संमोहन

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ


भूलशास्त्राचा (Anesthesia) शोध लागण्याच्या आधीची एक घटना आहे. ही एक ऐतिहासिक महत्त्वाची घटना असल्यामुळे त्याची नोंद झालेली आहे. १८८० च्या दशकात एक स्कॉटिस सर्जन डाॅ. जेम्स एस्डेईल (Dr. James Esdaile) भारतात होते. ‘ईस्ट इंडिया कंपनी’त त्यांनी वीस वर्षे सेवा दिली. ते प्राणिक चुंबकत्व (Animal Magnetism) किंवा संमोहन ( Mesmerise) करून रुग्णांवर शस्त्रक्रिया करायचे. वेगवेगळ्या माहितीनुसार त्यांनी साधारण अशा तऱ्हेने संमोहन करून तीनशे ते चारशे शस्त्रक्रिया केल्या.


ते रुग्णाच्या मनाला संमोहित करून सूचना द्यायचे की ही शस्त्रक्रिया करताना तुला कोणताही त्रास किंवा संसर्गदोष होणार नाही. याचा अतिशय चांगला परिणाम व्हायचा. आश्चर्य म्हणजे रुग्णांच्या वेदना खूप कमी व्हायच्या. त्या काळात शस्त्रक्रियेनंतरचा मृत्यूदर खूपच जास्त होता. पण डॉक्टरांच्या या संमोहनामुळे रुग्णांचा मृत्यूदर फक्त दोन-तीन टक्केच होता, अशी नोंद आहे. मनाला दिलेल्या सकारात्मक सूचना शरीर स्वीकारते तसेच नकारात्मक सूचना ही स्वीकारते, असा त्यांचा दावा होता. अनेक शस्त्रक्रियेच्या प्रयोगानंतर हे सिद्धही करून त्यांनी दाखवले होते.


आपण वरील ऐतिहासिक महत्त्वाच्या घटनेचा विचार करून आजच्या काळातील आपले आयुष्य पाहूया. शस्त्रक्रियेसारख्या महत्त्वाच्या कामामध्ये जर संमोहन इतके महत्त्वाचे काम करत असेल, तर हे संमोहन दुसऱ्यांसाठी न वापरता फक्त स्वतःसाठी वापरले तर? इथे संमोहन म्हणजे स्वतःच्या मनाला ‘सकारात्मकतेच्या सूचना सातत्याने देणे’, एवढाच आपण विचार करू या. आपल्यातील प्रत्येक जण विचार करतो की मला आयुष्यात या क्षणी किती त्रास, किती दुःख आहेत. फक्त विचारानेसुद्धा त्या वेदना चेहऱ्यावर प्रकटल्यासारखे आपल्याला वाटते, तर यावर उपाय म्हणून आपण जन्मल्यापासून नेमका आपल्याला कधी आणि कोणता आनंद किती प्रमाणात मिळाला याचा विचार करायला सुरुवात करू या. फक्त विचाराच्या पुढे जाऊन हातात वही-पेन घेऊन ते लिहायला सुरुवात करूया. मी माझेच उदाहरण देते. बाबांना बरं नसल्यामुळे काही काळ आईने मला माझ्या आजीकडे ठेवले होते. आई जेव्हा मला घरी घेऊन जाण्यासाठी आली तेव्हा मी धावत जाऊन तिला बिलगले. तेव्हा मला केवढा आनंद झाला होता. ट्रेनच्या परतीच्या प्रवासात मी चिवचिवत होते. आई शांतपणे सगळे ऐकून घेत होती तेही हसऱ्या चेहऱ्याने. याचा अर्थ तिलाही खूप आनंद झाला होता आणि मग घरी आल्यावर तिने माझ्यासाठी खीर बनवली होती. त्यानंतर आठवडाभर सकाळ-संध्याकाळ मी भात-वरण खात होते कारण विदर्भामध्ये आजीकडे असताना फक्त सकाळ-संध्याकाळ भाकरीच बनायची. तोच त्यांचा रोजचा आहार होता. मला लहानपणापासून भात-वरण खूप आवडतो हे माझ्या आईलाच माहीत होते. मला या दीर्घकाळात भात-वरण खाता आले नव्हते हे ती जाणून होती. त्यावेळेस भात खाताना मला होणारा आनंद आजही जसाच्या तसा मला आठवतोय. म्हणजे मी आजीकडे उपाशी नव्हते; परंतु माझ्या आवडीचा पदार्थ सकाळ-संध्याकाळ खायला मिळणे, हा मात्र निश्चितपणे माझ्यासाठी वेगळा आणि महत्त्वाचा आनंद होताच!


मी हा आनंद माझ्या वहीत लिहून ठेवला.दुसऱ्या दिवशी दुसरा आनंद लिहिला. मला चित्रकलेत गती नव्हती. तेव्हा एका उन्हाळ्याच्या सुट्टीत बाबांनी मला करकरीत कोऱ्या पानांची वही आणि नवीन रंगीबेरंगी वॅक्सस्टीकची रंगपेटी घेऊन दिली आणि म्हणाले की, आपल्या घरी जे वर्तमानपत्र येतं ना त्यातील कोणतेही चित्र तू या वहीत काढ. मस्त रंगव. त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मला जणू छान चित्र शोधण्यासाठी पूर्ण वर्तमानपत्र कमीत कमी उलगडून बघायची आणि त्यानिमित्ताने थोडेफार वाचायची सवय लागली. शिवाय दिवसभरात मी एक चित्र काढून ते रंगवत होती. उन्हाळ्याची सुट्टी संपली आणि जून महिन्यातच एका चित्रकलेच्या स्पर्धेत मला भाग घेण्याची संधी मिळाली आणि त्यात चक्क पहिले पारितोषिक मिळाले. ही घटना मला जशीच्या तशी आठवत आहे याचे कारण ती घटना माझ्या कुटुंबात एकमेकांशी संवादादरम्यान अनेकदा ऐकलेली आहे. त्यानंतर माझ्या चित्रकलेत सुधारणाच होत गेली आणि नंतर खूप पारितोषिके मिळाली. मग तो आनंद मी वहीत लिहून ठेवला.


आता तुमच्या लक्षात आलेच असेल की, तुम्हाला भेटलेली मैत्रीण, कोणी कौतुकाने दिलेली भेटवस्तू, एखादा पाहिलेला सिनेमा, मिळालेले पुस्तक, नकळतपणे मिळत गेलेल्या अनेक संधी... तुम्ही जितक्या आठवाल तितके तुम्हाला छान छान सगळे आठवत जाईल आणि एकदा का मनाला चांगले आणि आनंददायी आठवायची सवय केलीत की मग वही लवकरच भरून जाईल. जेव्हा केव्हा मनावर मळभ दाटतेय, असे वाटेल तेव्हा ताबडतोब ही वही घेऊन वाचायला सुरुवात करायची!


‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीनुसार मी हे केलेले आहे आणि म्हणून सांगत आहे, तर तुम्हीही हा छोटासा प्रयोग करून बघा. स्वतःवरचा प्रयोग यशस्वी झाला, तर दुसऱ्यांवर प्रयोग करायला काहीच हरकत नाही!
pratibha.saraph@ gmail.com

Comments
Add Comment

माती कशी तयार होते?

विज्ञानकथा - प्रा. देवबा पाटील शिवम आणि त्याची मित्रमंडळी सहलीवर गेले होते. ते भुका लागल्याने दुपारच्या वेळी

शिक्षा नव्हे शिक्षण

कथा - रमेश तांबे नमस्कार बाल मित्रांनो, मी आज तुम्हाला दक्षिण कोरिया या देशातल्या एका शाळेची आणि त्या शाळेत

हास्यरसातून जीवनरस

प्रतिभारंग - प्रा. प्रतिभा सराफ एकदा अचानक एका दिवाळी अंकाच्या संपादकाचा फोन आला, तुम्हाला ‘हास्य’ या विषयावर

आंतरिक व्यक्तिमत्व

गोष्ट लहान, मोठा अर्थ - शिल्पा अष्टमकर मनुष्याचे बाह्य रूप, पोशाख, बोलण्याची शैली किंवा सामाजिक प्रतिष्ठा पाहून

बघ्यांची गर्दी नि रेंगाळणारा न्याय...

स्पंदन; अश्विनी शिंदे-भोईर उन्हाळ्यात लालभडक फुललेला गुलमोहोर. ज्याच्या सावलीत कदाचित अनेकांचं बालपण रुजलेलं

“माझं बाळ हट्टी नाही, ते मला काही तरी सांगतंय!”

आनंदी पालकत्व; डाॅ. स्वाती गानू अभिषेक आणि समिधा दोघेही तीन वर्षांच्या निहारला घेऊन एका मोठ्या हॉटेलमध्ये