सहलीचे फायदे

कथा : प्रा. देवबा पाटील


शिवपूर गावाजवळच एक पौराणिक संदर्भ असलेले वेदपूर नावाचे छोटेसे सुप्रख्यात तीर्थक्षेत्र होते. त्याच्याजवळच शिवपुडा डोंगरात एका उंच टेकडीवर एक विशाल असे भव्य पुरातनकालिन हेमाडपंथी शिवमंदिर होते. मंदिराचे बांधकाम त्या जुन्या काळात चांगल्या घोटीव, कोरीव, रेखीव व नक्षीदार काळ्याशार; परंतु चमकदार दगडांमध्ये केलेले होते.


आजपर्यंतच्या कोणत्याही व कितीही प्रतिकूल वातावरणात त्या मंदिराची चमक थोडीशीही कमी झाली नव्हती. त्यामुळे त्या मंदिराला एक विशेष प्रकारचे तेज प्राप्त झालेले होते. घोटीव, कोरीव, रेखीव व नक्षीदार दगडांमुळे मंदिराची शोभाही खूप मनोहर झालेली होती. तेथील निसर्गसुद्धा अत्यंत सुंदर व खूप रमणीय म्हणून नावाजलेला होता. डोळ्यांचे पारणे फेडणारा नयनमनोहर असा निसर्ग तेथे लाभलेला होता. त्या निसर्गानेही मंदिराच्या शोभेमध्ये चार चंद्र लावले होते. त्यामुळे वेदपूर हे एक सुंदरसे प्रेक्षणीय स्थळ


म्हणून त्या परिसरात सुप्रसिद्ध होते. ह्या शिवपूर गावात एक शंकरशेठ नावाचे दुकानदार राहत होते. त्यांना शिवम् नावाचा एकुलता एक मुलगा होता. हा शिवम् खूप अभ्यासू व हुशार मुलगा होता. तसेही तो एकपाठी होता. त्यामुळे एकदा वाचलेले चटकन त्याच्या लक्षात राहायचे. शाळेत अभ्यासात तर त्याचा पहिला नंबर असायचाच, पण इतर शालेय उपक्रमांमध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये व खेळांमध्येही तो वरच्याच क्रमांकावर असायचा. बरे, त्याला वाचनाचीही खूप आवड होती. त्यामुळे तो आपल्या शाळेतून नेहमी छान छान गोष्टींची, गोड गोड कवितांची, शालोपयोगी विविध माहितीची पुस्तके आणून वाचायचा.


दररोज शाळेतून घरी आल्यानंतर आपल्या मित्रांसोबत अर्धातास खेळून झाले की तो नियमितपणे आधी आपला अभ्यास करून घ्यायचा व नंतर फावल्या वेळेत गोष्टींची, कवितांची वा अभ्यासोपयोगी माहितीची अशी कोणती ना कोणती तरी पुस्तके वाचायचा. त्यामुळे त्याचे भौगोलिक, खगोलीय, वैज्ञानिक ज्ञानही चांगले होते.


एका दिवशी शिवम् व त्याचे मित्रमंडळ संध्याकाळी खेळून झाल्यानंतर थोडा वेळ मैदानावर सहज गप्पागोष्टी करीत बसले असताना शिवमने, “मित्रांनो! चलता का एखाद्या सुट्टीच्या दिवशी वेदपूरला सहलीला?”असे विचारत वेदपूरला सहल काढण्याचा आपला मनोदय बोलून दाखविला.


सहलीचे नाव काढताबरोबर साऱ्यांना हुरूप आला. तरीपण विशालने खोडा घातलाच. तो म्हणाला, “सहलीला जाण्यापेक्षा मस्तपैकी एखादा चित्रपट बघायला जाऊ की.”
“अरे, सहलीचे आपल्याला बरेच फायदे होतात. चित्रपटांपासून आपणास काय मिळते? तेच ते कंटाळवाणे प्रेम, तीच ती डोकं दुखवणारी हाणामारी अन् मन बिघडवणारा हिंसाचार.” कपिल म्हणाला.


“सहलीत गेल्याने निसर्गाचे मनोरम्य दर्शन होते. मन प्रसन्न होते. विविध अनुभवांनी बुद्धी सकस होते, ज्ञान मिळते. मनाचा विकास होतो.” शिवम् म्हणाला.
“बरोबर, नवनवीन स्थळांची माहिती होते, गावोगावच्या चालीरीती कळतात, त्यातून आपण कोठे व कसे आहोत हे समजते. त्यानुसार आपली प्रगती साधता येते.” कपिलने सांगितले.
“सिनेमात मनोरंजन होते, वेळ छान जातो. त्याचे काय?”कुणाल म्हणाला.
“सहलीमध्येसुद्ध मनोरंजन होते व तेही एकदम शुद्ध. डोक्यावरील ताण एकदम कमी होतो. सिनेमाने तरी डोळ्यांवर ताण पडून डोक्यावरही तणाव वाढतो.” कौशलने सांगितले.
“सहलीत खेळीमेळीने राहल्यामुळे एका वेगळ्याच आनंदाचा अनुभव येतो.” अमोल म्हणाला.
“एकमेकांना साहाय्य करण्याची प्रवृत्ती वाढते.” विपुलने सांगितले.


“सहलीने मन प्रफुल्लित झाल्याने मनाच्या क्षमतासुद्धा वाढतात. सहली आयुष्यातील धकाधकही कमी करतात म्हणून आजच्या दगदगीच्या जीवनात निसर्गसहलींची, प्रेक्षणीय स्थळांच्या सहलींची अत्यंत आवश्यकता आहे.” शिवम् बोलत होता. सगळ्यांची सहलीची मनोवृत्ती बघून विशाल व कुणालने नमते घेतले व त्यांनी सगळ्यांनी मिळून सहलीचा बेत आखला.

Comments
Add Comment

क्वाँटम कॉम्पुटर्स : विज्ञानाची गरुडझेप

तंत्रज्ञान - प्रा. प्रवीण पांडे सध्याचे युग हे विज्ञान आणी तंत्रज्ञानाचे युग आहे. प्रत्येक क्षेत्रात अत्यंत

इतरांना योग्य मार्गाला लावा

गोष्ट लहान, मोठा अर्थ - शिल्पा अष्टमकर समाजात प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या विचारांची, स्वभावाची आणि अनुभवांची

काचेपलीकडचे जग

प्रतिभारंग - प्रा. प्रतिभा सराफ शारीरिक प्रकृती उत्तम असूनही माणूस कधीकधी मनाने खचतो म्हणजे शरीरापेक्षा मन ही

पृथ्वीची निर्मिती

विज्ञानकथा - प्रा. देवबा पाटील पंधरा-वीस मिनिटांतच त्यांची बस वेदपूरला पोहोचली. बस थांबता बरोबर सारी मंडळी पटापट

परीक्षा

कथा - रमेश तांबे दोन विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाले. जेव्हा त्यांची शाळा सोडण्याची वेळ झाली, तेव्हा गुरुजी

व्यक्तिमत्त्वात माधुर्य हवे

गोष्ट लहान, मोठा अर्थ; शिल्पा अष्टमकर आजच्या स्पर्धात्मक आणि वेगवान जीवनात व्यक्तिमत्त्व आकर्षक असणे जितके