Monday, April 6, 2026

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार या त्रिसूत्रीवर आधारित सर्वसमावेशक विकासाचा ठोस रोडमॅप मांडला असून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पर्यटनाला चालना देत शेतकऱ्यांना बळ देणे आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे हे सरकारचे धोरण असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

'कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२६' चा भव्य सांगता सोहळा विकासकामांच्या उद्घाटन, भूमिपूजन आणि सांस्कृतिक जल्लोषात दिमाखात पार पडला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संग्रामपूर व पाटण मतदारसंघातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे उद्घाटन झाल्याने जिल्ह्याच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाला.

यावेळी कोयना नदीवरील सांगवड येथील मोठ्या पुलाचे, दौलत नगर येथील शिवदौलत स्टेडियम आणि महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकातील संगीत कारंजे आणि लेझर शोचे, तसेच स्वर्गीय शिवाजीराव देसाई स्मृती भवनाचे उद्घाटन संपन्न झाले. तसेच पाथर्डी येथील जलपर्यटन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

कोयना, सह्याद्री पर्वतरांग, कास पठार, महाबळेश्वर-पाचगणी या नैसर्गिक संपत्तीमुळे साताऱ्यात पर्यटनाची प्रचंड क्षमता असून पर्यटनातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटनामुळे स्थानिक युवकांना रोजगार, शेतमालाला बाजारपेठ आणि महिला बचत गटांना उत्पन्न मिळणार असून “पर्यटन म्हणजे थेट आर्थिक क्रांती” असे त्यांनी स्पष्ट केले. नवीन महाबळेश्वर हा साडेपाचशेहून अधिक गावांचा पर्यावरणपूरक विकास करणारा 'नवीन महाबळेश्वर' प्रकल्प हा महत्त्वाचा प्रकल्प ठरणार असून या माध्यमातून स्थानिकांचे जीवनमान उंचावणार, रोजगार वाढणार आणि आर्थिक प्रगती साधली जाणार आहे. याचबरोबर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणारे पूल, १०५ गावांना जोडणारी कनेक्टिव्हिटी, घाट आणि पर्यटन सुविधा यामुळे विकासाला वेग मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत त्यांनी स्पष्टपणे जाहीर केले की “शेतकऱ्याची एकही इंच जमीन सरकार घेणार नाही” तसेच शेतकऱ्यांनी आपली जमीन विकू नये कारण भविष्यात तिचे सोनं होणार आहे. “महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्याचा आहे” असे सांगत त्यांनी शेती आणि पर्यटन यांच्या संगमातून दुहेरी उत्पन्नाचा मार्ग दाखवला.

क्लस्टर शेती, कॉफी, सफरचंद, आंबा, चंदन यांसारख्या पिकांचे प्रयोग, तसेच ८००० एकरवर बांबू लागवड यांचा उल्लेख करत त्यांनी शेतीतील नावीन्यपूर्ण प्रयोगांना चालना दिली. बांबू उद्योग मोठा आर्थिक स्रोत ठरू शकतो असे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे या क्षेत्राला चालना मिळाल्याचे नमूद केले. तसेच AI तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती अधिक उत्पादक करण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार देण्यावर सरकारचा भर असून होम स्टे, अ‍ॅग्रो टुरिझम, बेड अँड ब्रेकफास्ट यांसारख्या योजनांद्वारे गावातच रोजगार उपलब्ध होत आहे. महिला बचत गटांचे स्टॉल, हस्तकला प्रदर्शन यामुळे महिलांनाही आर्थिक संधी निर्माण होत आहेत.

कोयना महोत्सवात यंदा लावणी, भजन, पोवाडे, कृषी व पशुपक्षी प्रदर्शन, तसेच आधुनिक AI आधारित कृषी प्रदर्शन अशा विविध उपक्रमांमुळे परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम दिसून आला. जिल्ह्यात आता आरोग्य क्षेत्रात नॅचरोपॅथी सेंटर आणि हेल्थ अँड वेलनेस सेंटर उभारण्यात येत असून पर्यटनासोबत आरोग्य सुविधांनाही चालना दिली जात आहे. याचबरोबर परवडणारी घरे आणि स्थानिकांसाठी गृहनिर्माण योजना राबवून ग्रामीण भागात आधुनिक जीवनमान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

आपत्तीच्या काळातही निर्णयक्षम नेतृत्व दाखवत एमएमआरडीएकडून १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घरबांधणी केली असल्याचे त्यांनी सांगितले आणि “माणूस महत्त्वाचा” हा संदेश दिला. विकासाचे आकडे मांडताना त्यांनी ८००० एकर बांबू लागवड, १७५ पेक्षा अधिक सिंचन प्रकल्प, १५ लाखांवरून ३७ लाखांपर्यंत वाढलेले पर्यटक, तसेच ४५० कोटी रुपयांची मदत यांचा उल्लेख करत राज्यात वेगाने विकास होत असल्याचे सांगितले. “मी आरोपांना उत्तर देत नाही, माझं कामच उत्तर देतं” आणि “एकदा शब्द दिला की तो पूर्ण करतो” असे ठाम विधान करत त्यांनी आपल्या नेतृत्वाची भूमिका स्पष्ट केली.

शेवटी “माझ्यासाठी सर्वात मोठं पद म्हणजे लाडक्या बहिणींनी दिलेली ‘लाडक्या भावाची’ ओळख” असे सांगत त्यांनी जनतेशी असलेले नाते अधोरेखित केले. कोयना दौलत डोंगरी महोत्सव हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून पर्यटन, शेती, रोजगार आणि पायाभूत सुविधांचा संगम असलेला सर्वांगीण विकासाचा मॉडेल असल्याचे स्पष्ट करत साताऱ्याला पर्यटन हब बनवण्याचा निर्धार शिंदे यांनी यावेळी पुन्हा एकदा व्यक्त केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >