मुंबई: यंदा होळी आणि चंद्रग्रहण अशी दुर्मीळ घटना जुळून आली आहे. २ मार्च रोजी होलिका दहन असून ३ मार्चला पौर्णिमेसोबतच ग्रस्तोदित चंद्रग्रहण लागणार आहे. ज्योतिषाचार्य श्रीकेतन कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, दाते पंचांगानुसार या दिवशी वेधकाळ असूनही धूलिवंदन आणि होळीचा उत्साह साजरा करता येणार आहे. पण ग्रहणाचे शास्त्र पाळताना काही नियम पाळणे आवश्यक आहे. विशेषतः गर्भवती, वृद्ध आणि मुलांसाठी वेधकाळाचे नियम वेगळे आहेत. आपण होळीच्या पूजेवेळी, चंद्रग्रहणाचा काळ, वेधकाळात काय करावे आणि काय टाळावे जाणून घेऊया...
यंदा २०२६ मध्ये होळी आणि चंद्रग्रहण एकत्र येत असल्याने अनेकांना शंका आहेत. २ मार्च होलिका दहन तर ३ मार्च चंद्रग्रहण आणि धूलिवंदन आहे.
२ मार्च २०२६ – होलिका दहन
वार: सोमवार
भद्रा असली तरी सूर्यास्तानंतर प्रदोषकाळात होलिका दहन करावे.
होलिका पूजन करून कुटुंबासह प्रदक्षिणा करावी.
नकारात्मकता, रोग, दुःख दूर होण्यासाठी प्रार्थना करावी.
३ मार्च २०२६ – पौर्णिमा आणि ग्रस्तोदित चंद्रग्रहण
ग्रहण सुरू: दुपारी ३:२० वाजता
भारतामध्ये ग्रहणाचा आरंभ.
चंद्र उदयाला येताना ग्रहण लागलेलेच दिसेल.
ग्रहण मोक्ष (समाप्ती): संध्याकाळी ६:४८ वाजता
वेधकाळ कधी?
मंगळवारी सूर्योदयापासून वेधकाळ सुरू.
आजारी व्यक्ती, गर्भवती स्त्रिया, लहान मुले आणि वृद्धांनी सकाळी ११ वाजेपासून वेध पाळावे.
वेधकाळात काय करता येईल?
- पौर्णिमेचा कुळधर्म, पूजा-अर्चा, अभिषेक करता येईल.
- देवाला नैवेद्य दाखवू शकता (अतिशय थोडा).
- अभिषेकाचे तीर्थ प्रसाद म्हणून घेऊ शकता.
- एक घास अन्नाचा फक्त वास घेऊ शकता.
- गुरुजी / सुवासिनी यांना कोरडा शिधा आणि दक्षिणा देऊन कुळधर्म करता येईल.
- श्राद्ध करता येईल – स्वयंपाक नैवेद्यापुरता करून नंतर गाईला द्यावा.
- वेधामध्ये पूजन निषिद्ध नाही, पण भोजन निषिद्ध आहे.
धूलिवंदन (धुळवड) खेळता येईल का?
होय, वेधकाळात धूलिवंदन आणि रंग खेळणे करता येईल.आपल्या गावाच्या सूर्यास्तापासून ६:४८ वाजेपर्यंत ग्रहणाचा पर्वकाल आहे.काही ठिकाणी पर्वकाल कमी असेल तर ६:४८ वाजेनंतर मोक्षस्नान करावे.१५–२० मिनिटांपेक्षा जास्त पर्वकाल असल्यास सूर्यास्तानंतर स्नान करून थोडा जप करावा आणि ६:४८ वाजेनंतर मोक्षस्नान करावे. त्यानंतर भोजन करावे.
पूजनावेळी (उदा. सत्यनारायण पूजन)
श्री सत्यनारायण भगवानांच्या चरणी एक किंवा पाच तुळशीपत्र अर्पण करावी. प्रसाद (शिरा/पंचामृत) मध्ये एक तुळशीपत्र ठेवून नैवेद्य दाखवावा.
काय करू नये?
तुळशीपत्र तुटलेले, सुकलेले वापरू नये. नखे लावून तोडू नये. सकाळी स्नानानंतरच तोडावे.रविवार, एकादशीनंतर द्वादशीच्या दिवशी तुळस तोडणे टाळावे (परंपरेनुसार). योग्य पद्धतीने ठेवलेले तुळशीपत्र घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांती आणते असे मानले जाते.