सहल

कथा : रमेश तांबे


सरांनी वर्गात सूचना वाचून दाखवली. पुढील महिन्यात वेरूळची लेणी बघण्यासाठी शाळेची शैक्षणिक सहल जाणार आहे. त्याकरिता एक हजार रुपये पंधरा दिवसांत जमा करावेत. शक्यतो सर्वच मुलांनी सहलीसाठी यावे. सरांची सूचना वाचून होताच वर्गात एकच उत्साह संचारला. “सहल” म्हटलं की मुलांचा आनंद गगनात मावेनासा होतो. मग काय गटागटांनी चर्चा सुरू झाल्या. सर्वच मुलांचे चेहरे आनंदाने नुसते फुलून गेले होते. सहलीला गेल्यावर काय काय मजा करायची, कोणते कपडे घ्यायचे, कोणते बूट घालायचे याची चर्चा चांगलीच रंगली.


या साऱ्या गडबडीत शेवटच्या बाकड्यावर बसणारा विनय पाटील अगदी शांत बसला होता. जणू काही तो या वर्गातच नाही. दुसऱ्या दिवसापासून सरांकडे सहलीची नावे आणि पैसे जमा होऊ लागले. पाच दिवसांतच विनय सोडून साऱ्या वर्गाचे पैसे सरांकडे जमा झाले. विनयने आपले नाव दिले नाही ही गोष्ट सरांच्याही लक्षात आली. सरांनी विचारताच मान खाली घालून म्हणाला, “सर नाही जमणार.” सरांनी त्याच्याकडे निरखून बघितलं. त्यांना त्याचे डोळे पाण्याने भरलेले दिसले. सरांना माहीत होतं, की विनय हा गरीब घरातला मुलगा आहे. त्याला एक हजार रुपये सहलीसाठी भरणे शक्य नाही. सरांना विनयचे हजार रुपये भरणे सहज शक्य होते. पण मदतीची, सहकार्याची भावना मुलांमध्ये रुजायला हवी. संवेदनशीलता, बंधुभाव या भावना मुलांमध्ये विकसित व्हायला हव्यात. याच उद्देशाने सरांनी वर्गातल्या नीलिमा आणि सौरभ या मुलांना शिक्षकांच्या खोलीत बोलावून घेतले. सरांनी त्या दोघांना विनयची परिस्थिती समजून सांगितली. विनयच्या नकळत त्याच्यासाठी मदत गोळा करायची कामगिरी या दोघांवर सोपवली आणि त्यांनीदेखील ती आनंदाने स्वीकारली.


सहलीचा दिवस जवळ आला. दुसऱ्या दिवशी सहल जाणार म्हणून सरांनी किती वाजता यायचं, सोबत कोणत्या वस्तू आणायच्या, कोणते खाऊचे पदार्थ घ्यायचे याची माहिती वर्गाला दिली. वर्गाचा उत्साह आज अगदी टिपेला पोहोचला होता. फक्त विनय पाटील सहलीला येणार नव्हता. तरीदेखील त्याने आपल्या पालकांसोबत मुलांना निरोप देण्यासाठी शाळेजवळ सकाळी ७ वाजता हजर राहावे असे सरांनी सांगितले. विनयदेखील आपल्या मित्रांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तयार झाला.


दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेसमोर गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. मुलं आपल्या आई-वडिलांसह शाळेत वेळेवर हजर झाली होती. गळ्यात पाण्याची बाटली, पाठीवर बॅग, पायात शूज, अंगात रंगीबेरंगी कपडे! सारे वातावरण मुलांच्या कलकलाटाने नुसते भारून गेले होते. विनयदेखील आपल्या आई-बाबांसह मित्रांना निरोप देण्यासाठी हजर होता. विनयला आपण सहलीला पाठवू शकलो नाही, याचे दुःख विनयच्या आई-बाबांच्या चेहऱ्यावर दिसत होते. विनय मात्र मित्रांच्या आनंदात सहभागी झाला होता. गाड्या सुटण्याची वेळ होताच सौरभ विनयला घेऊन शाळेत गेला आणि दहा मिनिटांतच बाहेर आला. रंगीत शर्ट, हाफ पॅन, पायामध्ये शूज, डोक्यावर टोपी, डोळ्यांवर गॉगल, गळ्यात पाण्याची बाटली आणि पाठीवर बॅग अशा नव्या अवतारातल्या विनयला आई मोठ्या आश्चर्याने बघतच बसली. विनय आईला म्हणाला, “हे बघ आई माझ्या मित्रांनी मला काय काय दिले आहे. आता मी पण सहलीला जाणार.” आता मात्र आईचे डोळे पाण्याने भरले.विनयच्या बाबांनीदेखील हळूच आपले डोळे पुसले. तोपर्यंत विनय मात्र आपल्या मित्रांच्या गराड्यात सामील झाला होता. तेव्हा सरांच्या चेहऱ्यावरही समाधानाची एक रेषा उमटून गेली होती.

Comments
Add Comment

माती कशी तयार होते?

विज्ञानकथा - प्रा. देवबा पाटील शिवम आणि त्याची मित्रमंडळी सहलीवर गेले होते. ते भुका लागल्याने दुपारच्या वेळी

शिक्षा नव्हे शिक्षण

कथा - रमेश तांबे नमस्कार बाल मित्रांनो, मी आज तुम्हाला दक्षिण कोरिया या देशातल्या एका शाळेची आणि त्या शाळेत

हास्यरसातून जीवनरस

प्रतिभारंग - प्रा. प्रतिभा सराफ एकदा अचानक एका दिवाळी अंकाच्या संपादकाचा फोन आला, तुम्हाला ‘हास्य’ या विषयावर

आंतरिक व्यक्तिमत्व

गोष्ट लहान, मोठा अर्थ - शिल्पा अष्टमकर मनुष्याचे बाह्य रूप, पोशाख, बोलण्याची शैली किंवा सामाजिक प्रतिष्ठा पाहून

बघ्यांची गर्दी नि रेंगाळणारा न्याय...

स्पंदन; अश्विनी शिंदे-भोईर उन्हाळ्यात लालभडक फुललेला गुलमोहोर. ज्याच्या सावलीत कदाचित अनेकांचं बालपण रुजलेलं

“माझं बाळ हट्टी नाही, ते मला काही तरी सांगतंय!”

आनंदी पालकत्व; डाॅ. स्वाती गानू अभिषेक आणि समिधा दोघेही तीन वर्षांच्या निहारला घेऊन एका मोठ्या हॉटेलमध्ये