पुणे : राजगड तालुक्यातील विहीर गावात अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित पालखी सोहळ्यावर मधमाश्यांनी हल्ला केला. मधमाश्यांनी डंख मारल्यामुळे पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्यांपैकी ६५ जण जखमी झाले. जखमींवर उपचार सुरू आहेत.
सर्व जखमींवर राजगडमधील वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालखी सोहळ्यादरम्यान काही जणांनी फटाके वाजवले. या फटाक्यांमुळे परिसरात असलेल्या मधमाश्या अस्वस्थ झाल्या आणि त्यांनी डंख मारल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार २३ महिला, ३० पुरुष आणि १२ लहान मुलांसह एकूण ६५ पेक्षा जास्त नागरिकांना मधमाश्यांनी डंख मारला.