Wednesday, April 22, 2026

Jammu and Kashmir Accident : उधमपूरमध्ये प्रवासी बस खड्ड्यात कोसळून अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Jammu and Kashmir Accident : उधमपूरमध्ये प्रवासी बस खड्ड्यात कोसळून अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात भीषण रस्ते अपघाताची घटना घडली आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढून १५ वर पोहोचली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सोमवारी सकाळी रामनगर परिसरातील कागोट गावाजवळ घडला. एका प्रवासी बसचा डोंगराळ रस्त्यावर ताबा सुटल्याने ती खोल दरीत कोसळली.

माहितीनुसार, ही बस दुर्गम गावातून उधमपूरकडे जात होती. यादरम्यान हा अपघात घडला आहे. अपघाताच्या वेळी बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत होते. त्यामध्ये सरकारी कर्मचारी, शाळा व महाविद्यालयातील शिक्षक तसेच विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. सकाळी सुमारे ९.४० वाजण्याच्या सुमारास कघोट परिसरात वळण घेताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. या अपघातात अनेक जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

घटनेनंतर तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. प्रशासन आणि पोलिसांच्या पथकांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात पोहोचवले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. परिसरात शोककळा पसरली असून प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.

अपघातानंतर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी उधमपूरच्या उपायुक्तांशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि गंभीर जखमींना एअरलिफ्ट करण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती दिली. मदत व बचावकार्य वेगाने सुरू असून प्रशासनाशी सतत संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा