मुंबई : बेस्ट उपक्रमातील प्रलंबित मागण्यांकडे बेस्ट प्रशासन व मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे बेस्ट कर्मचारी हवालदील झाले असून आपल्या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शुक्रवारी बेस्टमधील नारायण राणे प्रणित समर्थ बेस्ट कामगार संघटनांसह इतर बारा संघटनांनी एकत्र येऊन पालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची भेट केली.
बेस्ट व्यवस्थापिका सोनिया सेठी सध्या सुट्टीवर असल्याने बेस्ट प्रशासनाचा हंगामी कारभार पालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे असून बेस्टमधील सध्याचे कामगार व निवृत्त कामगार यांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन अश्विनी जोशी यांना देण्यात आले. त्यावर अश्विनी जोशी यांनी हा आर्थिक प्रश्न असल्याने लवकरच आपण पालिका आयुक्तांशी बोलून या समस्येवर तोडगा काढून असे आश्वासन दिले. यावेळी बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव, उपमहापौर संजय घाडी उपस्थित होते.
यावेळी समर्थ बेस्ट कामगार संघटनेचे सरचिटणीस विलास पवार म्हणाले की, मुंबईकर जनतेला सार्वजनिक वाहतूक सुविधा अविरतपणे आणि वीजपुरवठा अखंडितपणे देण्यासाठी व बेस्ट उपक्रमाचे अस्तित्व राखणे व अधिक सक्षम करणे ही काळाची गरज असून बेस्ट उपक्रमातील कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आपण अश्विनी जोशी यांना दिल्या असून लवकरच पालिका यावर आयुक्त तोडगा काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी बेस्ट कर्मचारी सेना, बेस्ट कर्मचारी अधिकारी सेना, बेस्ट एस सी एस टी फेडरेशन, बेस्ट कामगार सेना मुंबई, इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन, श्रमिक उत्कर्ष सभा, मुंबई इलेक्ट्रिक युनियन, बेस्ट कामगार युनियन, बेस्ट सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी तसेच भाजपा कामगार महासंघाचे दोन ते तीन प्रतिनिधी उपस्थित होते.कामगार नेते शशांक राव यांच्या संघटनेने यापासून दूर राहणे
पसंत केले.