मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या वतीने छोट्या आणि मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटदारांची अडवणू ठेवलेली उर्वरित रक्कम देण्यास महापालिका प्रशासन तयार झाले आहे. मागील पावसाळ्यात कंत्राटदारांनी केलेल्या कामाच्या तुलनेत ५० टक्के रक्कम अदा करण्यात आली होती, तर उर्वरित ५० टक्के रक्कम राखीव ठेवण्यात आली होती. ही उर्वरित रक्कम देण्यास महापालिका प्रशासनाने तयारी दर्शवली असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईतील छोट्या आणि मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी महापालिकेच्या वतीने २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी कंत्राटदार नियुक्त असल्याने १ मार्चपासून नालेसफाईच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणे अपेक्षित असतानाही, मागील वर्षाच्या थकबाकी रक्कम न मिळाल्याने कंत्राटदारांनी काम सुरू केले नव्हते.
या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागांचे उपायुक्त आणि प्रमुख अभियंते यांची बैठक पार पडली. या बैठकीत मागील नालेसफाई कामांची सर्व थकबाकी तातडीने अदा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ही रक्कम मिळाल्यास नालेसफाईची कामे त्वरीत सुरू केली जातील असे आश्वासन कंत्राटदारांच्या वतीने देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, मिठी नदी तसेच नव्याने निविदा मागवलेल्या मोठ्या नद्यांच्या कंत्राटांबाबत अद्यापही अंतिम निर्णय झालेला नसून या प्रक्रियेला विलंब होत आहे. परिणामी, संबंधित कामांवर अनिश्चिततेचे सावट कायम आहे. महापालिकेच्यावतीने या प्रक्रियेला गती देऊन ही कामे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे सांगितले जात आहे.






