर आणि शुद्धलेखन चांगलं असल्याने सरांची मी लेखनिक बनले. सर डिक्टेशन द्यायचे आणि मी त्यांच्या कथा, कादंबऱ्या, अनेक लेख लिहायचे. सरांच्या दक्षिण आफ्रिकेवरील एका पुस्तकाचं काम सुरू झालं, तेव्हा त्या प्रक्रियेत सरांनी मला देखील सहभागी करून घेतलं होतं. ग्रंथाली हे पुस्तक प्रकाशित करणार होते आणि संपादक दिनकर गांगल यांच्या मार्गदर्शनाखाली या पुस्तकाचं काम सुरू होतं. गांगल सर तेव्हा स्वतः राणे सरांच्या घरी यायचे, त्यांच्यासोबत त्यातली जाणकार मंडळी देखील कोणी न कोणी यायची. दक्षिण आफ्रिका आणि नेल्सन मंडेला या विषयाचा आवाका एवढा मोठा होता, हे आज मला कळतंय. पण त्या चर्चा ऐकायला मी बसायचे. त्यातलं मला काही कळायचं नाही, कळायचं पण बराच काळ चालणारी चर्चा मी ऐकली होती. या चर्चेत एक महत्त्वाचा भाग आला तो म्हणजे हे पुस्तक लिहिण्यासाठी लागणाऱ्या संदर्भ पुस्तकांचा. मराठीत तेव्हा या विषयावरील विशेष पुस्तकं उपलब्ध नव्हती. कालिन्यातील मुंबई विद्यापीठाच्या वाचनालयात इंग्रजी भाषेतील ग्रंथ उपलब्ध होते. पण राणे सरांना प्रवास करून तिथे रोज जाऊन बसून पुस्तके वाचणं शक्य नव्हतं. मग ग्रंथालीचं पत्र सोबत घेऊन तिथल्या ग्रंथालयाचे प्रमुख टिकेकर सरांना आम्ही भेटलो. माझ्यासोबत सरांची कन्या प्रिया होती. सरांनी ते पत्र वाचलं आणि तिथल्या ग्रंथसेवकांशी माझा परिचय करून दिला आणि संदर्भ पुस्तक घरी घेऊन जाण्यास परवानगी दिली. पण तेव्हा माझ्या तब्येतीकडे पाहत, ‘जमतील ना न्यायला आणि पुस्तकं नीट घेऊन जायची नि नीट आणायची.’ अशी तंबीही दिली. मॅडमनी एक मजबूत बॅग दिली होती. आम्ही दोघींनी त्यात पुस्तकं भरली. तिथून कुर्ल्याला यायला रिक्षाही मिळेना. ट्राफिकच्या कारणामुळे रिक्षावाले त्या बाजूला यायला तयार होत नसतं. मग बस पकडून ती पुस्तकं जीवापाड सांभाळत कुर्ल्यामध्ये सरांच्या घरी आणली. पुस्तकं देवाण-घेवाणीसाठी माझ्या वारंवार मुंबई विद्यापीठात फेऱ्या व्हायच्या. तिथल्या मॅडम पुस्तक आणेपर्यंत मी आजूबाजूला डोकावायचे. पुस्तकांची रांगेत लावलेली कार्ड वाचण्यात बराच वेळ कसा निघून जायचा कळायचंच नाही. लायब्ररीचा तो परिसर फिरताना वाटायचं ‘अरे बाप रे, इथे कार्डच एवढी आहेत. ती वाचायलाच एवढा वेळ लागतो मग इथे पुस्तकं तरी किती असतील नि कशी ठेवत असतील. एखाद्या पुस्तकाचं नाव सांगितल्यावर नेमकं तेच पुस्तक कसं शोधून काढत असतील.’ असे अज्ञानातून बावळटासारखे प्रश्न मला पडायचे. नंतर बघून बघून पुस्तकाचं कार्ड आणि पुस्तकाचा क्रम यातली सिस्टीम मला कळली. मग राणे सरांच्या घरी असलेली पुस्तकं रांगेत नीट लावताना आम्ही लायब्ररीसारखी पुस्तक लावली. सरांना एखाद पुस्तक हवं असलं की ते दुसऱ्याला सांगून शोधून काढण्यात बराच वेळ जायचा. मग आम्ही पुस्तकांना कथा, कविता, कादंबरी, नाटक अशा वाङ्मय प्रकाराप्रमाणे कोडींग करून स्टिकर्स लावले आणि त्याची नोंद रजिस्टरमध्ये केली. ज्यामुळे आता कोणतीच गडबड न होता सर रजिस्टर उघडून अमुक एक कपाटात अमुक एका शेल्फवर इतक्या नंबरवर असलेलं पुस्तक दे असं सांगायचे. पुस्तक शोधण्याचं काम आता खूपच सोपं झालं होतं.
ते निटनेटकं लावलेलं पुस्तकाचं कपाट पाहताना अतिशय आनंद व्हायचा. त्यात सरांकडे कोणीही पाहुणे आले साहित्यिक, संपादक आले की सर आवर्जून सांगायचे की हे कपाट अश्विनीने लावलं आहे, हे ऐकताना ऊर अभिमानाने भरून यायचा. सरांच्या पुस्तकांच्या कपाटाची मी पालक झाले होते. वर्षातून दोन वेळा सर आणि मी पुस्तकं काढून नीट पुसून आमच्या नवीन सिस्टीमप्रमाणे लावून ठेवायचो. राणे सर कायम एका खुर्चीत व व्हिलचेअरवर बसून असायचे. पण पुस्तकांची निगुतीने काळजी घ्यायचे. कायम त्यांच्या टेबलवर लिखाणाचे कागद आणि पुस्तकं असायची. रस्त्याला लागूनच घर होते त्यामुळे घरात धूळ फार यायची. पण बाहेर ठेवलेल्या पुस्तकांवर धुळीचा एकही कण ते बसू द्यायचे नाहीत, इतकी पुस्तकांची काळजी घ्यायचे. माझ्याशी सरांच्या अनेक गोष्टींवर गप्पा व्हायच्या. तेव्हा पुस्तकांबद्दल बोलताना ते नेहमी म्हणायचे, ‘‘आपण देवघर कसं स्वच्छ ठेवतो, अंतःकरणातून देवाची पूजा करतो, तिथलं पावित्र्य जपतो. त्याप्रमाणे पुस्तकाचं कपाट केवळ कपाट नसतं तर ते सरस्वतीचं मंदिर आहे. या पुस्तकांमध्ये चक्क सरस्वतीचा वास आहे, मग तिची सेवा करायला आपण कसे विसरतो? अनेक जण पुस्तकं पुष्कळ वाचतात पण घरात, टेबलवर कशीही कुठेही टाकतात. पुस्तकांची पानं कशीही मोडलेली असतात, खाता खाता पुस्तक वाचायचं मग त्या खाद्यपदार्थांचे डागही त्या पुस्तकाला लागतात. आपल्या हातात चक्क सरस्वती आहे ही भावना मनात ठेवून पुस्तकांना स्पर्श केला पाहिजे म्हणजे आपसूकच पुस्तकांची काळजी घेतली जाईल.” आजही सरांचे हे विचार सरस्वती समोरील मंद ज्योतीप्रमाणे मनात तेवत आहेत, ज्याच्या प्रकाशात शब्दांशी असलेलं नात अधिकाधिक दृढ होत आहे. जागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा... वाचते व्हा, वाचत राहा !
Ashwinibhoir23@gmail.com