संवाद; गुरुनाथ तेंडुलकर
तुमच्या आयुष्यातील सर्वात सुखाचा कालखंड कोणता होता?’ या प्रश्नाचं उत्तर देताना बहुतेक लोक ‘बालपणीचा.’ असंच उत्तर देतील आणि ते खरंही आहे. मूल लहान असताना त्याला कोणत्याही प्रापंचिक जबाबदाऱ्या नसतात. कोणत्याही प्रकारच्या चिंता, विवंचना नसतात. शालेय जीवनापासूनच सुरू होणाऱ्या सत्तास्पर्धेत उतरून जिंकण्याची काळजी नसते. कोणत्याही प्रकारचे व्याप-ताप नसतात. भीती नसते. आई-वडिलांचं कृपाछत्र डोक्यावर असतं. मुख्यत्वेकरून आईचं.
कविश्रेष्ठ विंदा करंदीकर यांनी त्यांच्या एका कवितेत म्हटलं आहे -
पुन्हा वाटते तसेच इवले बाळ होऊनी कुशीत यावे अन् पदराच्या अभयाखाली डोळ्यांनी हे पंख मिटावे, आईच्या ऊबदार कुशीत शिरलं की बाळाला कसलीच चिंता उरत नाही. आईचा पदर ही जगातील सर्वाधिक सुरक्षित आणि ऊबदार जागा असते यावर कुणाचंही दुमत होणार नाही.
पण...
पण काही अभागी बालकांना विशेषकरून बालिकांना आईच्या कुशीत शिरण्याचं किंवा तिच्या पदराआड दडण्याचंदेखील भाग्य लाभत नाही. मुलगी जन्माला आली म्हणून तिला जन्मतःच मारून टाकण्याच्या घटना अगदी एकवीसाव्या शतकात आजही घडतात. काही ठिकाणी तर मुलगी जन्माला येताच खड्यात टाकून त्यावर माती लोटली जाते. तर काही ठिकाणी तिला पाण्यात बुडवून मारली जाते. एकंदरीत काय तर केवळ मुलगी म्हणून जन्माला आली या एकमेव अक्षम्य (?) अपराधाची शिक्षा म्हणजे मृत्यूदंड. अशावेळी तिची जन्मदात्री आई देखील या विरुद्ध आवाज उठवू शकत नाही. तिनं आवाज उठवला तर तिची घराबाहेर हकालपट्टी होण्याची किंवा पुन्हा पुन्हा मुलीला जन्म दिला म्हणून तिलादेखील मारून टाकण्याची शक्यता असते. अशा दारुण अवस्थेत ती माऊली बिचारी हुंदका ओठातच दाबून मुकाट बसून राहाते. आतल्या आत रडते आणि पराभूत अवस्थेत स्वतःच्या नशिबाला दोष देत पुन्हा दुसरा जीव जन्माला घालण्याच्या तयारीला लागते. या सगळ्यांचा साकल्यानं विचार करताना कवियत्री जयश्री संगीतराव यांना एक कविता स्फुरली, त्यांना वाटतं की आईची कूस किंवा तिच्या पदरापेक्षाही अधिक सुरक्षित जागा म्हणजे आईच्या पोटातला ऊबदार अंधार...
‘अलगूज’ या त्यांच्या कवितासंग्रहातील ‘क्षण सौख्याचे’ या कवितेत त्या लिहितात...
तुझ्या गर्भातला प्रत्येक क्षण
स्वर्गसुखाचा भास होता
सार्वभौम राजाच जणू
ना कुणाचा वास होता.
रक्त तुझेच तुझाच श्वास
सगळंच कसं सुकर होतं
तुझ्याच अन्नावर माझंही
सहज पोषण होत होतं.
पोटात तुझ्या फिरताना
असेलही लाथ लागलेली.
कधीतरी अवघडण्याची
असेल जाणीव झालेली
तरीही तू माझ्या लीला
उदरात निमूट सहन केल्या
कमी की काय म्हणून
जन्मतानाही वेदना दिल्या
तुझ्या थकत्या काळात मात्र
तुझी आई होऊ दे
गर्भात भोगलेल्या स्वर्गसुखाची
जाणीव सतत राहू दे
जाणीव सतत राहू दे...
तसं पाहिलं तर ही फार मोठी कविता नाही. पण या कवितेचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी कमी शब्दात ही कविता बराच मोठा आशय मांडते. आईच्या गर्भातील बालक हे सर्वाधिक सुरक्षित असतं कारण त्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या आईनं स्वीकारलेल्या असतात.
गर्भातल्या अर्भकाला अगदी वास घेण्याचे देखील कष्ट करावे लागत नाहीत की अन्नपाणी गिळण्यासाठी तोंड उघडावं लागत नाही. सगळं काही आईच्या नाळेमार्फत त्या अर्भकाला आयतं मिळत असतं. पण पोटातल्या बाळाची काळजी वाहताना आईला मात्र अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. चालताना, बसताना, उठताना एवढंच काय तर अगदी झोपतानाही तिच्या मनात एकच विचार असतो तो म्हणजे पोटातल्या बाळाचा, बाळाला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये.
गर्भावस्थेत स्त्रीच्या प्रत्येक हालचालीवर अनेक मर्यादा येतात. खाण्यापिण्यावर बंधनं येतात. अनेक प्रकारचे शारीरिक कष्ट तिला सहन करावे लागतात. पण हे कष्ट तिला कष्ट वाटतच नाहीत. कारण आपण काहीतरी कष्ट करतोय. कुणासाठी तरी काहीतरी त्याग करतोय याची पुसटशी जाणीव चुकूनदेखील तिच्या मनात कधी येत नाही.
हे मूल माझे आहे. या एकाच भावनेनं त्या बाळाला जगात आणण्यासाठी ती जे जे काही सहन करते त्याची कल्पना करणं देखील पुरुषांना शक्य नसतं. तो सृजनाचा जिवंत जिताजागता अनुभव असतो. त्या अनुभवाचं वर्णन शब्दांत करणं अशक्यच आहे. म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीत आईला देवाच्या बरोबरीनं स्थान दिलं गेलं आहे.
सहज आठवला म्हणून एक संस्कृत श्लोक सांगतो.
नास्ति मातृसमा छाया, नास्ति मातृसमा गतिः ।
नास्ति मातृसमा त्राणं, नास्ति मात्समा प्रपा ।।
अर्थ : आईसारखी दुसरी सावली नाही. आईसारखं दुसरं आश्रयस्थान नाही. आईसारखी दुसरी सुरक्षित जागा नाही आणि आईसारखी दुसरा जीवनदाता नाही.
पण... पण वडिलांच्या पश्चात, सगळी इस्टेट नावावर करून एकाकी राहिलेली आई आता निरुपयोगी झालीय. म्हणून तिला वृद्धाश्रमात सोडून येणारे अनेक लोक मी पाहिलेत आणि दुर्दैवाची बाब म्हणजे आईच्या अखेरच्या काळात तिची वृद्धाश्रमात रवानगी करणारे बहुतेक जण हे स्वतःला सुशिक्षित आणि सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्यांपैकी धनवान माणसं असतात. पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरात राहणारे असतात. खेडेगावी, शेतकऱ्यांकडे, कष्टकऱ्यांकडे अद्याप ही वृद्धाश्रम संस्कृती रुजली झाली नाही ही आनंदाची गोष्ट.
मागे मी एक कथा वाचली होती. त्या कथेत कॉलेजमध्ये जाणारा एक उनाड मुलगा आईला विचारतो की, ‘तू मला जन्म दिला म्हणजे माझ्यावर काय उपकार केलेस की काय? तू माझ्यासाठी नेमकं काय केलंस?’
त्यावर ती माऊली बिचारी काहीच बोलत नाही. पण तिथे उपस्थित एक प्राध्यापिका त्या मुलाला एक फुटबॉल देते आणि सांगते की ‘हा फुटबॉल तू तुझ्या पोटाला बांधून एक पूर्ण दिवस वावरून दाखव.’
तो मुलगा ते आव्हान स्वीकारतो. एक दिवस सोडा, एका तासाच्या आतच त्याची दमछाक होते. तो आपली चूक कबूल करतो. त्यावर त्या प्राध्यापिका म्हणतात.
‘एक पोकळ हलका फुटबॉल तुझ्या पोटाला बांधून वावरताना तुला एका तासात दमायला झालं, तर तुझ्या आईनं तुझं चार किलो वजनाचं ओझं दिवस-रात्र कसं सहन केलं असेल याची फक्त कल्पना कर...
कवी मोरोपंतदेखील त्यांच्या एका केकावलीत म्हणतात की, ‘न ऋण जन्मदेचे फिटे.’
आईचं ऋण कदापिही फेडता येणार नाही. आईनं आपल्याला जन्म देताना आणि जन्मानंतर वाढवताना सहन केलेल्या कष्टांची जाणीव प्रत्येकानं ठेवायलाच हवी. तिला कोणत्याही प्रकारचे क्लेश होणार नाहीत असंच वागायला हवं.
म्हणूनच तर कवियत्री जयश्री संगितराव या कवितेच्या शेवटच्या दोन ओळीत लिहितात...
तुझ्या थकत्या काळात मात्र
तुझी आई होऊ दे
गर्भात भोगलेल्या स्वर्गसुखाची
जाणीव सतत राहू दे
ही जाणीव प्रत्येकानं मनात कायम कोरून ठेवावी एवढीच अपेक्षा..
(लेखात उल्लेख असलेला अलगुज हा कवितासंग्रह कवियत्री जयश्री देशपांडे संगितराव यांचा असून याचे स्वेच्छामूल्य आहे. या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारी
रक्कम आर्मी वेल्फेअर निधीसाठी देण्यात येणार आहे.)