मुंबई : राज्य सरकारने बुधवारी प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल केले असून, तीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तपदाबाबत प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. अखेर सरकारने सूर्यवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. सूर्यवंशी यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असून, त्यांच्या नियुक्तीमुळे शहराच्या विकासकामांना गती मिळेल.
केवळ पिंपरी-चिंचवडच नव्हे, तर इतर महत्त्वाच्या विभागांतही खांदेपालट करण्यात आला आहे. पाणी पुरवठा विभागाचे सहसचिव बापू पवार यांची आता 'महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणा'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे. वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश आव्हाड यांची नियुक्ती 'पुणे महानगर परिवहन महामंडळा'च्या संचालक पदी करण्यात आली आहे.