निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळणार सुसज्ज विस्तारीत इमारत....
येवला : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून निफाड तालुक्यातील निमगाव वाकडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ३ कोटी ३८ लाखांच्या मुख्य इमारतीच्या बांधकामाला जिल्हा वार्षिक योजनेमधून मंजुरी मिळाली असून लवकरच या कामाला सुरुवात होऊन वैद्यकीय सुविधा देण्यासाठी सुसज्ज इमारत मिळणार आहे.
निमगाव वाकडा येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र ही इमारत लहान असल्याने रुग्णांना सेवा देण्यासाठी अपुरी पडणार होती. त्यादृष्टीने निमगाव वाकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विस्तारित इमारतीसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आरोग्य विभागाकडे पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेमधून या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, संबंधित निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज व आधुनिक इमारत उभारण्यात येणार आहे. यामध्ये रुग्णांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे.
सदर आरोग्य केंद्राच्या विस्तारीकरणामुळे निमगाव वाकडा तसेच परिसरातील नागरिकांना दर्जेदार व तात्काळ आरोग्य सेवा मिळणार आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या कामाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, दर्जेदार व पारदर्शक पद्धतीने बांधकाम पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.