पुष्कर

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे


पुष्कर हे ठिकाण हिंदू व शिख धर्मीयांसाठी पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यात अजमेरपासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. येथे पूर्ण भारतात एकमेव असे ब्रह्मदेवाचे मंदिर आहे. पुष्कर म्हणजे पुष्प आणि कर म्हणजे हात त्यापासून पुष्कर शब्द बनला आहे. ब्रह्मदेवाच्या हातून या ठिकाणी कमळ पडल्याने त्याचे नांव पुष्कर झाले अशी आख्यायिका आहे. येथे पुष्कर तलाव असून या तलावाची गणना मानस सरोवर, नारायण सरोवर, बिंदू सरोवर, पंपाससरोवर व पुष्कर सरोवर या पंच सरोवरात होते. या सरोवरात स्नान केल्याने पापापासून मुक्ती मिळते, असेही मानले जाते. येथे जवळपास ५०० मंदिरे व ५० घाट आहेत.


पद्मपुराणानुसार एकदा ब्रह्मदेवांना तप व यज्ञ करण्याची इच्छा झाली. त्यासाठी त्यांनी पृथ्वीतलावर जागेचा शोध सुरू केला. शोधत शोधत ते पुष्कर तीर्थक्षेत्री आले असता तेथील वृक्षवेली पाहून त्यांना आनंद झाला. वृक्षवेलींनीही ब्रह्मदेवावर पुष्पवृष्टी केली. त्यामुळे आनंदित झालेल्या ब्रह्मदेवांनी वृक्षवेलींना वर मागण्यास सांगितले. वृक्षवेलींनी ब्रह्मदेवांनी याच वनात राहावे अशी इच्छा व्यक्त केली. ब्रह्मदेवानेही तेथेच राहून तप करण्याचे ठरविले.


एकदा ब्रह्मदेवाच्या हातातील कमळ (काही ठिकाणी कमळाच्या तीन पाकळ्या पडल्या असा उल्लेख आहे) खाली पडले. त्यामुळे प्रचंड आवाज होऊन धरणी कंपायमान झाली. देव गंधर्व यांची नगरीही कंपायमान झाली. पर्वत शिखरेही कोसळली. या घटनेमुळे तिन्ही लोक भयभीत झाले. सर्व देव ब्रह्मदेवाला शोधू लागले. मात्र ते न दिसल्याने देवतागण श्रीविष्णूकडे गेले. श्रीविष्णू व सर्व देवतागण ब्रह्मदेवाच्या शोधात पुष्कर वनात आले; परंतु त्यांना वनात ब्रह्मदेवाचे दर्शन झाले नाही. वनात फिरत असतानाच वायूने त्यांना तुम्ही ध्यान व तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला आवाहन करा त्याशिवाय ते दिसणार नाहीत असे सांगितले. तेव्हा देवांनी प्रार्थना व विनवणी केली. देवाच्या विनंतीवरून ब्रह्मदेव
प्रकट झाले.


सर्व देवांनी ब्रह्मदेवांना धरणी कंपायमान होण्याचे कारण विचारले असता, ब्रह्मदेव म्हणाले, “वज्रनाभ नावाचा एक राक्षस लहान जीवांना पळवून पाताळात नेत असे. तुम्ही सर्व देव शस्त्रविहीन येथे येणार हे मला ज्ञात असल्याने वज्रनाथपासून तुम्हाला अपाय होऊ नये म्हणून मी कमळाच्या आघाताने त्याला ठार केले. सर्व प्राणीमात्रांच्या हितासाठी व कल्याणासाठी मी मंत्रोच्चाराच्या साह्याने त्याचा नाश केला. तसेच कमळाच्या दर्शनाने त्यालाही स्वर्गप्राप्ती झाली आहे, असे सांगितले.


पुष्कर येथे देव व मानवांच्या कल्याणासाठी ब्रह्मदेवाने यज्ञ करण्याचे ठरविले. यज्ञाचे पौरोहित्य भृगूऋषीकडे दिले, तर यज्ञ रक्षणाची जबाबदारी श्री विष्णूंनी स्वीकारली. दान देण्याची जबाबदारी कुबेराकडे दिली, तर वस्त्रदान सरस्वती देवीने स्वतः करण्याचे ठरविले. वरुण देवाने भोजनव्यवस्था सांभाळली. यज्ञाकरिता देव, दानव, गंधर्व, अप्सरा, भूत, पिशाच्च, नाग, गंधर्व, विद्याधर व सर्व वनस्पती हजर होत्या.


यज्ञ सुरू करण्यापूर्वी ब्रह्मदेवाने ब्राह्मण पूजन करून त्यांचा सत्कार केला व सपत्नीक यज्ञ आरंभ करण्यासाठी सरस्वतीला लवकर येण्याचा निरोप पाठवला. सरस्वतीला येण्यास वेळ लागू लागला व यज्ञाचा मूहूर्त टळून जाण्याची वेळ येऊ लागल्याने ब्रह्मदेवाला राग आला व त्यांनी इंद्राला विवाहसाठी कन्या शोधण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे इंद्राने एका गवळ्याच्या गायत्री नामक सुंदर मुलीला आणले. विष्णूच्या सहमतीने ब्रह्मदेवांनी तिच्याशी विवाह करून यज्ञ पार पाडला. सरस्वतीला आल्यावर ही बाब कळली. तिला अतिशय राग आला व तिने ब्रह्मदेवांना पुष्करशिवाय तुमची कुठेही पूजा केली जाणार नाही असा शाप दिला व त्यामुळेच पुष्करशिवाय कुठेही ब्रह्मदेवाचे मंदिर नाही.
दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात या ठिकाणी आशियातील सर्वात मोठा उंटांचा बाजार भरतो. त्यासाठीही पुष्कर प्रसिद्ध आहे.

Comments
Add Comment

आएगा आनेवाला...…

स्मृतीपटल; अनिल तोरणे आजकालच्या तांत्रिक युगात सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या आहेत; पण एक काळ असा होता की लहानातील

नातं माय-लेकीचं

मातृदिन; प्रसाद कुळकर्णी लेकीच्या लहानपणापासून ते अगदी शिकून सवरून तिला नोकरी लागल्यावरही, तिची काळजी, तिच्या

ताजे निकाल आणि उद्याचे राजकारण

वर्तमान; शंतनू चिंचाळकर - केरळ आणि पश्चिम बंगालमधील संभाव्य सत्तापालट केवळ राज्यांपुरता मर्यादित नसून भारतीय

‘अगर मुझसे मुहब्बत है...’

नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे प्रियकर-प्रेयसी’ किंवा जुन्या साध्या सरळ भाषेत बोलायचे तर भावी ‘पती-पत्नी’च्या

व्यक्तिमत्त्व विकास

मनस्विनी; पूर्णिमा शिंदे व्यक्तिमत्त्व विकासामध्ये आपल्यातील अंतरिक, बाह्यशक्ती, गुण समाविष्ट होतात. आपलं

मथुरेतील कृष्णलीला व कंस वध

महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे कृष्णाकडून आपला मृत्यू होणार अशी देववाणी झाल्यानंतर कंसाने श्रीकृष्णाला