गावची जत्रा - आठवणींचा दरवळ

स्मृतीगंध : लता गुठे


वेळ दुपारची, एसी गाडीतही जाणवणारं रणरणतं ऊन, डांबरी सडकेवर खेळणारं मृगजळ आणि रस्त्याच्या दुतर्फा चैत्र महिन्यात रसरसलेली कोवळी झाडाची पालवी मनाला सतेज करत होती. गाव जवळ येताच काही अंतरावर गंगेवरून पाणी घेऊन जाणारी तरुण मुले दिसली. खांद्यावर कावड घेऊन भर उन्हात चालणारी ती तरुण मुलं पाहिली अन् लक्षात आलं, की गावची जत्रा असावी आणि मन बालपणाच्या रस्त्यावर धावू लागलं. लहानपणी अनुभवलेली गावातील जत्रा... किती उत्साह असायचा तो! जत्रा जवळ आली की गावभर स्वच्छतेला सुरुवात व्हायची. घराची साफसफाई त्याबरोबरच अंगणात सडे रांगोळ्या पडायच्या.


एक वेगळाच उत्साह सर्वांच्या ठाई दिसायचा. मंदिराला रंगरंगोटी करून मंदिराच्या रस्त्यावर लाइटिंग केली की गाव झळाळून उठायचं आणि जत्रेचा दिवस उगवायचा. सकाळपासूनच घरामध्ये धांदल सुरू असायची.


चैत्र महिन्याची ती थंडगार सकाळ, गावाच्या वेशीवरून येणारा तो हरिनामाचा गजर ऐकला की आम्ही सर्व वेशीपर्यंत धावायचो. कावडी घेऊन आलेल्या मुलाचे गावात स्वागत व्हायचे. चालून चालून क्षिणलेली ती मुलं देवाचा गजर करत एकापाठोपाठ एक शिस्तीत चालायची. त्या गजरामध्ये सर्व भाविक सामावून जायचे. गावातल्या देवाच्या यात्रेनिमित्त सर्व शेतकरीवर्ग शेतातील काम बंद ठेवून त्या धार्मिक सोहळ्यात सामावून जायचा. धकाधकीच्या रोजच्या जीवनातून मिळणारा तो आनंद, उत्साह नंतर कित्येक दिवस उरायचा. जत्रा म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नव्हता, सामूहिक, सांस्कृतिक जीवनाच्या रंगांची उधळण होती ती.


सकाळपासूनच घरात एक वेगळीच लगबग सुरू व्हायची. मंदिराच्या बाहेरच्या मैदानात खाऊचे, कपड्याचे, तसेच रोजच्या जीवनात लागणाऱ्या वस्तूंचे पालं आदल्या दिवशीच बांधून तयार असायची. प्रत्येक व्यापारी आपापल्या चीज वस्तू आकर्षक पद्धतीने लावण्यात गर्क असायचे. कपड्यापासून मिठापर्यंत, शेतीतला अवजारांपासून शोच्या वस्तूंपर्यंत सर्व काही जत्रेत मिळायचं.


सर्व आजूबाजूचे बारा पगड जातीचे लोक जमा व्हायचे. सुया पोथी विकणाऱ्या डोक्यावर गाठोडे घेऊन बाया जागो जागी उभ्या असायच्या. काही मंडळी हातावर गोंधवून घेण्यात मग्न असायचे आणि त्या रस्त्याने चालताना आमची नजर फुलपाखरांसारखी फिरायची. देवाची पालखी ढोल-ताशा-लेझीमच्या गजरामध्ये गावातून मिरवत मंदिरापर्यंत पोहोचायची तोवर पाय दुखायला लागायचे.


जत्रेच्या दिवशी सकाळी बाबा आम्हाला खर्चायला पैसे द्यायचे आणि आवर्जून बजावून सांगायचे, “एकटे जाऊ नका, मोठ्या माणसाबरोबर राहा.” मग आम्ही सर्व भावंडं एकत्र जत्रेत फिरायला जायचं. एकमेकांचे हात पकडून चालायचो. त्या दहा-पंधरा रुपयांमध्ये काय काय खरेदी करायचे? काय खायचे? राहट पाळण्यात बसायचे आणि तो बायोस्कोप! एका छोट्याशा पेटीतून दिसणारं रंगीत चित्रं म्हणजे जादूच वाटायची. “देखो भाई देखो... म्हणणाऱ्या माणसाभोवती मुलांची गर्दी व्हायची. त्या लहानशा खिडकीतून दिसणारं मोठं जग-तो अनुभव आजच्या मोठ्या पडद्यावरही सापडत नाही. खोक्याच्या दुर्बिणीतून दिल्लीचा लालकिल्ला, कुतुबमिनार, आग्र्याचा ताजमहाल आणि असं बरंच काही क्षणात फिरून येता यायचं. दोन पैशाला तो आनंद विकत घेता यायचा आणि संध्याकाळी एखादी बाहुली, खेळणीतले भांडे, नेलपेंट, टिकल्यांचे पाकीट असं बरंच काही नवीन सामान घेऊन उड्या मारत घरी परतायचो.


आईची, काकूची सर्व कामं आवरली की प्रसाद, नारळ, पूजेचे सामान घेऊन त्या मंदिराच्या दिशेने निघायच्या. त्यांच्याबरोबर आम्ही असायचो. रस्त्यात प्रचंड गर्दी, गावाच्या रस्त्यावरून मंदिराकडे चालताना धुळीचा लोट उडत असे, पण त्या धुळीतही फुलांचा, धूप -अगरबत्तीचा सुगंध असायचा. गावातील प्रत्येक जण रस्त्यात भेटायचे. एकमेकांची आपुलकीने चौकशी करायचे. नवीन लग्न झालेल्या मुली माहेरी आलेल्या असायच्या. जत्रेच्या मैदानात पाय ठेवताच डोळ्यांसमोर रंगांची उधळण उभी राहत असे. लाल, पिवळ्या, निळ्या हिरव्या रंगाने सजलेली पालातली दुकानं आणि त्यातून येणारा मिठाईचा सुगंध यायचा. नेहमीच्या ओळखीच्या मिठाईवाल्याकडून आजी भरपूर मिठाई घ्यायची. तेव्हा रेवड्या खूप छान मिळायच्या. रेवड्या, फुटाणे, जिलेबी, चुरमुरे असं बरंच काही घेऊन यायची. ते खाणं जवळजवळ आठ दिवस पुरायचं.


जत्रेतल्या रहाट पाळण्याचा तो चिरचिर आवाज अजूनही मनात गुंजतो - चक्र फिरताना येणारा किर्रर्र आवाज आणि त्यावर बसलेल्या मुलांच्या आनंदाने भरलेल्या आरोळ्या! त्या क्षणी वेळ थांबून गेल्यासारखी वाटायची. दोन पैशांची भेळ, गरमागरम जिलबी, गुळाच्या पोळ्यांचा गोड वास-हे सगळं मिळून जत्रा म्हणजे जिभेवर आणि मनावर रेंगाळणारी चव बनून जायची. जत्रेचे दोन दिवस भारल्यासारखे असायचे.


रात्र झाली की जत्रेचा खरा रंग खुलायचा. दिव्यांच्या उजेडात उजळलेलं मैदान, ढोल-ताशांचा निनाद आणि दूरवर ऐकू येणाऱ्या लावणीच्या फडातील नाच-गाण्यांचा आवाज सगळं वातावरण भारून टाकायचा. तमाशाच्या फडात बसलेले लोक, रंगमंचावर झळकणारे कलाकार, आणि त्यांच्यावर उधळले जाणारे पैसे, टाळ्यांचा कडकडाट तो एक वेगळाच सोहळा असायचा, तर कुठे ओपन सिनेमे असायचे.


जत्रा म्हणजे फक्त मनोरंजन नव्हतं; ती होती माणसांना जोडणारी एक समृद्ध परंपरा. वर्षातून एकदा भेटणारे नातेवाईक, जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या गप्पा आणि नव्या ओळखींची सुरुवात - सगळं काही त्या काही दिवसांत सामावलेलं असायचं. आपलेपणाचा, मायेचा, प्रेमाचा उत्साह आज मात्र दिसत नाही.


आता जत्रेत फिरताना ना तो आनंद मिळतो, ना उत्साह जाणवतो. आज काळ बदलला, साधनं बदलली आणि जत्रांचं स्वरूपही बदललं. पण त्या १९८० च्या दशकातील जत्रेची जादू, तो निरागस आनंद, आणि त्या आठवणींचा गोड दरवळ अजूनही मनाच्या कोपऱ्यात तसाच दरवळतो आहे. जणू काही काळाच्या ओघात हरवलेली ती जत्रा, आठवणींच्या गाभाऱ्यात मात्र आजही तितकीच सुंदर आहे….

Comments
Add Comment

समाजमाध्यमांच्या आहारी...

दखल : मंजिरी ढेरे अलीकडच्या काही महिन्यांमध्ये ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी मुलांच्या ‌‘सोशल मीडिया‌’ वापरावर

जादू जेवर विमानतळाची

पैलू : अजय तिवारी नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा एव्हिएशन क्षेत्रातील ‌‘आर्थिक गळती‌’ थांबवण्याचा लक्षवेधी

‘उठो, हमारा सलाम ले लो’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे ‘मुगले आझम’(१९६०)मध्ये दिलीपकुमार (सलीम उर्फ जहांगीर) आणि मधुबाला (अनारकली)

आम्ही चालवू हा पुढे वारसा...

स्पंदन : अश्विनी शिंदे - भोईर गावाचं गावपण राखून असलेलं बोर्डी हे डहाणू तालुक्यातील निसर्गरम्य गाव. भारत

ब्रह्मचर्य व गृहस्थ धर्म

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे भारतीय परंपरेत मानवी जीवन चार आश्रमात विभागले आहे. ब्रह्मचर्याश्रम,

अनुभव

जीवनगंध - पूनम राणे सकाळची ६.३०ची वेळ होती. नीटसे उजाडलेले नव्हते. सूर्य उगवण्याच्या तयारीत होता. झाडावरील फुले