वॉशिंग्टन : अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प २ एप्रिलला सकाळी ६.३० वाजता ते देशाला संबोधित करणार आहेत. इराणसोबत सुरू असलेले युद्ध पाचव्या आठवड्यातही सुरू आहे. हे युद्ध कधी आणि कसे संपेल हा प्रश्न आहे. या युद्धात प्रत्येक दिवशी संघर्ष आणखी चिघळत आहे. या युद्धामुळे आखाती देशांवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प नेमके काय बोलतात याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.
चीन आणि पाकिस्तानने ५ कलमी शांतता प्रस्ताव सादर केला आहे. बीजिंगमध्ये झालेल्या उच्चस्तरीय चर्चेनंतर समोर आलेला हा प्लॅन प्रथमदर्शनी थेट आणि संतुलित वाटतो. परिस्थिती आणखी बिघडू नये म्हणून कुठल्याही अटींशिवाय युद्धविरामाची शक्यता आहे. त्याशिवाय सर्व संबंधित देश पुन्हा एकत्रित टेबलावर बसतील आणि विना सैन्य दबावातून समस्येवर मार्ग शोधतील, असे सांगण्यात आले आहे.
हा प्रस्ताव केवळ युद्ध टाळण्याचाच नव्हे तर त्याचे परिणाम कमी करण्याचाही प्रयत्न करतो हे या प्रस्तावाचे वैशिष्ट्य आहे. त्यात नागरिकांचे आणि वीज प्रकल्प, जलप्रकल्प व अणुऊर्जा प्रकल्प यांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे हल्ल्यांपासून संरक्षण करण्यावर भर देतो तसेच जागतिक ऊर्जा पुरवठ्याचा कणा असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांच्या सुरक्षित प्रवासाची खात्री करण्याबाबतही प्रस्तावात उल्लेख आहे. एक स्थायी शांतता आराखडा तयार करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांची भूमिका अधिक मजबूत करण्याचे आवाहनही या प्रस्तावात करण्यात आले आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण या सर्वांच्या स्वतःच्या अटी आणि प्राधान्यक्रम आहेत, जे एकमेकांपेक्षा वेगळे आहेत.
युद्ध संपण्यासाठी इराणची अट काय? : कुठल्याही चर्चेच्या आधी हल्ले आणि टार्गेट किलिंग पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे. भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती बनू नये यासाठी जागतिक पातळीवर हमी हवी. युद्धात झालेली नुकसान भरपाई आणि संपूर्ण प्रदेशात संघर्ष संपवण्यासाठी मागणी इराणने ठेवली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्ट्रेट होर्मुझ यावरील नियंत्रणासाठी इराणला जागतिक मान्यता हवी.
युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेचा कठोर प्रस्ताव : युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेने अधिक कठोर भूमिका घेतली आहे. त्यांच्या १५-कलमी प्रस्तावानुसार इराणचा अणुकार्यक्रम पूर्णपणे बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये प्रमुख अणु ठिकाणे बंद करणे, युरेनियम संवर्धन थांबवणे आणि सध्याचा साठा आंतरराष्ट्रीय संस्थांकडे सुपूर्द करणे यांचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर क्षेपणास्त्र कार्यक्रम थांबवण्याची आणि प्रादेशिक गटांना दिला जाणारा पाठिंबा बंद करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या बदल्यात अमेरिकेने निर्बंधांमध्ये सूट देण्याचे आणि शांततापूर्ण अणुऊर्जेमध्ये सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे, परंतु इराणने या अटी एकतर्फी असल्याचे सांगत त्या फेटाळून लावल्या आहेत.
ट्रम्प यांची ‘नाटो’वर पुन्हा आगपाखड : इराणसोबत सुरू असलेल्या युद्धात नाटो देशांनी एकट पाडल्यानं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संतापले आहेत. विशेष म्हणजे सर्वात मोठी सुरक्षा संघटना असलेल्या नाटो देशाचे नेतृत्व अमेरिकाच करते. ट्रम्प यांनी आता नाटोमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. याआधीही ट्रम्प यांनी नाटो देशांच्या भूमिकेवरून त्यांना कागदी वाघ म्हटले होते. आता ट्रम्प म्हणाले की, नाटो कागदी वाघ असून त्यांची ताकद किती तकलादू आहे, हे व्लादीमीर पुतीन यांनाही माहिती आहे. नाटोमधून बाहेर पडण्याचे संकेत देताना म्हणाले की, नाटोतून बाहेर पडण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे. आता नाटोतून अमेरिकेला बाहेर पडलंच पाहिजे. कारण नाटोतील सदस्य देशांनी इराणविरोधात युद्धामध्ये आम्हाला साथ दिली नाही. इराणसोबतच्या युद्धात नाटो देशांतील स्पेन, ब्रिटन, तुर्की, हंगेरी या देशांनी ट्रम्प यांच्या विरोधात भूमिका घेतलीय. अमेरिकेकडून त्यांच्या युरोपीय सहकाऱ्यांबाबत इतक्या कठोरपणे विधानं करण्याची ही पहिलीच वेळ आहे. जर अमेरिका नाटोतून बाहेर पडली तर या निर्णयावर पुनिर्विचार होणार नाही. मी कधीच नाटोवर जास्त विश्वास ठेवलेला नाही. पुतीन यांनाही नाटोची लायकी समजली आहे असेही ट्रम्प म्हणाले.
‘अटी मान्य करा नाहीतर विनाशाला तयार रहा’ : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आतापर्यंतचा सर्वात मोठा इशारा दिला असून, ‘इराणला पुन्हा पाषाण युगात धाडू,’ अशा शब्दांत विनाशाची धमकी दिली आहे. इराणच्या नवीन अध्यक्षांनी केलेली युद्धविरामाची विनंती ट्रम्प यांनी धुडकावून लावत, कडक अटी समोर ठेवल्या आहेत. याबाबत ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी इराणचे नवीन अध्यक्ष जे त्यांच्या पूर्वजांपेक्षा कमी कट्टर आणि अधिक बुद्धिमान आहेत त्यांनी अमेरिकेकडे युद्ध थांबवण्याची विनंती केली आहे, असे लिहिले आहे. ‘जोपर्यंत हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली, मुक्त आणि सुरक्षित होत नाही, तोपर्यंत आम्ही कोणत्याही युद्धविरामाचा विचार करणार नाही. जोपर्यंत अटी पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत इराणवर हल्ले सुरूच राहतील. आम्ही इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त करू किंवा त्यांना पुन्हा पाषाण युगात पाठवू," असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
युद्धात सामील होणार होण्यास ब्रिटनचा नकार : इराण आणि अमेरिका, इस्त्रायलमध्ये मागील ३३ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. अमेरिका आपल्या अटींवर करार करण्याबाबत बोलत आहे, तर इराण नकार देत आहे. दरम्यान, ब्रिटनने इराण युद्धात सामील होणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे. ब्रिटन इराण युद्धात सामील होणार नाही, असे ब्रिटनचे पंतप्रधान किएर स्टार्मर यांनी स्पष्ट केले. अमेरिका होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यासाठी जागतिक होर्मुझ शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे. या आठवड्यात ब्रिटनच्या यजमानपदाखाली सुमारे ३५ देशांसोबत एक बैठक आयोजित केली जाईल. या बैठकीत होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यावर चर्चा होईल, असे स्टार्मर म्हणाले. इराणसोबतच्या युद्धाचा ब्रिटनच्या भविष्यावर मोठा परिणाम होईल, असा इशारा स्टार्मर यांनी दिला, पण त्याचबरोबर आपला देश या संकटाचा सामना करण्यास पूर्णपणे तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘माझ्यावर आणि इतरांवर कितीही दबाव असला, कितीही गदारोळ झाला तरी, माझे सर्व निर्णय ब्रिटिश नागरिकांच्या सर्वोत्तम हिताचेच असतील. हे आमचे युद्ध नाही, आम्हाला त्यात ओढले जाण्याची इच्छा नाही,’ असेही ते म्हणाले.