बालकांच्या असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रणासाठी सामंजस्य करार
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बालकांमधील असंसर्गजन्य आजारांवर (एनसीडी) प्रभावी नियंत्रणासाठी नागपूर येथील एम्स, बालरोग विभागासोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (एमओयू) केला आहे.
कराराच्या माध्यमातून बालकांसाठी अधिक सुरक्षित, निरोगी आणि समर्थ वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने ठोस पाऊल
हा करार नागपूर येथील एम्स, बालरोग विभागासोबत करण्यात आला असून, या अंतर्गत राज्यातील जिल्हा रुग्णालयांमध्ये चाइल्डहुड एनसीडी क्लिनिक्स स्थापन व कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या उपक्रमातून टाईप-1 मधुमेह, जन्मजात हृदयरोग, दमा, स्थूलता, सिकलसेल, मानसिक आरोग्य आणि विकासात्मक विकार यांसारख्या आजारांचे प्रतिबंध, लवकर निदान आणि प्रभावी उपचार सुनिश्चित करण्यात येणार आहेत. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मानकीकृत उपचार पद्धती, डेटा संकलन प्रणाली आणि तज्ज्ञ मार्गदर्शन यावर विशेष भर दिला जाणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढाकारातून करण्यात आलेले हा सामंजस्य करार पुढील तीन वर्षांसाठी कार्यान्वित असणार आहे. या करारांमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेत गुणवत्ता, उपलब्धता आणि सर्वसमावेशकता वाढवण्यास मोठी चालना मिळणार आहे.






