जीवनगंध - पूनम राणे
सकाळची ६.३०ची वेळ होती. नीटसे उजाडलेले नव्हते. सूर्य उगवण्याच्या तयारीत होता. झाडावरील फुले सूर्यप्रकाशाची वाट पाहत होती. प्राजक्त मात्र केव्हाच उमलला होता. त्याचा सुगंध सगळीकडे पसरला होता.
रस्त्यावर तुरळक वाहने दिसत होती. पहिल्या पाळीला काहीजण निघाले होते. प्रत्येक जण घाईघाईने गाडी पकडण्याच्या गडबडीत होता.हवेत गारवा पसरलेला होता. सगळीकडे शांतता होती. मात्र काही ठिकाणी रिक्षा, बस, टेम्पोच्या हॉर्नचा आवाज येत होता. नेहमीच्याच ठिकाणी प्रत्येक जण आपल्या खाण्याचे स्टॉल लावत होते.
कोंबड्या भरून एक टेम्पो रस्त्यावरून जात होता. पांढऱ्याशुभ्र कापसासारखी पिसे आणि डोक्यावरील लालसर तुरा लक्ष वेधून घेत होता. जणू त्यांनी चोचीला लिपस्टिक लावल्यासारखी वाटत होती. टेम्पोतील कोंबडा-कोंबडी अत्यंत आनंदात होत्या. त्यांचे एकमेकांशी हितगुज चालले होते. गप्पागोष्टी करत रस्त्यावरील गाड्या पाहत ते मजेत चालले होते. एवढ्यात सिग्नल लागला. टेम्पो थांबला. सिग्नलजवळ एक कोंबड्यांचे दुकान होते. तोपर्यंत सकाळचे ७.३० वाजले होते. सगळीकडे उजाडलेले होते. टेम्पोमधील कोंबड्यांचे लक्ष सिग्नलजवळ असलेल्या कोंबड्यांच्या दुकानाजवळ गेले. टेम्पोमधील कोंबड्या दुकानातील बंदिस्त कोंबड्यांना हिणवू लागल्या. “हिप... हिप... हुर्रे...” करून मोठ्या आनंदाने आम्ही सहलीला जात आहोत आणि तुम्ही मात्र कोंडून राहिले आहात. आमचा मालक किती चांगला आहे. आमची किती काळजी घेतो. आम्हाला सहलीला घेऊन जातो. असे म्हणून दुकानातील बंदिस्त कोंबड्यांना हिणवू लागल्या.
दुकानातल्या कोंबड्या म्हणाल्या, “मित्र-मैत्रिणींनो, आम्हालाही एक दिवस असेच वाटले होते की, आमचा मालक आम्हाला सहलीला घेऊन चालला आहे; परंतु ती समज पूर्णतः चुकीची ठरली. इथे कोंडून आम्हाला पंधरा दिवस झालेत. रोज-रोज आमच्या कित्येक मित्र-मैत्रिणींचा बळी दिला जातोय. तेव्हा जीव पिळवटून निघतो. लक्षात ठेवा ही सहल नाही. ही आपल्या मोक्षधामाची आणि शेवटच्या क्षणाची यात्रा आहे.”
दुकानातल्या कोंबड्यांच्या बोलण्याकडे टेम्पोमधील कोंबड्यांनी दुर्लक्ष केले. “आम्ही मजा करण्यासाठी चाललो आहोत हे तुम्हाला सहन होत नाही.” असे म्हणत असतानाच सिग्नल सुरू झाला आणि टेम्पो भरधाव निघाला. ठरलेल्या ठिकाणी टेम्पो थांबला. एकएकीचे पाय पकडून त्याला दोऱ्या बांधण्यात आल्या. खाली डोके वर पाय करून त्यांना लोंबकळत ठेवण्यात आले आणि एका खुराड्यात कोंबण्यात आले. आता साऱ्यांचे चेहरे पडले होते. दुकानातील बंदिस्त कोंबड्यांनी सांगितली ती गोष्ट खरीच होती. हे त्यांच्या लक्षात आले आणि ही आपली यात्रा मोक्षधामाची आहे. हेही लवकरच समजले. आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मानव पशूंचा बळी देतोय हेही त्यांच्या लक्षात आले; परंarticle on तु यावर काही उपाय नव्हता.
तात्पर्य : अनुभव हा फार मोठा गुरू आहे.