मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आपल्या घशाच्या आजाराबाबत केलेल्या एका विधानामुळे सध्या राजकीय वर्तुळात वादाचे वादळ निर्माण झाले आहे. "गुरुदेवजींच्या आशीर्वादाने माझ्या घशाची जुनी समस्या दूर झाली, हा माझ्यासाठी एक चमत्कारच आहे," असे विधान तावडे यांनी एका कार्यक्रमात केले होते. मात्र, राज्यात सध्या अशोक खरात यांचे भोंदूगिरीचे प्रकरण गाजत असताना, एका जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने 'चमत्कार' शब्द वापरल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
पत्रकार परिषदेत व्यक्त केला संताप
सतत होणारी टीका आणि समाजमाध्यमांवरील चर्चेनंतर महापौर रितू तावडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली. यावेळी त्या अत्यंत आक्रमक पावित्र्यात दिसल्या. "माझ्या विधानाचा विपर्यास केला जात आहे. हा विषय अंधश्रद्धेचा नसून पूर्णपणे माझ्या वैयक्तिक श्रद्धेचा आहे. कोणाच्या आशीर्वादाने जर मला बरे वाटत असेल, तर त्यात कोणाला पोटदुखी होण्याचे कारण काय?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या वादात उडी घेणाऱ्या संजय राऊत यांच्यावरही महापौरांनी कडक शब्दांत टीका केली. "संजय राऊत यांच्या जिभेला हाड नाही, ते कोणत्याही विषयावर तथ्यहीन बोलत असतात," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. राजकीय हेतूने प्रेरित होऊन माझ्या श्रद्धेची टिंगल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. आपल्या भूमिकेचे समर्थन करताना रितू तावडे यांनी एका महत्त्वाच्या घटनेचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, "ज्या जैन मुनींच्या कार्यक्रमात मी हे विधान केले, त्या कार्यक्रमाला स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते.
नेमका काय घडलं ?
"बातमी लावण्याची ही कोणती पद्धत?"
"मी कार्यक्रमावरून अजून नीट घरीही पोहोचले नव्हते, त्यापूर्वीच माझ्या विधानावरून चुकीच्या पद्धतीने बातम्या लावल्या गेल्या. कोणाबरोबर कोणाची तुलना केली जात आहे? अशा प्रकारच्या बातम्या पाहून मला खरोखर किळस वाटते," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. कालच्या कार्यक्रमात काय सकारात्मक घडले, यावर चर्चा करण्याऐवजी केवळ वादाला खतपाणी घातले गेले, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. सोशल मीडियावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या ट्रोलर्सवर महापौरांनी कठोर भाषेत प्रहार केला. "जे लोक ट्रोल करत आहेत, त्यांच्या घरी आया-बहिणी आहेत की नाही? कोणत्याही गोष्टीचा विचार न करता कशा पद्धतीने ट्रोल केले जाते? अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका करणे हे अतिशय निंदनीय आहे," असे तावडे म्हणाल्या. अशोक खरात यांच्या प्रकरणाशी स्वतःच्या श्रद्धेचा संबंध जोडला गेल्याने महापौरांनी दुःख व्यक्त केले. "मी माझी वैयक्तिक श्रद्धा आणि अनुभव व्यक्त केला होता, पण त्याला चुकीच्या पद्धतीने प्रसिद्धी देऊन माझ्या प्रतिमेला धक्का लावण्याचा प्रयत्न केला जात आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले. एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना अशा प्रकारच्या वागणुकीमुळे मनाला वेदना होत असल्याचे त्यांनी नमूद केले.