लखनऊ : उत्तर प्रदेशातील एका चोरट्याला पकडण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) राबवलेली कारवाई अत्यंत थरारक ठरली. चोरी करून पळणाऱ्या आरोपीने पोलिसांना चकवा देण्यासाठी थेट तलावात उडी घेतली आणि तब्बल पाच तास पाण्यात लपून बसल्याची घटना समोर आली आहे.
तलावात लपण्याचा अनोखा प्रयत्न
जबलपूर विभागातील सिहोरा रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. एका महिला प्रवाशाची पर्स चोरल्यानंतर हरविंदर सिंग (वय 32) याने पळ काढला. पोलिसांचा पाठलाग सुरू झाल्याचे लक्षात येताच त्याने जवळच्या तलावात उडी घेतली. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने कमळाच्या पोकळ देठाचा वापर करून श्वास घेण्याचा प्रयत्न केला आणि पाण्याखाली लपून राहिला.
पाच तास चालले शोधमोहीम
पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि जुन्या नोंदींचा आधार घेत तपास केला. ICJS प्रणालीद्वारे तपास करताच तो उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील सराईत गुन्हेगार हरविंदर सिंग असल्याचे स्पष्ट झाले.
अनेक राज्यांत गुन्ह्यांची नोंद
या आरोपीविरुद्ध मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील विविध ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तो प्रामुख्याने रेल्वेत विनातिकीट प्रवास करून महिला आणि वृद्ध प्रवाशांना लक्ष्य करत असे. पोलिसांना चकवा देण्यासाठी तो वारंवार सिम कार्ड बदलत असल्याची माहितीही समोर आली आहे.
इगतपुरी, भोपाळ, इटारसी आणि विशाखापट्टणम येथील रेल्वे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध आधीच वॉरंट जारी केले होते. त्यामुळे तो दीर्घकाळापासून पोलिसांच्या रडारवर होता. अखेर जबलपूर RPF ने त्याला ताब्यात घेतले आहे.






