नवी मुंबई : नवी मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी बातमी सिडकोने दिली आहे. नवी मुंबई आता केवळ मुंबईचे उपनगर न राहता जागतिक नकाशावर एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. येत्या एप्रिल महिन्याच्या अखेरपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून थेट परदेशातील विमान सेवा (International Flights) सुरू होणार आहे. या विमानसेवेमुळे नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्याची आणि तिथल्या भीषण वाहतूक कोंडीत अडकण्याची गरज उरणार नाही. प्रवाशांचा वेळ आणि श्रम वाचणार असून, नवी मुंबई थेट जगाशी जोडली जाणार आहे. यामुळे दळणवळणासह शहराच्या आर्थिक विकासालाही मोठी गती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
७६ शहरांनंतर आता थेट परदेशाशी नातं जोडणार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रवाशांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, आता हे विमानतळ जागतिक स्तरावर झेप घेण्यासाठी सज्ज झाले आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या अखेरपर्यंत विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याची सर्व तांत्रिक तयारी पूर्ण झाली आहे. सध्या या विमानतळावरून दररोज सुमारे १९ हजार प्रवासी प्रवास करत असून, दररोज १५० विमानांच्या फेऱ्यांद्वारे हे केंद्र देशातील ७६ प्रमुख शहरांशी जोडले गेले आहे. प्रवाशांची ही वाढती संख्या आणि मागणी लक्षात घेता, आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सेवा विस्तारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे नवी मुंबई विमानतळाची कनेक्टिव्हिटी केवळ देशांतर्गत मर्यादित न राहता, थेट परदेशातील महत्त्वाच्या शहरांपर्यंत पोहोचणार आहे, ज्यामुळे भविष्यात प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत.
सिडकोचा कोटींचा 'मेगा प्लॅन'
वॉटर टॅक्सी ते कार्गो हब...भविष्यातील 'हायटेक' सुविधा
१. अद्ययावत टर्मिनल्स: प्रवाशांच्या सुलभ प्रवासासाठी 'टर्मिनस २' आणि एक भव्य 'मध्यवर्ती टर्मिनल संकुल' (Central Terminal Complex) उभारले जाणार आहे. हे सर्व संकुल अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल.
२. जागतिक कार्गो हब: आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यासाठी येथे 'फेडेक्स' (FedEx) सारख्या दिग्गज कंपनीचे कार्गो हब उभारण्याचा विचार सुरू आहे. यामुळे मालवाहतूक अधिक वेगवान आणि सुलभ होईल.
३. वॉटर टॅक्सीचा पर्याय: रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रवाशांना थेट विमानतळापर्यंत पोहोचता यावे, यासाठी 'वॉटर टॅक्सी' प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन आहे. यामुळे समुद्राच्या मार्गाने विमानतळावर पोहोचणे शक्य होईल.
४. मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब: रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतूक या तिन्ही सेवांचा संगम एकाच ठिकाणी घडवून आणण्यासाठी येथे 'मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब' बांधण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना एका वाहनातून दुसऱ्या वाहनात बदलणे अत्यंत सोपे होईल.