Sunday, March 15, 2026

उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला, पाकिस्तानी दहशतवादी ठार

उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला, पाकिस्तानी दहशतवादी ठार

बारामुल्ला : भारतीय सैन्याने जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमधील बुछारमधून घुसखोरी करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न उधळून लावला. भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत एक पाकिस्तानी दहशतवादी ठार झाला. घटनास्थळावरून सैन्याने एक एके रायफल, पिस्तूल आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त केला.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी घुसखोरीच्या प्रयत्नाबाबत दिलेल्या विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे, १४-१५ मार्च दरम्यान मध्यरात्री उरी सेक्टरमधील बुछारमध्ये संयुक्त कारवाई करण्यात आली. जवानांना झाडांमागे कोणीतरी लपले असल्याचे लक्षात आले. यानंतर बारकाईने तपास सुरू होताच दोन्ही बाजूने गोळीबार सुरू झाला. या चकमकीत एक पाकिस्तानी दहशतवादी ठार झाला. यानंतर सुरक्षा पथकाने घटनास्थळावरून शस्त्रसाठा जप्त केला. खबरदारीचा उपाय म्हणून नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर भारतीय सैन्याने गस्तीमध्ये वाढ केली आहे. पाकिस्तानच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

याआधी १० मार्च रोजी जम्मू आणि काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. या कारवाईदरम्यान एका पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्याला ठार केले होते. भारतीय लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने ही माहिती दिली होती.

Comments
Add Comment