मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी ऐश्वर्या राय (Aishwarya Rai ) आणि अभिषेक बच्चन (Abhishek bachchan ) अनेक कारणांमुळे सतत चर्चेत असतात. अलीकडेच त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चाही जोरदार रंगल्या होत्या. त्यावेळी अभिषेकने या केवळ अफवा असल्याचं म्हटलं होतं. नुकताच अभिषेकनं एका मुलाखतीत ऐश्वर्या आणि त्याच्या नात्याबाबत आणि दोघेही आपली मुलगी आराध्याचा सांभाळ कसे करतात याबद्दलची माहिती दिली असून यावेळी अभिषेक ऐश्वर्याच्या स्टारडमवरही प्रतिक्रिया दिली.
ज्यावेळी ऐश्वर्या आणि अभिषेकचं लग्न झालं होतं, त्यावेळी ऐश्वर्या राय खूप मोठी स्टार होती. या मुलाखतीत, जेव्हा अभिषेकला विचारण्यात आलं की, त्याला पत्नीच्या स्टारडममुळे आधी असुरक्षित वाटलं का? यावर त्यानं उत्तर दिलं असून या मुलाखतीत पत्नी ऐश्वर्या रायच्या स्टारडमबद्दल वाटणाऱ्या इनसिक्योरिटीबाबत खुलासा केला असून यावेळी मुलाखतीत त्यानं आपल्या आई - वडिलांचं उदाहरण दिलं आहे.
या मुलाखतीत बोलताना अभिषेक म्हणाला 'जेव्हा माझ्या आई वडिलांचं लग्न झालं. तेव्हा माझी आई माझ्या वडिलांपेक्षा मोठी स्टार होती. त्यामुळे यामध्ये काही विचित्र वाटण्यासारखं नाही. वर्चस्व गाजवलं पाहिजे, अशा मानसिकतेनं माझं संगोपन झालेलं नाही. ही एक पार्टनरशिप आहे. मी ऐश्वर्याला करिअरच्या सुरुवातीपासून ओळखत असून माझी दुसरी फिल्म मी ऐश्वर्यासोबत केली होती. त्यावेळी आम्ही रिलेशनशिपमध्ये नव्हतो. आम्ही फक्त चांगले मित्र होतो', असं अभिषेकनं म्हटलं आहे.
ऐश्वर्यासोबतच्या नात्याबद्दल बोलताना अभिषेक पुढे म्हणाला, 'जेव्हा आम्ही प्रेमसंबंध, एंगेजमेंट आणि नंतर लग्नाच्या माध्यमातून एकत्र आलो, तेव्हा आमच्यात एक पार्टनरशिप तयार झालं. आमच्यात असं कधी बोलणं नाही झालं की, मी कमवेन आणि तू घराची काळजी घेशील. अशी चर्चा आमच्यात कधीच झालेली नाही. हे खूप नैसर्गिकरित्या घडतं. पण माझ्यासाठी हे खूप अहंकारातून येतं', असं अभिषेक यावेळी म्हणाला आहे. तसेच, यावेळी अभिषेक म्हणाला, 'मी इगोबाबत उल्लेख केला कारण, शर्यत जिंकण्यासाठी समोरच्या व्यक्तीनं पराभव पत्कारावा किंवा धावणं थांबवावं, अशी माझी मानसिकता नाही', असं अभिषेकनं स्पष्ट केलं असून 'मला अशा नात्यात राहायचं नाही, जिथे मला पुरुषी वाटावं म्हणून माझ्या पत्नीला एखादी गोष्ट करणं सोडावं लागेल. सुदैवानं माझ्या पत्नीलाही तसं वाटत नाही', असं यावेळी या मुलाखतीत अभिषेकनं त्यांच्या नात्याबद्दल बोलताना स्पष्ट केलं आहे.






