व्हॅलेरो एनर्जीद्वारे चालवली जाणारी टेक्सासमधील पोर्ट आर्थर येथील रिफायनरीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या स्फोटानंतर परिसरात मोठी आग लागली असून आकाशात काळ्या धुराचे प्रचंड लोट उठताना दिसले. प्रशासनाने खबरदारी म्हणून नागरिकांना ‘शेल्टर-इन-प्लेस’ म्हणजेच घरातच राहण्याचे आदेश दिले आहेत.
ही घटना सोमवार,२३ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ७:२२ वाजता घडली. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की आसपासच्या घरांनाही धक्का बसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. स्फोटानंतर रिफायनरी परिसरात मोठ्या ज्वाळा आणि दाट धूर पसरलेला दिसला.
स्थानिक अग्निशमन विभागाचे अधिकारी अँटोनियो मिशेल यांनी सांगितले की, “घटनास्थळी पथके रवाना झाली असून नेमका प्रकार काय आहे, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.”
घटनेनंतर तातडीने अग्निशमन दल, हॅझमॅट (धोकादायक रसायन) पथके घटनास्थळी दाखल झाली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही, तसेच सध्या स्थलांतराची गरज नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, परिसरातील हवेची गुणवत्ता तपासली जात असून कोणतेही विषारी घटक वातावरणात पसरले आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. सुरक्षिततेची खात्री होईपर्यंत ‘शेल्टर-इन-प्लेस’ आदेश कायम राहणार आहे.
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी टेक्सास परिवहन विभाग यांनी नागरिकांना रिफायनरी परिसरातील SH 87 आणि SH 82 मार्ग टाळण्याचे आवाहन केले आहे.
ही रिफायनरी अमेरिकेतील सर्वात मोठ्या रिफायनरींपैकी एक असून दररोज सुमारे ४:३५ लाख बॅरल पेट्रोल, डिझेल आणि जेट इंधन निर्मितीची क्षमता आहे. येथे सुमारे ७७० कर्मचारी कार्यरत आहेत. या प्रकल्पाचे कामकाज दीर्घकाळ ठप्प राहिल्यास इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, झेना स्टीफन्स यांनी प्राथमिक अंदाज व्यक्त करताना सांगितले की, ही घटना एखाद्या हीटिंग युनिटमुळे घडली असावी; मात्र अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
प्रशासनाने नागरिकांना अफवा पसरवू नयेत आणि केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले आहे.