- युद्ध नको, बुद्ध हवा; ठाण्यात आठव्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला समतेचा संदेश
ठाणे : बौद्ध धम्म हा केवळ धर्म नसून एक व्यापक सामाजिक विचारसरणी आणि परिवर्तनाची चळवळ आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले. सम्राट अशोक जयंतीनिमित्त आयोजित आठव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेत ते बोलत होते.
बुद्धरत्न सागर वेलफेअर फाउंडेशनतर्फे (Buddharatna Sagar Welfare Foundation) गडकरी रंगायतन येथे हा भव्य कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात “नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय” या मंत्रोच्चारांनी झाली. गौतम बुद्ध (Gautama Buddha) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून शिंदे यांनी उपस्थित भिक्खू संघ, विद्वान आणि धम्मप्रेमींचे स्वागत केले.
धम्म परिषद ही सामाजिक परिवर्तनाची महत्त्वाची पायरी असल्याचे सांगत त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. या वेळी शिंदे यांना ‘बौद्ध रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. “अशा सन्मानांमुळे जबाबदारी वाढते आणि समाजासाठी अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते,” असे त्यांनी नमूद केले.
📍 #ठाणे | सम्राट अशोक जयंतीचे औचित्य साधून आज आठव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन ठाणे शहरातील गडकरी रंगायतन येथे करण्यात आले होते. बुद्धरत्न सागर वेलफेअर फाउंडेशन आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित राहून माझे मनोगत सादर केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला “नमो बुद्धाय, नमो… pic.twitter.com/YhxRZN01i8
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 5, 2026
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या धम्मदीक्षेमुळे लाखो लोकांना समानता आणि स्वाभिमानाचा मार्ग मिळाला, असेही त्यांनी स्पष्ट केले. “बुद्ध पेरला की बाबासाहेब उगवतात,” असे म्हणत त्यांनी गौतम बुद्धांच्या विचारांचा समाजावर झालेला प्रभाव अधोरेखित केला.
जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शांततेचा संदेश देताना “जगाला युद्ध नको, बुद्ध हवा,” असे सांगितले. “द्वेषाने द्वेष संपत नाही, प्रेमानेच तो संपतो,” हा बुद्धांचा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
भाषणाचा समारोप करताना त्यांनी, “न तलवार की धार से, न गोलियों की बौछार से… दुनिया बदलेगी तो सिर्फ बुद्ध के विचार से,” या ओळींमधून शांततेचा आणि मानवतेचा संदेश दिला.






