भारताची भविष्योन्मुख वाटचाल

विशेष; प्रा. सुखदेव बखळे


गेल्या काही दशकांमध्ये देशातील वीजमागणी झपाट्याने वाढत आहे. पण जीवाश्म इंधनांवर अवलंबून राहणे दीर्घकालीनदृष्ट्या शक्य नाही. या पार्श्वभूमीवर स्वच्छ, स्थिर आणि दीर्घकालीन ऊर्जा स्रोत म्हणून अणुऊर्जेकडे गंभीरपणे पाहिले जात आहे. म्हणून भारताने अणुऊर्जा क्षेत्रात धोरणात्मक बदल करत ‌‘सस्टेनेबल हार्नेसिंग अॅण्ड ॲडव्हान्समेंट न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी फॉर इंडिया‌’ (शांती ॲक्ट २०२५) हा महत्त्वाचा कायदा लागू केला आहे.


भारताने अणुऊर्जा क्षेत्रात धोरणात्मक बदल करत ‌‘सस्टेनेबल हार्नेसिंग अॅण्ड ॲडव्हान्समेंट न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी फॉर इंडिया‌’ (शांती ॲक्ट २०२५) हा महत्त्वाचा कायदा लागू केला आहे. हा कायदा लागू करताना केंद्र सरकारने ‌‘ॲटॉमेटिक एनर्जी ॲक्ट, १९६२’ आणि ‌‘सिव्हिल लायबेलिटी फॉर न्यूक्लिअर डॅमेज ॲक्ट २०१०’ हे दोन जुने कायदे रद्द करून त्याऐवजी एकसंध आणि आधुनिक कायदेशीर चौकट तयार केली आहे. त्यामुळे अणुऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक, नियमन आणि विकास यांना नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. भारतातील ऊर्जेची मागणी सातत्याने वाढत आहे. पुढील दोन-तीन दशकांमध्ये देशातील वीजवापर दुप्पट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सौर आणि पवन ऊर्जा यांसारख्या नवीकरणीय स्रोतांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होत असला तरी त्यांची एक मर्यादा आहे. त्यांची उपलब्धता सतत स्थिर नसते. याउलट अणुऊर्जा हा स्थिर आणि सातत्यपूर्ण वीजपुरवठा करणारा स्रोत आहे. त्यामुळे ऊर्जा मिश्रणात अणुऊर्जेचा वाटा वाढवणे हे भारताच्या दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाचे मानले जाते. सध्या भारताची अणुऊर्जा क्षमता सुमारे ८.७८ गिगावॅट आहे आणि देशातील एकूण वीज उत्पादनात तिचा वाटा सुमारे तीन टक्के आहे. हा वाटा वाढवण्यासाठी सरकारने महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले आहे. २०४७ पर्यंत शंभर गिगावॅट अणुऊर्जा क्षमता निर्माण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेला ‌‘शांती कायदा‌’ हा केवळ कायद्यांचे एकत्रिकरण नसून अणुऊर्जा क्षेत्राच्या संपूर्ण रचनेत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न आहे.


शांती कायद्याची व्याप्ती तीन प्रमुख स्तरांवर दिसते. त्यात अणुऊर्जा क्षेत्राचे नियंत्रित उदारीकरण, नियामक व्यवस्था मजबूत करणे आणि गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार करणे, यांचा समावेश आहे. यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे खासगी क्षेत्राला मर्यादित स्वरूपात अणुऊर्जा क्षेत्रात सहभागी होण्याची परवानगी. दीर्घकाळ केवळ सरकारी संस्थांच्या माध्यमातून भारतातील अणुऊर्जा प्रकल्पांचे संचालन होत होते. हे मॉडेल सुरक्षित असले, तरी क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने मर्यादित ठरत होते. नवीन कायद्यामुळे भारतीय खासगी कंपन्या, संयुक्त उपक्रम आणि इतर मान्य संस्थांना अणुऊर्जा प्रकल्प उभारणे, संचालन करणे आणि बंद करणे यासाठी परवाना घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तथापि, काही अत्यंत संवेदनशील क्षेत्रे अजूनही केंद्र सरकारच्या नियंत्रणाखालीच ठेवण्यात आली आहेत. त्यात युरेनियम समृद्धीकरण, अणुइंधन पुनर्प्रक्रिया, उच्चस्तरीय अणुकचरा व्यवस्थापन, जड पाण्याचे उत्पादन यांचा समावेश आहे. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित बाबींवर सरकारी नियंत्रण कायम राहणार आहे. या कायद्यामुळे अणुऊर्जा क्षेत्रातील नियमन अधिक स्पष्ट आणि मजबूत करण्यात आले आहे. या अंतर्गत ‌‘ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड‌’ या संस्थेला प्रथमच वैधानिक दर्जा देण्यात आला आहे. परिणामी, या संस्थेची स्वायत्तता आणि विश्वासार्हता वाढण्याची अपेक्षा आहे. नवीन कायद्यात परवाने देणे, तपासणी करणे, उल्लंघनांवर कारवाई करणे आणि दंडात्मक कारवाई करणे यासाठी स्पष्ट प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे.


अणुऊर्जा प्रकल्पांबाबत गुंतवणूकदारांना सर्वाधिक चिंता असते, ती अपघाताच्या परिस्थितीमध्ये होणाऱ्या आर्थिक जबाबदारीची. पूर्वीच्या कायद्यानुसार ऑपरेटरची नुकसानभरपाई जबाबदारी १५ अब्ज रुपये इतकी मर्यादित होती; परंतु पुरवठादारांविरुद्ध कारवाईच्या तरतुदींमुळे आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास कचरू लागल्या. नवीन कायद्याने स्तरानुसार नुकसानभरपाई प्रणाली लागू केली आहे. मोठ्या रिॲक्टरसाठी ही मर्यादा ३० अब्ज रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे, तर लहान प्रकल्पांसाठी कमी मर्यादा ठेवण्यात आली आहे. याशिवाय स्वतंत्र अणुऊर्जा नुकसानभरपाई निधी तयार करण्याची तरतूद करण्यात आली आहे. भारताने अणुऊर्जा विस्तारासाठी दीर्घकालीन योजना आखली आहे. सरकारच्या मते २०३१-३२ पर्यंत अणुऊर्जा क्षमता २२ गिगावॅटपेक्षा अधिक होऊ शकते. यासाठी देशांतर्गत विकसित ७०० मेगावॉट रिॲक्टर, आंतरराष्ट्रीय सहकार्य प्रकल्प आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. याचबरोबर लघू मॉड्युलर रिॲक्टर (एसएमआर) विकसित करण्यावरही सरकार भर देत आहे. या क्षेत्रात संशोधनाचे नेतृत्व ‌‘भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर‌’सारख्या संस्थेकडे आहे. आज जगभर ऊर्जा संक्रमणाची प्रक्रिया सुरू आहे. सौर आणि पवन ऊर्जेचा विस्तार वेगाने होत असला तरी त्या स्रोतांची उपलब्धता हवामानावर अवलंबून असते. अशा परिस्थितीत अणुऊर्जा स्थिर, कमी कार्बन उत्सर्जन करणारा आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध ऊर्जा स्रोत म्हणून महत्त्वाची ठरते.


भारताच्या ऊर्जा धोरणात अणुऊर्जेला आता नवी भूमिका दिली जात आहे, ती नवीकरणीय ऊर्जेची स्पर्धक नसून पूरक स्रोत म्हणून पाहिली जात आहे. ‌‘शांती कायदा‌’ लागू झाल्यानंतर अणुऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीच्या नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. खासगी कंपन्या, तंत्रज्ञान पुरवठादार आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी भारताचे अणुऊर्जा क्षेत्र अधिक आकर्षक बनू शकते. यामुळे नवीन प्रकल्पांची गती वाढू शकते. तंत्रज्ञान हस्तांतरणाला चालना मिळू शकते. देशांतर्गत उत्पादन आणि संशोधनाला प्रोत्साहन मिळू शकते. या कायद्याचे यश केवळ कायदेशीर चौकटीवर अवलंबून राहणार नाही. काही महत्त्वाची आव्हाने अजूनही कायम आहेत. त्यात प्रामुख्याने अणुऊर्जा प्रकल्पांचा प्रचंड खर्च, स्थानिक लोकांचा विरोध, पर्यावरणीय चिंता, नियामक प्रक्रियेत होणारा विलंब यावर प्रभावी उपाययोजना केल्याशिवाय अणुऊर्जा विस्तार अपेक्षित गतीने होणे कठीण ठरू शकते. ‌‘शांती कायदा २०२५’ हा भारताच्या अणुऊर्जा धोरणातील महत्त्वाचा टप्पा आहे. ऊर्जा सुरक्षा, हवामानबदल आणि आर्थिक विकास या तीन मोठ्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हा कायदा भविष्यातील ऊर्जा धोरणाची दिशा ठरवू शकतो. खासगी क्षेत्राचा सहभाग, नियामक संरचनेची बळकटी, गुंतवणूक सुलभता आणि तांत्रिक प्रगती या माध्यमातून अणुऊर्जा क्षेत्राला नवे आयाम मिळण्याची शक्यता आहे; मात्र या धोरणाचे खरे यश अंमलबजावणीवर अवलंबून राहणार आहे. योग्य नियोजन, पारदर्शक प्रशासन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा संगम साधला गेला तर भारताच्या ऊर्जा भवितव्यात अणुऊर्जा एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरू शकते.


कायद्यांचे एकत्रिकरणच नव्हे, तर अणुऊर्जा क्षेत्राच्या वाढीस अडथळा ठरणाऱ्या काही संरचनात्मक समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्नही या कायद्यात करण्यात आला आहे. त्यात सरकारी नियंत्रणाखाली असलेले संचालन मॉडेल, गुंतवणूक रोखणारी नुकसानभरपाईची जबाबदारी व्यवस्था, एका बंद, एकमेव ऑपरेटरवर आधारित नियामक रचना हे पूर्वी अडथळे ठरत होते. नवीन कायदा या सर्व बाबींमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. पूर्वी ऑपरेटरला दोषपूर्ण उपकरणांबाबत पुरवठादारांविरुद्ध थेट कारवाई करण्याचा अधिकार होता. यामुळे पुरवठादारांना मोठ्या जोखमीला सामोरे जावे लागत होते आणि अनेक परदेशी कंपन्या भारतात येण्यास कचरू लागल्या. नवीन कायद्यानुसार फक्त करारात नमूद असल्यास किंवा जाणीवपूर्वक चुकीचे कृत्य सिद्ध झाल्यास पुरवठादारांविरुद्ध कारवाई करता येईल. यामुळे भारताची कायदेशीर चौकट आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगत करण्यात आली आहे. कायद्यात नवीन तक्रार निवारण यंत्रणाही तयार करण्यात आली आहे. यामध्ये अणुऊर्जा तक्रार सल्लागार परिषद, नियामक निर्णयांवर अपील करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण, नुकसानभरपाईसाठी विशेष दावा आयुक्त आणि दावा आयोग यांचा समावेश आहे. केंद्र सरकारने २०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात २०० अब्ज रुपये लघू मॉड्युलर रिॲक्टर (एसएमआर) विकसित करण्यासाठी देण्यात आले आहेत. २०३३ पर्यंत किमान पाच स्वदेशी ‌‘एसएमआर‌’ कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.


‌‘शांती कायदा २०२५’ हा भारताच्या अणुऊर्जा धोरणातील महत्त्वाचा वळणबिंदू ठरू शकतो. कायद्यांचे एकत्रिकरण, खासगी क्षेत्राचा सहभाग, नुकसानभरपाई व्यवस्थेतील सुधारणा आणि नियामक संस्थेची बळकटी या माध्यमातून अणुऊर्जा क्षेत्राला अधिक सक्षम आणि विस्तारक्षम बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ऊर्जा सुरक्षेसोबतच हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ आणि स्थिर ऊर्जेची गरज वाढत असताना हा कायदा भारताच्या ऊर्जा भवितव्यासाठी महत्त्वाची पायाभरणी ठरू शकतो.

Comments
Add Comment

पितृसेवा

महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे एकदा महर्षी व्यासांना त्यांच्या सर्व शिष्यांनी प्रश्न केला की हे भगवान, या

‘ये जंग क्यों है?’

नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे ताजमहाल’(१९६३) ही तशी प्रेमकथा, पण साहिर लुधियानवी नावाच्या चिंतनशील कवीने १९६३

मायेचं चैत्रगौर

स्पंदन; अश्विनी शिंदे - भोईर भारतीय माणूस म्हणजे उत्सवप्रिय. सणांमध्ये...उत्सवांमध्ये रमणारा. आज आपल्या सणवार

मनभावन चैत्रगुढी

स्मृतीगंध; लता गुठे मुंबईसारख्या महानगरात सिमेंटच्या जंगलात राहताना कधी ऋतू बदलतो समजतही नाही; परंतु ग्रामीण

दीर्घकालीन युद्धाची सावली

विश्वभ्रमण; प्रा. जयसिंग यादव इराण-अमेरिकेतील संघर्ष केवळ शस्त्रांचा किंवा सामर्थ्याचा नाही, तर राजकारण,

जागतिक जल दिन

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे पाणी हेच जीवन. थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना अगदी तसं ते साठवलं पाहिजे. आपल्या मुलभूत