लंडन : हाँगकाँग ते लंडन असा प्रवास करत असलेल्या ब्रिटिश एअरवेजच्या विमानात सर्व क्रू सदस्यांसह एकूण ३३१ जण प्रवास करत होते. या विमानाने हाँगकाँग येथून उड्डाण केल्यानंतर जेमतेम तासाभरात विमानात बसलेल्या ६० वर्षीय महिला प्रवाशाचा मृत्यू झाला. नंतर क्रू सदस्यांनी मृतदेह कापडाने झाकून प्रवाशांच्या आसन व्यवस्थेत एकदम शेवटी ठेवून दिला. काही काळानंतर विमानात हळू हळू दुर्गंधी पसरू लागली. ही दुर्गंधी सहन करत प्रवाशांनी त्यांचा साडेतेरा तासांचा प्रवास केला आणि लंडनच्या विमानतळावर आले. लंडन येथे येताच पोलीस पथकाने विमानात प्रवेश केला. सुमारे ४५ मिनिटे पोलिसांनी विमानातच तपासाचे आणि चौकशीचे काम केले. नंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. प्रवाशांना विमानातून उतरण्याची परवानगी मिळाली.
हाँगकाँगला का परतले नाही विमान ?
विमानाने हाँगकाँग येथून उड्डाण केल्यानंतर जेमतेम तासाभरात विमानात बसलेल्या ६० वर्षीय महिला प्रवाशाचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती विमानातील सर्व प्रवाशांना तसेच जवळच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली. पण विमानातील मृत्यू ही नियमानुसार मेडिकल इमर्जन्सी नाही. जर प्रवाशाची तब्येत बिघडली आहे असे आढळले असते तरच विमान मेडिकल इमर्जन्सी म्हणून जवळच्या विमानतळावर अथवा परत हाँगकाँगच्या विमानतळावर उतरवता आले असते. याच कारणामुळे महिला प्रवाशाचा मृत्यू झाल्यानंतरही विमानाने प्रवास पुढे सुरू ठेवला.
क्रू सदस्यांनी केली चूक
क्रू सदस्यांनी मृतदेह कापडाने झाकून प्रवाशांच्या आसन व्यवस्थेत एकदम शेवटी ठेवून दिला. पण त्या भागातील काचेच्या बंद खिडक्यांना आतल्या बाजूस असलेले प्लॅस्टिकचा दार लावून घेण्यास क्रू सदस्य विसरले. यामुळे प्रवासादरम्यान मृतदेहावर उन्हाचा कवडसा पडला आणि हळू हळू मृतदेह सडून त्यातून दुर्गंधी येण्यास सुरुवात झाली.
नियम काय सांगतात ?
विमान प्रवासात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास क्रू सदस्यांनी मृतदेह कापडाने झाकून प्रवाशांची कमीत कमी वर्दळ असलेल्या भागात ठेवावा. अथवा बॉडी बॅगमध्ये पॅक करून मृतदेह प्रवाशांची कमीत कमी वर्दळ असलेल्या भागात ठेवावा. विमानातील सर्व आसनांवर प्रवासी असतील तर ज्याचा मृत्यू झाला त्या प्रवाशाला कापडाने झाकून अथवा बॉडी बॅगमध्ये पॅक करून त्याच्याच आसनावर ठेवावे.