विवेक

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ


डेस्टिनेशन वेडिंग’साठी आम्ही जयपूरला गेलो होतो. तिथे एका लग्न समारंभात आम्ही सर्व कॉलेजचे मित्र-मैत्रिणी धमाल करत होतो. आमच्या कॉलेजच्या एका मैत्रिणीच्या मुलीचं लग्न होतं त्यानिमित्ताने आम्ही आमचे कॉलेजजीवन आणि तरुणपण आठवत होतो. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तिथे एक विधी होता. जिथे मुलीला एक लाडू भरवला जात होता. म्हणजे तिने फक्त तो उष्टवायचा आणि मग तो लाडू काही लोक बांधून घरी घेऊन जात होते. मला त्या विधीची थोडी गंमत वाटत होती आणि मग तो विधी संपल्यावर आम्ही झोपाळ्यावर काही फोटो काढू या, म्हणून एकमेकांसोबत पुढे जात असताना आमची एक मैत्रीण थोडी मागे थबकली. माझ्या लक्षात आल्यावर मी तिला विचारले की, का थांबली आहेस? तर ती म्हणाली की मला त्या लाडूचा थोडासा तुकडा हवा आहे. आम्ही कॉलेजचे मित्रमैत्रिणी तसे त्यांच्या नातेवाइकांपेक्षा दूरचेच त्यामुळे त्या नवरी मुलीच्या आजूबाजूला त्यांचे जवळचे नातेवाईक गर्दी करून होते. मी तिला तो लाडू कशाला हवा असे विचारल्यावर ती म्हणाली नवरीने उष्ठावलेला लाडू जर लग्न न होणाऱ्या तरुण मुलीने खाल्ला तर त्या मुलीचे लवकर लग्न होते. माझ्या लक्षात आले की, हिच्या दोन्ही मुलींनी वयाची तिशी ओलांडलेली आहे. अजूनही त्या दोघींची लग्न झालेली नाहीत. त्या दोघींनाही लग्नाची प्रचंड इच्छा आहे. लग्न जुळवण्याचे प्रयत्न चार-पाच वर्षांपासून चालू आहेत पण लग्न जुळतच नाही. मग मीच गर्दीतून वाट काढत गेले आणि त्या थाळीतला लाडूचा तुकडा आणून तिला दिला. तिने मनोभावे तो पेपर टिशूमध्ये गुंडाळून पर्समध्ये ठेवून दिला. या घटनेचा मला विसरही पडला.


साधारण चार महिन्यांनंतरची गोष्ट. मला अचानक फोन आला आणि माझी मैत्रीण मला म्हणाली की, अगं माझ्याकडे गुड न्यूज आहे. मी तिला विचारताच म्हणाली की माझ्या मुलीचे लग्न ठरले आहे. मला खूप आनंद झाला आणि खरंतर त्या क्षणी मला त्या लाडूची आठवण झाली. गंमत म्हणजे साधारण आणखी चार महिन्यांचा काळ गेला आणि दुसऱ्याही मुलीचे लग्न झाले. म्हणजे तिने तो लाडू आपल्या दोन्ही मुलींना खाऊ घातला आणि त्यानंतर आठ महिन्यांत त्यांची लग्न झालीही!


खरंतर या घटनेकडे आपण कसे पाहू शकतो, असा मी विचार केला. आता जर हीच घटना या लेखात लिहून मी माझ्या या लेखाच्या वाचकांपर्यंत पोहोचवत आहे किंवा माझ्या मैत्रिणीने आणखी नातेवाइकांना, मित्र-मैत्रिणींना सांगितली असण्याची ही शक्यता नाकारता येत नाही. ही घटना वास्तवात घडली असल्यामुळे, प्रत्यक्षदर्शी म्हणून जो अनुभवतो तो आणखी लोकांपर्यंत पोहोचवतोच! थोडा बारकाईने विचार केला तर या मुलींच्या चोवीस-पंचवीसाव्या वयापासून जी आई, मुलींच्या लग्नासाठी प्रयत्न करत होती ते लग्न जुळायला खरंच लाडू कारणीभूत झाला का की आणखी काही?


हे एक अगदी अलीकडेच घडलेले असल्यामुळे उदाहरण म्हणून मी दिले. अशाच तऱ्हेने जेव्हा आपल्या बाबतीत आपल्या जवळच्यांच्या बाबतीत एखादी घटना घडते तेव्हा ती घटना आपल्याला अंधश्रद्धा न वाटता श्रद्धा वाटू शकते! पूर्वापार चालत आलेल्या काही गोष्टी खऱ्याच असल्याचा भास किंवा वास्तव प्रत्यक्षात दिसतेही. मग

याच गोष्टींचा प्रचार आणि प्रसार  होत राहतो.


यासाठी आपण काय करू शकतो, तर अशी वरील घटना मी तुमच्या निदर्शनास आणून दिली हे कदाचित माझे चुकत आहे. अशा घटनेकडे मी संपूर्णतः दुर्लक्ष करायला हवे. कमीत कमी जेव्हा माझ्या लक्षात आले की, ही घटना अंधश्रद्धेचा प्रचार करत आहे तेव्हा मी तिथेच थांबायला हवे आहे. म्हणजे त्याविषयी बोलणे किंवा लिहायला

टाळायला हवे.


  माझ्या सांगण्याचा मुद्दा लक्षात घ्या. आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत असे काहीतरी घडत असते, जे आपल्याला मनापासून पटतही असते, तर थोडासा संयम ठेवून कोणत्याही गोष्टीचा प्रचार करणे आपण थांबवले पाहिजे! हे सांगण्यासाठीचा हा लेखप्रपंच. याउलट ज्या गोष्टी वास्तववादी आहेत आणि ज्याचा फायदा अनेकांना निश्चितपणे होणार

आहे अशा गोष्टींचा मात्र प्रचार करण्याची आवश्यकता आहे.


त्याचेही इथे एकच छोटेसे उदाहरण देते.-


माझा एक विद्यार्थी अभ्यासात कच्चा होता. त्याला काही गोष्टी लक्षात राहत नव्हत्या. मग मी त्याला अभ्यासाची एक वेगळी पद्धत सांगितली. एकाखाली एक, एका मागून एक असे लिहून निव्वळ पाठांतर न करता, वृक्षालेखाच्या स्वरूपात किंवा साम्य आणि विरोध उभ्या स्तंभाचे तक्ते तयार करून, त्यात लिहून ठेवले तर परीक्षेच्या काळात ते व्यवस्थित आठवायची शक्यता जास्त आहे. त्याने तो प्रयोग केला आणि सहामाहीत नापास झालेल्या या विद्यार्थ्याला वार्षिक परीक्षेत चक्क अठ्याहत्तर टक्के गुण मिळाले. मग हा प्रयोग मी अनेक विद्यार्थ्यांना करायला सांगितला आणि त्याचा त्यांना खूप फायदा झाला, असे त्यांनी मला येऊन सांगितले! हे केवळ मी माझ्या ‘भौतिकशास्त्र’ या विषयाचे उदाहरण दिलेले आहे. असेच काही वेगवेगळे प्रयोग करून जर आपण काही चांगल्या गोष्टी करत असू आणि त्याचा प्रचार आपण व्यवस्थित केला तर त्याचा अनेकांना फायदाही होऊ शकतो! असो. जाता जाता एकच सांगायचं आहे - सुखदुःखाच्या काळात मानसिक आधार शोधण्यासाठी माणूस सहसा श्रद्धा किंवा अंधश्रद्धेकडे वळतो; परंतु, या दोन्हींमध्ये एक अतिशय सूक्ष्म, पण अत्यंत महत्त्वाची अशी रेषा आहे. श्रद्धा ही विचारांवर आधारित असते, तर अंधश्रद्धा ही अविवेकी असते!


pratibha.saraph@ gmail.com

Comments
Add Comment

जीवनगाणे - अर्थपूर्ण जगण्याचा सुरेल प्रवास

गोष्ट लहान, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर जीवन हे एका सुंदर गाण्यासारखे असते. प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळे सूर, ताल,

पुस्तक चोरी

कथा : रमेश तांबे सकाळी ११ वाजता शाळा भरली आणि शाळेत एकच बोंब झाली. चोरी झाली, चोरी झाली. चोरीची ही वार्ता साऱ्या

सहलीचे फायदे

कथा : प्रा. देवबा पाटील शिवपूर गावाजवळच एक पौराणिक संदर्भ असलेले वेदपूर नावाचे छोटेसे सुप्रख्यात तीर्थक्षेत्र

समस्या...?

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ सोशल मीडियावर एक बातमी वाचली. त्या बातमीतील घटना खूप अस्वस्थ करून गेली. त्या

स्वयंप्रतिमा

गोष्ट लहान, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर मनुष्याच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे

मला शिकायचंय...

कथा : रमेश तांबे सुरज एक शाळकरी मुलगा होता. हातात पिशवी नाही की खिशात पैसे नाहीत. बाबांच्या टोचून बोलण्याचा त्याला