मुंबई : आयपीएल २०२६ सुरू होण्यास केवळ एक आठवडा शिल्लक असतानाच महेंद्र सिंह धोनीने आपल्या निवृत्तीबद्दल एक मोठं विधान केलं आहे. त्याने त्याच्या निवृत्तीच्या चर्चांवर मिश्कीलपणे उत्तर दिलं आहे. त्याच्या या उत्तराचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
रविवारी (२२ मार्च) चेन्नईतील चेपॉक मैदानावर झालेल्या एका खास कार्यक्रमात दाक्षिणात्य अभिनेता शिवकार्तिकेयन याने धोनीला विनंती केली की, "निवृत्तीची चर्चा सोडून द्या आणि तुम्ही वयाच्या ६० वर्षापर्यंत मैदानात खेळताना आम्हाला पाहायला मिळेल." यावर ४४ वर्षांच्या धोनीने हसत हसत उत्तर दिलं की, "६० वर्षांपर्यंत खेळणं कठीण आहे, पण मी नक्की प्रयत्न करेन!"
धोनीच्या या एका वाक्याने स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. वयाच्या या टप्प्यावर फिटनेस टिकवणं कठीण असल्याचंही धोनीने कबूल केलं. तरी खेळण्याची जिद्द अजूनही कायम असल्याचं त्याने दाखवून दिलं. यावेळी बोलताना आपला फिटनेट हळूहळू वाढत्या वयानुसार कमी होत असल्याचंही त्याने चाहत्यांसमोर कबूल केलं.
धोनी त्याचा १९ वा आयपीएल सीझन खेळण्यासाठी तयार आहे. २०२६ च्या आयपीएलमध्ये पुन्हा एकदा चाहत्यांना धोनीला खेळताना पाहायला मिळेल असं चेन्नई सुपर किंग्जस चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) काशी विश्वनाथन यांनी स्पष्ट केलं. गायकवाडच्या नेतृत्वाखाली धोनी आता प्रामुख्याने 'फिनिशर' म्हणून खेळतोय आणि इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे त्याच्यावरचा कामाचा ताणही कमी झाला आहे.
२०२५ चं आयपीएल चेन्नईसाठी अत्यंत खराब ठरलं होतं, पॉईंट टेबलमध्ये टीम टॉप ५ मध्येही तरु शकली नाही.