Friday, April 17, 2026

Nari Shakti : बीकेसीत शनिवारी नारी शक्ती रन

Nari Shakti : बीकेसीत शनिवारी नारी शक्ती रन

मुंबई : देशाच्या विकास प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि ‘नारी शक्ती वंदन’ अभियानाला गती देण्यासाठी उद्या, शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) ‘नारी शक्ती फॉर विकसित भारत रन’चे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयामार्फत आयोजित या उपक्रमात मुंबईसह देशातील सात प्रमुख शहरांतून सुमारे ३५ हजार महिला एकाच वेळी धावणार आहेत. एकट्या मुंबईत ३ हजार महिलांचा सहभाग अपेक्षित आहे.

'मेरा युवा भारत’चे महाराष्ट्र राज्य संचालक अमित पुंडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत या दौडची माहिती दिली. यावेळी उपसंचालक अनुप इंगोले आणि लेखाधिकारी मदन घेघाटे उपस्थित होते. मुंबईव्यतिरिक्त बंगळुरू, पाटणा, कटक, दिल्ली, जयपूर आणि इंदूर या शहरांमध्येही हा उपक्रम समांतरपणे राबवला जाणार आहे.मुंबईतील या विशेष दौडला प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि आमदार अमित साटम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

२.२ किलोमीटरची दौड : बीकेसी येथील अव्हेन्यू ५ रोडवरील परिनी क्रेसेंझो इमारतीपासून सकाळी ७:३० वाजता दौडला सुरुवात होईल. ही दौड २.२ किलोमीटर अंतराची असून, धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलपर्यंत जाऊन पुन्हा मूळ ठिकाणी समाप्त होईप. सकाळी ६:३० वाजता नोंदणी प्रक्रिया पार पडल्यावर सर्व महिलांना सामूहिक ‘नारी शक्ती प्रतिज्ञा’ दिली जाईल. ३ हजार महिला सहभागी होणार : मुंबईतील या उपक्रमात सुमारे ३ हजार महिला सहभागी होतील, असा अंदाज आहे. यामध्ये विद्यार्थिनी, व्यावसायिक, उद्योजिका, क्रीडापटू आणि आध्यात्मिक तसेच स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल. सहभागी होणाऱ्या सर्व महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण केले जाणार आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा