चिरतरुण...

संवाद ; गुरुनाथ तेंडुलकर


अलीकडेच मी एक व्हिडीओ पुन्हा एकदा नव्याने पाहिला. जग‌द्विख्यात गायिका आशा भोसले यांच्या नव्वदाव्या वाढदिवसाचं औचित्य साधून दुबईत एक भव्य कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाचा व्हिडीओ..... यूट्यूबवर हा व्हिडीओ उपलब्ध आहे. तुम्ही देखील तो व्हिडीओ आवर्जून पाहा. त्या कार्यक्रमात आशाताईंनी अनेक नवी-जुनी गाणी स्वतः गाऊन उपस्थितांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. अगदी ‘दम मारो दम’पासून ते ‘पिया तू अब तो आजा’पर्यंत आणि ‘हंगामा हो गया’पासून ते ‘कभी अलविदा ना कहना’ पर्यंत अनेक गाणी त्या पूर्ण जोमात आणि जोशात गायल्या आहेत.


हा कार्यक्रम पाहताना आशाताईंच्या चेहऱ्यावरचे भाव, गाताना त्यांनी धरलेला पायाचा ठेका आणि हालचालीतली सहजता पाहून यांचं वय नव्वद झालं हे सांगून देखील खरं वाटलं नाही. आशाताईंचा हा नव्वदीचा कार्यक्रम पाहताना माझ्या मनात एक विचार आला. केवळ वय वाढलं म्हणून माणसाला म्हातारपण येत नाही. केवळ वय वाढलं म्हणून माणसाचं तारुण्य सरत नाही. तारुण्य आणि वृद्धत्व ही केवळ मनाची अवस्था असते.


कुठं असतं हे तारुण्य?


तारुण्य तिथं असतं जिथे प्रगल्भता आणि अवखळपणा दोन्हीही एकत्र नांदतात. तारुण्य तिथं असतं जिथे जोम, जोश आणि उत्साह असतो. तारुण्य तिथं असतं जिथे धमन्यांतून वाहणारं रक्त कायम गरम असतं. तारुण्य तिथं असतं जिथं फुलं पाहून ओठावर हास्य उमलतं आणि मोरपिसाच्या स्पर्शानं अंग रोमांचित होतं. तारुण्य तिथं असतं जिथं अन्याय पाहिला की हाताच्या मुठी वळतात आणि ओठ दाताखाली मुडपला जातो. तारुण्य तिथं असतं जिथं डोक्यात व्यवहाराची गणितं असतात, पण मनात मात्र कविता फुललेली असते. तारुण्य तिथं असतं जिथं मंदिरातली आरती ऐकून हात टाळ्या पिटतात आणि लेझीम-ढोलाचा नाद कानात घुमला की पाय त्या ठेक्यावर ताल धरतात. तारुण्य तिथं असतं जिथं डोळ्यांत भावुक स्वप्नं असतात आणि गात्रांत थरात असतो.


तारुण्य तिथं असतं जिथं चित्तात शुभसंकल्प धारण केले जातात आणि ते सिद्धीस नेण्याची जिद्द असते. तारुण्य तिथं असतं जिथं भूतकाळाचं ओझं न बाळगता भविष्यकाळाचं स्वागत करण्याची वृत्ती असते.


माणसाचं तारुण्य हे त्याच्या वयावर कधीही अवलंबून नसतं. ती मनाची एक अवस्था असते. ती एक वृत्ती असते. वय काय ते तर वाढतच असतं. दररोज सकाळी उगवलेला सूर्य संध्याकाळी मावळतो. कॅलेंडरवरची तारीख बदलते. वर्ष सरलं की कॅलेंडरसुद्धा बदलते. सरलेल्या प्रत्येक दिवसागणिक आपलं वय वाढतच जातं. ते वाढणारच असतं. पण वय वाढलं तरी वय होऊ न देणं मात्र आपल्या हातात असतं. ‘वय वाढणं.’ आणि ‘वय होणं.’ या दोन्ही गोष्टी सर्वस्वी भिन्न आहेत. मनाची योग्य जोपासना केली की माणूस अखेरच्या श्वासापर्यंत तरुण राहू शकतो. त्यासाठी जीवनाकडे पाहण्याचा निकोप आणि आशादायक दृष्टिकोन ठेवायला हवा. सौंदर्यग्राही वृत्ती तसंच उत्कट भावनाशीलतादेखील जपायला हवी.


याच चिरतारुण्यावर आधारित सुप्रसिद्ध आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल यांची चिरयौवन... ही कविता मला एस.एस.सी.च्या मराठी क्रमिक पुस्तकात होती. प्रत्येकवेळी ही कविता वाचताना मनाला एक वेगळाच आनंद लाभतो. अनिलांची ही कविता म्हणजे मराठी कवितेच्या विश्वातील एक चिरतरुण कविता मानली जाते.


चिरयौवन


फिरून वर्षचक्र हे पुढे पुढेच जातसे
विशी तिशी नि चाळिशीहि लोटली जरी दिसे
असे तरीहि गोठली न जीवनातली उषा
तशाच रंगसंगतीत वृत्ती गुंतती तशा
अजून ऊन रक्त हे भरे नसानासातुनी
तसाच रोमहर्ष आणि अंग ये थरारूनी
विरक्ति ? छे.... सदानुरुक्ति... भक्ति प्रेमभक्त मी
तरंगऊर्मि प्रीतिच्या अजून यौवनात मी


अजून यौवनात मी नि दंग जीवनात या
प्रसादही प्रमादही प्रमोद आणखी दया
विचार आणखी विकार भावनांत पाझरे
मधू न त्यातला सरे म्हणे न मीहि त्या पुरे
अरे कशास जीवना विचार आणसी मना
उदंड पाज आजची उद्यचि तीही आण ना
पुरे भरावयास पात्र हे नको करू कमी
तिथे सदा अतृप्त मी अजून यौवनात मी


अजून यौवनात मी मुले फुले सभोवती
विकासती विलासती हसून हासवीत ती
प्रलोभनात प्रीतिच्या कुणी हसे झुरे तिथे
तिथे सखे नि सोबती कुणी इथे कुणी तिथे
प्रसन्न चित्त हासते बघुनिया मजेस त्या
मुलात मूल होत मी फुलांत भृंग होत त्या
भरीत रंग बैठकीत स्नेह सोबतीत मी
प्रियेस प्रेम होत मी अजून यौवनात मी


अजून यौवनात मी जगात जागत्या अशा
जगावयास गावया पहावया उषा निशा
इथे निसर्गचारुता इथे प्रयत्न मानवी
उचंबळोनि वृत्ती ये उमेद घेऊनी नवी
विवर्त भ्रांति भास हा अशा जगा म्हणो कुणी
मला इथेच सत्य ते दिसे पटे क्षणोक्षणी
विकासलेच ब्रह्म है, न जीवबंधनात मी
नसे मुमुक्षु, मुक्त मी अजून यौवनात मी


कवी : अनिल
कवितासंग्रह पेर्ते व्हा

Comments
Add Comment

समाजमाध्यमांच्या आहारी...

दखल : मंजिरी ढेरे अलीकडच्या काही महिन्यांमध्ये ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी मुलांच्या ‌‘सोशल मीडिया‌’ वापरावर

जादू जेवर विमानतळाची

पैलू : अजय तिवारी नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा एव्हिएशन क्षेत्रातील ‌‘आर्थिक गळती‌’ थांबवण्याचा लक्षवेधी

गावची जत्रा - आठवणींचा दरवळ

स्मृतीगंध : लता गुठे वेळ दुपारची, एसी गाडीतही जाणवणारं रणरणतं ऊन, डांबरी सडकेवर खेळणारं मृगजळ आणि रस्त्याच्या

‘उठो, हमारा सलाम ले लो’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे ‘मुगले आझम’(१९६०)मध्ये दिलीपकुमार (सलीम उर्फ जहांगीर) आणि मधुबाला (अनारकली)

आम्ही चालवू हा पुढे वारसा...

स्पंदन : अश्विनी शिंदे - भोईर गावाचं गावपण राखून असलेलं बोर्डी हे डहाणू तालुक्यातील निसर्गरम्य गाव. भारत

ब्रह्मचर्य व गृहस्थ धर्म

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे भारतीय परंपरेत मानवी जीवन चार आश्रमात विभागले आहे. ब्रह्मचर्याश्रम,