मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच, बुधवारी रात्री राजधानी दिल्लीत त्या दिशेने घडामोडी घडताना दिसल्या. 'उबाठा' गटाचे दोन खासदार चक्क शिवसेनेच्या मेजवानीत सहभागी झाले. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या या स्नेहभोजनाला खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि संजय देशमुख यांनी लावलेल्या हजेरीमुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
उबाठाच्या खासदारांना गळाला लावण्यासाठी शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर सुरू असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर या दोन खासदारांनी पक्षीय सीमा ओलांडून शिवसेनेच्या मंत्र्यांच्या पाहुणचाराचा आस्वाद घेतल्याने मातोश्रीची धाकधूक वाढली आहे. कौटुंबिक स्नेहभोजनासाठी ही भेट असल्याचे दावे केले जात असले तरी, राजकारणात अशा भेटींचे टायमिंग अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी हे स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. या मेजवानीला महायुतीचे खासदार उपस्थित होतेच. मात्र, उबाठा गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.
सुप्त अस्वस्थता
विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालानंतर उबाठा गटातील काही लोकप्रतिनिधींमध्ये सुप्त अस्वस्थता असल्याची चर्चा आहेत. त्या पार्श्वभूमीवर आष्टीकर आणि देशमुख यांनी थेट शिवसेनेच्या मेजवानीला हजेरी लावल्याने त्याचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. दिल्लीतील या ‘डीनर डिप्लोमसी’चे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.