ठाणे : डोंबिवली, ठाणे, कल्याण, या परिसरातून अनेक लोक मुंबईत आपल्या कामानिमित्त येत असतात. अशातच जर मुंबईच्या लोकलचे वेळापत्रक कोलमडले तर संपूर्ण वेळेचे नियोजन बिघडते.
डोंबिवली स्थानकात नेमकं घडलं काय ?
मध्य रेल्वे आज प्रवाशांसाठी मनस्तापाची ठरली. कळवा कारशेडमधून कल्याणकडे येणाऱ्या रिकाम्या लोकलचा डब्बा रुळावरून घसरला आणि मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. डबा रुळावरून घसरल्याने स्लो मार्गावरील लोकलच्या फेऱ्या या अडकल्या. त्यामुळे डोंबिवली स्थानकात गर्दी झालेली पाहायला मिळाली. दरम्यान कोपर आणि ठाकुर्ली दरम्यान पुढील काही तास एकही लोकल थांबणार नसून प्रवाशांनी डोंबिवली स्थानकातून जलद लोकलने प्रवास करावा, कल्याण ते दिवा दरम्यान सर्व लोकल जलद मार्गावरून चालवल्या जात असल्याची सूचना रेल्वे प्रशासनाने दिली.
डबा रुळावरून घसरल्याने डाऊन स्लो मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. याचा परिणाम मागच्या गाड्यांवर झाला. अनेक गाड्या या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.
परिस्थिती पूर्ववत होण्यास काही वेळ लागण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी खबरदारी घेऊन, शक्य असल्यास पर्यायी मार्गाचा वापर करावा अशा सूचना रेल्वे प्रशासनाने दिल्या आहेत.
पनवेल स्थानकात लिफ्ट कोसळली ४ प्रवासी अडकले
नवी मुंबईतदेखील ऐन ऑफिसच्या वेळी पनवेल स्थानकातील लिफ्ट अचानक खाली कोसळली. लिफ्टच्या दारांचे तुकडे झालेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. लिफ्टमध्ये ४ प्रवासी अडकले होते. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.






