‘उठो, हमारा सलाम ले लो’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे


‘मुगले आझम’(१९६०)मध्ये दिलीपकुमार (सलीम उर्फ जहांगीर) आणि मधुबाला (अनारकली) यांच्यासह अनेक दिग्गज होते - पृथ्वीराज कपूर (अकबर), दुर्गा खोटे (महाराणी जोधाबाई), अजित (दुर्जनसिंग), मुराद (राजा मानसिंग), जीलूबाई (अनारकलीची आई), निगार सुलताना (नर्तिका बहार), कुमार (मूर्तिकार) आणि प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यतज्ञ गोपीकृष्णजी.


सिनेमाची कथा एका दंतकथेवर आधारलेली होती – बादशहा अकबराला मुलगा नसल्याने तो एका दर्ग्यात जाऊन प्रार्थना करतो, मन्नत मागतो. ती मंजूर होते आणि त्याला मुलगा होतो. अपत्यासाठी तळमळणाऱ्या अकबराला‘मु या बातमीने इतका आनंद होतो की तो बातमी देणाऱ्या दासीला हातातली अंगठी देवून म्हणतो, ‘ही आनंदवार्ता दिल्याबद्दल भविष्यात मी तुझी कोणतीही एक इच्छा पूर्ण करेन’.
पुढे काहीसा मनमौजी आणि खुदपसंद बनलेल्या सालिमचे वर्तन बादशहाला आवडत नाही. त्याला शिस्त लागावी म्हणून अकबर त्याला युद्धावर पाठवतो.
दीर्घ काळानंतर विजयी सलीम एक नामांकित योद्धा बनून राजवाड्यात परततो.


तो योगायोगाने दासीपुत्री असलेल्या अनारकलीच्या प्रेमात पडतो. ही नृत्यांगना त्याच दासीची मुलगी असते जिला राजाने वचन दिलेले असते. राजवाड्यातील दुसरी नर्तकी ‘बहार’ मत्सराने पेटून गुप्त प्रेमकहाणी सर्वदूर करते. मुलाने एका नर्तिकेच्या प्रेमात पडावे हे बादशहाला अजिबात पटत नाही. तो सलीमला समजावण्याचा प्रयत्न करतो पण तो ऐकत नाही. अनारकलीलाही सलीमशी असलेले प्रेम नाकारायला नकार देते. संतापलेला बादशहा शिक्षा म्हणून तिला तुरुंगात टाकतो.
पितापुत्रातील संघर्षातून सलीम स्वत:चे सैन्य उभारून राज्यावर चाल करून येतो. त्यात अनारकची सुटका होते पण सलीम युद्ध हरतो आणि राजद्रोहाचा आरोप लावून त्याला मृत्यूदंड ठोठावला जातो! आपल्याच मुलाला ठार करण्याची इच्छा नसल्यामुळे बादशाहा मृत्युदंडाच्यावेळी एक विचित्र अट टाकतो की अनारकलीने जर सलीमची शिक्षा स्वत:वर घेतली तर तो सलीमला जीवदान देईल.


प्रेमात बुडालेली बिचारी अनारकली त्यालाही तयार होते. ‘मरण्यापूर्वी तुझी शेवटची इच्छा काय आहे?’ असे बादशाहने विचारल्यावर ती म्हणते, ‘फक्त एक दिवस मला सलीमची पत्नी बनून जगण्याची संधी द्या.’ यावर तिने सलीमला गुलाबपुष्पातून गुंगीचे अत्तर सुंघायला लावून बेशुद्ध करायचे ठरते. त्यानंतर मुलीला भिंतीत चिणले जाण्याच्या भयंकर कल्पनेने व्याकुळ झालेली दासी बादशहाला त्याच्या वचनाची आठवण देते आणि मुलीला जीवदान देण्याची मागणी करते. अनिच्छेनेच मागणी मान्य करताना अकबर म्हणतो, ‘जिवंत सोडल्यावर तू गुप्तपणे मुलीसह राज्याबाहेर जाशील आणि कधीही परत येणार नाहीस,’ ती ते मान्य करते.


सिनेमासाठी शकील बदायुनी या महान गीतकाराने १२ गाणी लिहिली. नौशादजींनी शकील साहेबांबरोबर दिवसरात्र काम केले आणि अजरामर हिंदी गाण्यात त्यांचा समावेश झाला. नौशादसाहेबांनी सर्व गाण्यांसाठी भारतीय अभिजात रागदारीचा आश्रय घेतला. लतादीदीच्या आवाजातले पिलू रागातले ‘मोहे पनघटपे नंदलाल छेड गयो रे’ असो की दुर्गा रागातले ‘प्यार किया तो डरना क्या?’ हिंदी समजणारा कुणीही श्रोता ते विसरू शकत नाही. नौशादजींनी दरबारी कानडावर बेतलेले ‘मुहब्बतकी झुठी कहानीपे रोये’ असो किंवा खुद्द बडे गुलाम अली खां यांनी गायलेले ‘शुभ दिन आयो राजदुलारा’ आणि सोहनी रागातले, ‘प्रेमजोगन बनके’ तर सांगीतिक मेजवानीच!


शकीलजींनी कहरच केला होता, प्रेम करणाऱ्या पिढ्यानपिढ्यांसाठी जणू स्वतंत्र राष्ट्रगीतच लिहून ठेवले! ‘जिंदाबाद, जिंदाबाद, ए मुहब्बत जिंदाबाद.’ नौशादसाहेबांनी या सिनेमात भारतीय संगीताचा जो गोडवा, विविधता आणि वैभव समोर आणले त्यासाठी त्यांना भारतरत्नही देणे योग्य ठरले असते!


तुरुंगात साखळदंडात बांधलेली अनारकली जेव्हा अगतिकपणे देवाची प्रार्थना करते तेव्हा तिच्यासाठी शकीलसाहेबांचे, नौशादजींनी केदार रागात बेतलेले, ‘बेकसपे करम किजीये, सरकारे मदिना’ एक भक्तिगीतच बनले होते. नौशादजी आणि शकीलसाहेबांच्या गाण्यात काय नव्हते? या सांगीतिक मेजवानीत भक्तिगीत, प्रेमगीत, क्रांतीगीत, शोकगीत, कव्वाली... असे सर्व सर्व मेजावर सजवून ठेवले होते. लतादीदी आणि शमशादबेगमच्या आवाजातली ‘तेरी महफिलमे किस्मत आजमाकर हम भी देखेंगे’ ही कव्वालीतली जुगलबंदी आणि ‘ये दिलकी लगी कम क्या होगी?’ सारख्या कव्वाल्यांनी वर्षानुवर्षे साहित्य आणि संगीताच्या रसिकांना कल्पांताचा आनंद दिला.


सिनेमाने १२ फिल्मफेयर नामांकने आणि ५ पुरस्कार पटकावले. तो जेव्हा मुंबईतल्या ‘मराठा मंदिर’ला लागला त्यादिवशी सुमारे १ लाखांचा समुदाय तिकीट घ्यायला जमला. गर्दी इतकी की बंदोबस्तासाठी पोलीस बोलवावे लागले आणि ३ दिवस बुकिंग बंद ठेवावे लागले! त्यानंतर तो रोज हौउसफुल्ल होत ३ वर्षे चालला!


सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या सिनेमात त्याने ‘मदर इंडिया’ (१९५७)लाही मागे टाकले होते. नंतर १५ वर्षांनी आलेला फक्त ‘शोले’च त्याचे रेकॉर्ड मोडू शकला! चार लेखकांनी लिहिलेले संवाद अतिशय हृदयस्पर्शी होते. ‘जेव्हा अकबर शेवटची धमकी देऊन अनारकलीला एका रात्रीसाठी राणीचा मुकुट घालतो तेव्हा ती काय म्हणेल?’ या दिग्दर्शक
के. असिफसाहेबांच्या प्रश्नावर वजाहत मिर्झा म्हणाले, ‘शहेनशाहकी इन बेहिसाब बक्शिशोके बदलेमें कनीज़, जलालउद्दीन मोहम्मद अकबरको अपना खून माफ करती है।’ अंगावर शहारे आणणारा हा संवाद ऐकल्यावर के. असिफसाहेबांनी संवादलेखक मिर्जासाहेबांना कडकडून मिठीच मारली! असे ते मनस्वी कलाकार!


शेवटच्या रात्रीचे अगतिक अनारकलीच्या तोंडी दिलेले गाणेही हलवून टाकणारे होते. स्वत:च प्रियकराला बेशुद्ध करून गुमान त्याला कायमचे सोडून, मृत्यूला कवटाळण्यासाठी नियतीला सामोरे जायचे! पण मनस्वी प्रेमिक असतात ते अशाच जगावेगळ्या निवडी करतात ना! त्या मनाची घालमेल करणाऱ्या क्षणी ती स्वत:लाच सांगते, ‘पाहा, सकाळच्या पडद्याआडून मृत्यू हाक मारतो आहे, काही क्षणातच माझ्या श्वासांचे संगीत थांबणार आहे.’


‘वो आई सुबहके परदेसे मौतकी आवाज़,
किसीने तोड़ दिया जैसे ज़िन्दगीका साज़.’
तशाही अवस्थेत ती विचार करते तो आपल्या प्रियकराचाच. ती म्हणते, ‘जिवलगा, आता तुझे रक्षण देवच करो, मी तुमच्या जगातूनच चालले. तडफडणाऱ्या हृदयाचा शेवटचा निरोप स्वीकार.’
‘ख़ुदा निगेहबान हो तुम्हारा,
धड़कते दिलका पयाम ले लो.
तुम्हारी दुनियासे जा रहें हैं,
उठो, हमारा सलाम ले लो.’
प्रिया, क्षणभर ऊठ, अंत जवळ आलाय, शेवटचे आलिंगन देऊन मला निरोप दे. हे शेवटचे क्षण आहेत, माझ्या काही चुका झाल्या असतील तर आज मोठ्या मनाने माफ करून टाक. जगातून जाणाऱ्याचे मन मोडू नकोस, थोडा प्रेमानेच निरोप दे.
‘है वक़्त-ए-रुख़्सत, गले लगा लो,
ख़ताएं भी आज बख्श डालो.
बिछड़नेवाले का दिल न तोड़ो,
ज़रा मोहब्बतसे काम ले लो.’
तुम्हारी दुनियासे जा रहें हैं,
उठो, हमारा सलाम ले लो.’
एक विनंती करते रे - उद्या माझ्या प्रेतयात्रेत खांदा द्यायला येऊ नकोस. मला आपले प्रेम अजिबात बदनाम होऊ द्यायचे नाही. मी हे जग सोडून जातेय, आता देवच तुझा सांभाळ करो. डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूतच मला तुझा निरोप घेऊ दे.
‘उठे जनाज़ा जो कल हमारा,
क़सम है तुमको, न देना काँधा.
न हो मोहब्बत हमारी रुसवा,
ये आँसुओंका पयाम ले लो.
ख़ुदा निगेहबान हो तुम्हारा...’
‘अनारकली’ काय, ‘मुगले आझम’ काय या कलाकृती चित्रपटसृष्टीतल्या महान कलाकारांची भव्य स्मारके आहेत. अनेकदा वाटते यांच्या मजारजवळ जाऊन म्हणावे, ‘शकीलसाहेब, नौशादसाहेब, उठो, हमारा सलाम ले लो.’

Comments
Add Comment

माधवी कुंटे आणि स्नेहलताबाई

नक्षत्रांचे देणे - डॉ. विजया वाड विश्वकोशाची अध्यक्ष झाले तेव्हा काहींनी मजवर टीका केली. पण माधवी कुंटे, स्नेहलता

दृष्टिकोन

- जीवनगंध; पूनम राणे ई... आई... ज्यूस प्यायचा आहे मला. घे ना गं, आई... “हो, हो, राजा, घेऊया आपण ज्यूस...” “अगं सपना... किती

हरिपूजा

- महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे भगवान श्री विष्णू हे जगाचे पालन कर्ताच नव्हे, तर निर्माताही आहेत. सर्व

दहावीच्या सुट्टीत काय करायचं ?

- आनंदी पालकत्व; डाॅ. स्वाती गानू दहावीची परीक्षा झाली आहे. आता फुलटाइम मस्ती, मोबाईल, मित्र आणि झोप हा तुमचा प्लॅन

न जाणो, कोणता श्वास अखेरचा ठरेल! : नूतन

स्मृती पटल : अनिल तोरणे कर्करोगासारख्या असाध्य आजाराचं नाव ऐकून रुग्ण तर हतबल होतोच शिवाय त्याच्या

भाषेत विज्ञानभाषा सजवताना...

व्याख्याने, चर्चासत्रे, वार्षिक संमेलन, परिसंवाद, वैज्ञानिक गप्पा, मुलाखती अशा अंगाने सुरू झालेल्या मराठी